महिला आणि बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांचा निर्णयांचा धडाका
X
मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ॲड. यशोमती ठाकूर या महिला व बालविकास विभागाच्या योजनांचा आणि कामकाजाचा आढावा घेत आहेत. यादरम्यान मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले महत्वाचे निर्णय ॲड. यशोमती ठाकूर यांनी घेतले.
मागील ३ वर्षांत रिक्त झालेल्या एकूण पदांपैकी अंगणवाडी सेविका व मदतनीसांची ६ हजार ५०० पदे तात्काळ भरण्यास ॲड. यशोमती ठाकूर यांनी मान्यता दिली आहे. या संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात येत असून लगेचच भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.
यासोबत ९८ अंगणवाडी आणि ७४५ मिनी अंगणवाडी नव्याने सुरु करण्यात येणार आहेत. एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत केंद्र शासनाने पूर्वीच मान्यता दिलेल्या परंतु कार्यान्वित न झालेल्या ९८ अंगणवाडी व ७४५ मिनी अंगणवाडी केंद्रे सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
राज्यभरात बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांची ४५ पदे भरण्यात येणार आहेत. महिला व बाल विकास विभागामार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोगास विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी मागणी पाठविली होती. त्यानुसार आयोगाकडून ४५ पदांसाठी शिफारशी प्राप्त झाल्या होत्या. या रिक्त पदांवर उमेदवारांची नियुक्ती करण्यास ॲड. श्रीमती ठाकूर यांनी मान्यता दिली आहे.
यासोबतच खासगी इमारतीत भरणाऱ्या अंगणवाड्यांच्या जागाभाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रासाठी १ हजार, नागरी क्षेत्रासाठी ४ हजार तर महानगर क्षेत्रांमध्ये ६ हजार रुपये इतके नवीन भाडे असणार आहे. यापूर्वी सर्वच क्षेत्रातील खासगी जागेत भरणाऱ्या अंगणवाड्यांना सरसकट ७५० रुपये जागाभाडे दिले जात होते.