Home > रिपोर्ट > कोरोना व्हायरस: आता तरी ‘सिरीअस’ होऊया…!

कोरोना व्हायरस: आता तरी ‘सिरीअस’ होऊया…!

कोरोना व्हायरस: आता तरी ‘सिरीअस’ होऊया…!
X

‘अरे या मुंबईने अशी किती संकटं पचवली, कोरोना-फरोना आपलं xट वाकडं करु शकत नाही’

‘तुला माहितीये का… हा चायना ने पसरवलेला व्हायरस आहे… (पचाक…) अरे त्यांना अमेरिकेची ठासायची होती ना’

‘ट्रेन चालू आहेत ना राव अजून… काय नाय होत रे, आपण पॅनिक वगैरे होत नसतो’

हे असले डायलाॅग्ज तुम्हीही ऐकले असतील, तुम्ही ते ऐकून सोडून दिले असतील किंवा तुम्हाला मनापासून पटले असतील.

एक गोष्ट नक्की आहे, दुबई, युरोप वगैरे देशात सरकार काय करतंय त्याची तुलना आपल्या देशाशी करायला नको, पण एक नागरिक म्हणून रोगांचा सामना वगैरे करण्याची आपली मुळीच पात्रता नाही हे दिसलेलं आहे. दुबईमध्ये जेव्हा आवाहन केलं जातं की गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडा… याचं गांभीर्य तिथल्या लोकांना कळतं, तिकडे लगेच माॅल्समध्ये सन्नाटा पसरतो. इकडे आपल्याकडे माॅल्स बंद केलेत हे सरकारने सांगूनही ‘वर्क फ्राॅम होम’ करणारे माॅल्सच्या आसपास फिरायला जातात.

‘माॅल बंद आहेत माहित होतं, पण मला वाटलं बिग बझार सुरु असेल म्हणून…’ असं स्पष्टीकरणही तयार असतं.

लाॅकडाऊन वगैरे गोष्टी आपल्याला कमीपणाच्या वाटतात. दुकान बंद ठेवलं तर किती नुकसान होईल याचाच विचार आपल्याकडे आधी डोक्यात येतो. दुकान बंद ठेवून आपण आपलं आणि इतरांचं आयुष्य वाचवण्यात हातभार लावतोय हा विचार आपल्याला शिवतही नाही. पंधरा-वीस दिवसांचं सामान आधीच भरुन ठेवायचं म्हटलं तर लोकांना आपण पॅनिक पसरवतोय असं वाटतं. आता पुण्यात उद्यापासून तीन दिवस दुकानं बंद आहेत म्हटल्यावर शटर खाली करेपर्यंत लोकं किराणावाल्याकडे धाव घेत राहणार.

कुणीतरी एक अनिल पाटील वगैरे डाॅक्टर डोक्यात जाणाऱ्या बेफिकीर आवाजात ‘कसला कोरोना? काहीही वाकडं करणार नाही तो आपलं’ असं म्हणत सुटतो आणि आपण लगेच त्याला viral करत सुटतो. कुणी तज्ज्ञ जरी येऊन कोरोनाची माहिती सांगायला लागला की आपण तोच व्हिडीओ त्याच्यापुढ्यात धरतो.बाकी रस्त्यावर थुंकणं, आपण आजारी आहोत हे स्वत:हून कबूल न करणं, अशा साथीच्या काळातही दादरसारख्या भागात (म्हणजे उच्चभ्रू वगैरे नव्हे, जिथे सेनाभवन स्थित आहे त्या दादरमध्ये) कचऱ्याचे ढीग बघायला मिळणं या आणि अशा अनेक गोष्टींवर थिसीस वगैरे लिहून होईल.

जी कष्टकरी जनता आहे तिचं दु:ख समजू शकतो, पण ज्यांना शक्य आहे ते का घरी बसत नाहीत? सरकारने स्पष्टपणे सांगितलंय की गरज नसेल तर घराबाहेर पडू नका, तरीही आपल्याला आपले प्राधान्यक्रम ठरवता येऊ नयेत. किती प्रायव्हेट कंपन्यांनी ‘वर्क फ्राॅम होम’चा विचार करुन तो अंमलात आणलाय? तुम्ही नोकरी-धंद्यावर जाणार, बाहेर फिरणार आणि तो विषाणू स्वत:बरोबर घरात तुमच्याच कुटुंबापर्यंत घेऊन येणार, हे किती भयानक आहे याचा तरी विचार करा.

आपलं सरकारसुद्धा रोज पत्रकार परिषदा घेऊन ‘आज हे बंद केलं, आज ते बंद केलंय’ एवढंच सांगतेय. पुढचे पंधरा दिवस महत्त्वाचे आहेत असं चिंतातूर स्वरात सांगून त्याचा जनतेवर आणि भविष्यातील कोरोना संशयितांवर काहीही फरक पडणार नाहीये. मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री यांनी सरळ आदेश द्यावेत. तीच भाषा कळणार आहे. तीच भाषा कोरोनापासून वाचवणार आहे. इटलीचं उदाहरण समोर आहे… पुढच्यास ठेच मागचा शहाणा ही म्हण पुन्हा आठवूया…

अमोल परचुरे

Updated : 17 March 2020 5:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top