Home > पर्सनॅलिटी > प्रणिती शिंदेची हॅट्रिक

प्रणिती शिंदेची हॅट्रिक

प्रणिती शिंदेची हॅट्रिक
X

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि वडील सुशीलकुमार शिंदे यांचा सलग दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव, विरोधकांचा जोरदार हल्ला आणि पक्षात आलेली काहीशी शिथिलता या सगळ्यांवर मात करत प्रणिती शिंदे विधानसभेत पोहोचल्या आहेत. राज्यातील (सोलापूर मध्य) युवा आमदारपैकी एक म्हणून प्रणिती शिंदेना ओळखलं जातं. सर्वात लहान आमदार म्हणून त्यांनी विधीमंडळावर आपली पहिली मोहर उमटवली. ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांची कन्या ही एवढीच ओळख न ठेवता आपल्या कामातून ‘आमदार प्रणिती शिंदे’ अशी ओळख निर्माण केली आहे. नुकतीच पार पडलेली महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ अत्यंत चुरशीची होती. पंचरंगी लढतीत मातब्बर नेत्यांना धूळ चारत त्या विजयी झाल्या आहेत. या विजयाने विधानमंडळाचे सदस्य होण्याची हॅट्ट्रीक त्यांनी केली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, राज्यपाल अशी विविध महत्त्वाची पदे भुषविलेल्या ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांचा राजकीय वारसा लाभलेल्या प्रणिती शिंदे यांनी आपले शिक्षण मुंबईमध्ये पूर्ण केले. ‘विधी’(Law) ची पदवी मिळवल्यानंतर सोलापूर या आपल्या मतदारसंघात त्यांनी ‘जाईजुई विचारमंचच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरूवात केली. महिला बचत गट, तरूणांसाठी मार्गदर्शन केंद्रे, रोजगार मेळावे आयोजित करून आपली सामाजिक-राजकीय वाटचाल सुरू केली. मतदारसंघातील जनेतेचे प्रश्न, समस्या प्रत्यक्षात जाऊन त्या समजून घेऊन त्या सोडवण्यावर भर दिला. राजकीय वातावरणातच वाढलेल्या प्रणितींनी आपल्या दोन बहिणीपेक्षा वेगळा मार्ग निवडला. २००९ ला पहिली विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकलीही. सक्रिय राजकारणात यायचे या त्यांच्या निर्णयाचे घरातून स्वागत झाले पण त्याचवेळी जबाबदारीची जाणीवही त्यांना करून देण्यात आली. “पहिली निवडणूक मी वडिलांमुळे जिंकले” हे त्या कबूल करतात. सुशिलकुमार शिंदे यांची मुलगी असल्याचा फायदा झाल्याचे त्या नाकारत नाहीत. मात्र २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुका त्यांनी आपल्या कामाच्या तसेच जनसंपर्काच्या जोरावर जिंकल्या. आज देशभरात काँग्रेस कमकवुत झाली असताना आणि समोर तुल्यबळ विरोधक असतानाही न खचता त्यांनी जोराची टक्कर दिली.

सोलापूर मध्य मतदारसंघाची जातीची गणिते खूप विचित्र आहेत. एका बाजूला एमआयएमने संपुर्ण ताकद लावलेला मोठ्या प्रमाणात असणारा मुस्लिम मतदार, दुसऱ्या बाजुला कॉम्रेड नरसय्या आडम यांना मानणारा पारंपरिक कामगार वर्ग तर मराठा समाजाचा चेहरा असणारा दिलीप माने यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. अशातच शिवसेनेचे बंडखोर नेते महेश कोठे जे अनेक दिवसापासून विधानसभेची तयारी करत होते अशा सर्व नेत्यांशी आमदार प्रणिती शिंदे यांची झुंज होती. या मतदारसंघात मतदारराजा कोणाच्या पारड्यात आपले दान टाकणार याचा कोणालाच अंदाज येत नव्हता. अशा परिस्थितीत एमआयएमच्या फारूक शाब्दी यांना मागे टाकत ४८,८३२ मते मिळवली. प्रणिती शिंदे यांनी आपल्या विजयाची हॅट्रिक केली.

दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूरला नवी ओळख निर्माण करून देण्यासाठी आमदार शिंदे झटत आहेत. महाराष्ट्रातूनअवघ्या दोन जिल्ह्याची स्मार्ट शहरांमध्ये निवड झाली. यामध्ये सोलापूर शहराची स्मार्ट शहरासाठी निवड होणे ही त्यांच्या कामाची पावती आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

-वर्षा कुलकर्णी

Updated : 13 Nov 2019 2:13 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top