Home > रिपोर्ट > कॅटवाल्या सोफीच्या प्रयत्नांनी होणार मांजरांची देखभाल

कॅटवाल्या सोफीच्या प्रयत्नांनी होणार मांजरांची देखभाल

कॅटवाल्या सोफीच्या प्रयत्नांनी होणार मांजरांची देखभाल
X

भारतात मांजरींसाठी असे कुठलेही कायदे – नियम नव्हते. मात्र, मुंबईतल्या एका मुलीनं सातत्यानं पाठपुरावा घेतल्यानं केंद्र सरकारला याबाबत निर्णय घ्यावा लागलाय. त्यामुळं आता देशभरातील मांजरींच्या आरोग्याचा प्रश्न निकाली निघायला सुरूवात झाली आहे.

भटक्या कुत्र्यांसाठी निर्बिजीकरण, लसीकरण करण्यासाठी सरकारचे कायदे-नियम आहेत. तसे नागरी भागातील भटक्या मांजरांसंदर्भात नव्हते. मात्र, विधी शाखेची पदवीधर असलेल्या सोफी जग्गीनं या मांजरांच्या आरोग्यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला. अखेर सोफीच्या प्रयत्नांना यश आलंय. भारतीय जीवजंतू कल्याण मंडळानं १६ ऑक्टोबर २०१८ रोजी नागरी भागातील भटक्या मांजरांच्या लसीकरण व निर्बीजीकरणासंदर्भात आवश्यक त्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

केंद्राच्या जीवजंतू कल्याण मंडळानं यासंदर्भातली नियमावली तयार करतांना सोफी यांनी दिलेल्या सूचनांपैकी बहुतांश सुचनांचा समावेश केलाय. केंद्र सरकारनं सोफीच्या मांजराविषयीच्या या जागरूकतेची आणि पाठपुराव्याची दखल घेत तिची नियुक्ती राज्य पशुसंवर्धन अधिकारी या पदावर केलीय. मुंबई महानगरपालिकेने या तत्त्वांचे पालन करण्यासाठी प्रथम भटक्या मांजराची नसबंदी करण्याचे ठरवले असून तसा प्रस्तावही तयार केला आहे.

सोफीच्या लढ्याची केंद्र सरकारकडून दखल

आपल्या आसपास असणाऱ्या मांजरांचा फारसा उपद्रव नसतो म्हणून त्यांच्या नसबंदीची आवश्यकता सरकारी यंत्रणांना आतापर्यंत वाटत नव्हती. पिलावळ वाढत असल्याने मांजरांना सोसाव्या लागणाऱ्या त्रासाकडे कोणाचेही लक्ष जात नव्हते. वडाळ्यात राहणाऱ्या सोफी जग्गी या विधी शाखेच्या तरूणीनं मांजरांच्या हक्कासाठी दिवसरात्र एकटीनंचं लढा दिला त्याकाळात तिनं वकील प्रॅक्टिसही सोडून दिली त्यातून अखेर सरकारी यंत्रणेला मांजरांसंदर्भात निर्णय घ्यावाच लागला.

कोण आहे कॅटवाली सोफी ?

मुंबईतल्या वडाळ्यात राहणाऱ्या सोफी जग्गीला लहानपणापासूनच प्राण्यांची आवड होती. त्यातही मांजर हा तिचा सर्वात आवडता प्राणी. याच भटक्या मांजरांचे हाल ती सातत्यानं पाहत आली होती. यातूनच भटक्या मांजरांविषयी काहीतरी केलं पाहिजे, याच जाणिवेतून तिनं विधी शाखेचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर सरकारी यंत्रणेशी कायदेशीर संघर्ष सुरू केला होता. त्याला यश मिळालं. मात्र, एवढ्यावरच कॅटवाली सोफी थांबायला तयार नाही. सोफीनं प्राण्यांवरील अत्याचार प्रतिंबध कायद्यावर पीएचडी करायलाही सुरूवात केलीय. सध्या यासोबतच सोफी जग्गी विधी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणूनही काम करतेय.

कॅटवाल्या सोफीच्या प्रयत्नांमुळं अॅानिमल वेल्फेअर बोर्डाने मांजरांच्या नसबंदीबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करून त्यांची अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व राज्यांना दिले आहेत. मात्र, दुर्देवानं यासंदर्भातल्या अंमलबजावणीला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाहीये.

https://youtu.be/Kj9fDQuTPtU

Updated : 3 Jun 2019 10:04 AM GMT
Next Story
Share it
Top