Home > Max Woman Blog > आज्जी व नदी...

आज्जी व नदी...

आज्जी व नदी...
X

आज्जी तिच्या वडलांच्या खूप गोष्टी सांगायची. ते स्टेशन मास्तर होते. तिच्या भावडांच्या, त्यांच्या शेताच्या, जुन्या, कर्तबगार बायकांच्या, विहिरीतल्या कासवांच्या गोष्टी. मी कधी लक्ष देऊन ऐकलं नाही तिचं. आता आजी, तिचे वडील, कर्नाटक सीमेवरचं ते गाव, सगळंच अंधुक झालं.

स्मृति हे नाव फार सुंदर आहे. परवा मिसिसिप्पी नदीचे नकाशे बघत होते, किती अनवट वाटा घेतल्यात बाईने. आपले ओझे घेऊन समुद्राकडे जायचा सगळ्यात सडेतोड आणि छोटा मार्ग शोधतीये ती सतत.

खूप रस्ते, पण दिशा एकच. "I have been writing the same story throughout my life, every time trying to cut nearer the aching nerve” आजपण तिला embankments च्या विळख्यातून मोकळे सोडवले तर अख्खे New Orleans शहर कवेत घेईल ही. मिसिसिप्पी काय, अमाझोन काय, ब्रह्मपुत्र काय, फिरस्त्या नद्या या.

त्या नकाशात अजून एक दिसले. नदीने कितीही वाटा बदलल्या तरी तिच्या जुन्या वाटा तिला तोंडपाठ असतात. सगळ्या खुणा, मग ते व्रण असोत की खळ्या, लख्ख कोरलेल्या दिसतात. Cartographer ने लिहिले आहे, 'Memories of rivers run deep'.

जेव्हा कोसी नदीला पूर येतो तेव्हा जुने अभ्यासक सांगतात, काळजी घ्या, आता हिचे paleo channels, म्हणजे जुने, कोरडे ठक्क channels जिवंत होणार, वाहते होणार.

पुरात हे रस्ते पाण्याने फुलून येतात तेव्हा तिथल्या आज्ज्यांना जुनी गाणी आठवतात. बिहारच्या नद्यांवर अनेक वर्ष काम केलेले दिनेश कुमार मिश्राजी सांगतात पूर्वी बिहारमध्ये पूर आला की चांदण्या रात्री गावातून पुरात फिरायला होड्या निघायच्या गावकऱ्यांच्या. पूर त्यांना नवे नव्हते :)

बुढीगंगा आहे, वृद्धगंगा आहे, बोर लुईत आहे. अजून या नद्यांना लक्षात ठेवणारे लोक आहेत, म्हणून या जिवंत आहेत.

काही वर्षात गोष्ट सांगणाऱ्या अज्ज्यांची पांढऱ्या केसाची, तुटक्या दाताची पिढी संपली की कोण लक्षात ठेवणार या जुन्या नद्यांना? आपण असलेल्या नद्यांना विसरतो हाय-वे खाली, बिल्डींग्स खाली. शकुंतला समोर असली तरी आपली खुणेची अंगठी हरवलेली असते.

कालव्यांच्या, धरणांच्या आणि embankments च्या गोष्टी सगळ्या विजयाच्या, conquestच्या . या गलक्यात नदीच्या आणि छोट्या माणसांच्या गोष्टीचा आवाज कसा ऐकू येणार?

बिभूतीभूषण इच्छामतीची गोष्ट सांगतात. नदीची नाही फक्त, तिथल्या सावळ्या-कच्च्या लोकांची, आसमंताची, गावातल्या जुन्या सावरीच्या झाडाची, सगळ्याची आठवण करून देतात. एका अशाच अनिमिष क्षणी भबानी मास्तरच्या गुंता-गुंता झालेल्या आयुष्याची निरगाठ सुटते: वाहती नदी आणि शांत जंगल शेजारी असते म्हणून.

ही आठवण झाली नसती तर मलाही कधी कळले नसते की वाहत्या नदीकाठी माणसाला त्याच्या कक्षेपलीकडचे काहीतरी सापडू शकतं.

आणि इच्छामतीच कशाला, पुण्याच्या नद्यांमध्ये ५० प्रकारचे मासे होते शहरात, गोदावरीच्या पात्रात अगदी पंचवटीमध्ये झरे होते स्फटिकाचे, समुद्रातले मोठे prawns नांदेड पर्यंत यायचे वाट शोधत-शोधत नदीतून. मराठवाड्यात दुष्काळ होताच, चुकला नाही तो पण दिमाखदार पायऱ्यांच्या बारवी देखील होत्या, पाण्यात घागर बुडबुडली की रावे उडायचे विहिरीवरून. कावेरीच्या मुखापाशी पुहार नावाचे शहर होते वैभवशाली, तिच्या तीरावरच्या जास्मिनच्या गर्द वेली होत्या. सिंधूच्या मुखापाशी झुलेलालची समाधी आहे, तिथे हिंदू मुसलमान धर्माची, जातीची ओझी बाजूला ठेउन डोकं टेकायचे. आज्जीच्या विहिरीत पाणी असायचे अगदी उन्हाळ्यात ..त्यात कासवं असायची..

या सगळ्या गोष्टी आपल्या आहेत. आपण यांना विसरलो, living memory मधून या गोष्टी अंधुक होत गेल्या तर त्यांना कसं परत आणणार?

जे जिवंत मनांना आठवणारच नाही, ते कसं जगणार?

Mexico मध्ये Day of the Dead असतो. तेव्हा आपण आपल्या गेलेल्या माणसांना विसरलो तर परक्या विश्वात ते कायमचे पुसले जातात.

जिवंत नद्यांची, जंगलांची आठवण जागती ठेवली तर त्या स्मृतींना कधीतरी धुमारे फुटतील. एखाद्या आठवणीतून जमिनीखालचा उबळ सापडेल.

तुकोबा मानी कवी. फार आवडते. त्यांनी देवाची रिकामी याचना कधी केली नाही. मागितले असेल तर "हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा."

- परिनीता दांडेकर

Updated : 10 Dec 2019 5:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top