Lock Down: ‘खाकी वर्दीतली माणुसकी’, वाट चुकलेल्या वयस्क महिलेला मिळाला निवारा
X
Corona Virus च्या नियंत्रणासाठी जागोजागी पोलिसांनी चेक पोस्ट लावले आहेत. राज्यातील सर्वच महत्त्वाचे रस्ते पोलिसांच्या व जिल्हा प्रशासनाच्या नजरेखाली आहेत. तणाव, सततची धावपळ चालू असलेल्या या लॉकडाऊनच्या धामधुमीतही अनेक ठिकाणी खाकी वर्दीतल्या माणसाच्या माणुसकीचा प्रत्यय आला आहे.
नांदेड मध्येही पोलिसांच्या मदतीचा असाच प्रत्यय आलाय. नांदेड हैदराबाद रस्त्यावरील कुंटूर ते नायगाव या मार्गावर एक महिला अनवाणी फिरत असल्याचे कुंटूर पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख यांच्या लक्षात आले.
त्यांनी तात्काळ त्या महिलेला ताब्यात घेत ही बाब वरिष्ठ स्तरावर कळविण्यासाठी नांदेड येथे पोलीस नियंत्रण कक्ष तसेच जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक प्रशांत देशपांडे यांना कळविले. देशपांडे यांनीदेखील कसलाही विलंब न करता ही बाब जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आणून दिली.
जिल्ह्यातील तसेच परप्रांतीय कोणीही व्यक्ती लॉकडाऊनच्या काळात उपाशी व निवाऱ्याव्यतिरिक्त राहता कामा नये यासाठी जिल्हा प्रशासन झटत आहे. या परप्रांतीय महिलेला नुसता निवाराच नव्हे, तर लॉकडाउननंतर तिला हक्काचे घर मिळावे याकरीता जिल्हा प्रशासन तसे प्रयत्न करीत असल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी यांनी सांगीतले.