Home > Max Woman Blog > स्त्रियाच उद्याची वाट दाखवतील - शाहीर संभाजी भगत

स्त्रियाच उद्याची वाट दाखवतील - शाहीर संभाजी भगत

स्त्रियाच उद्याची वाट दाखवतील - शाहीर संभाजी भगत
X

पुरोगामी, आंबेडकरवादी, समाजवादी आणि साम्यवादी यांच्याकडे आजमितीस पर्याप्त जनतळ नाही, किंबहुना गेल्या 30 -35 वर्षात जागतिक सत्ताधारी वर्गाच्या माध्यमातून जगभरात एक आर्थिक आणि सामाजिक अशी स्थिती निर्माण करण्यात आली आहे की, सदर जनतळ डाव्या आणि आंबेडकरी शक्तींकडून हळूहळू सरकून उजव्या फॅसिस्ट शक्तींकडे गेला आहे.

डावे पक्ष, आंबेडकरी चळवळ आणि लिबरल व्यक्ती व समूह या बहुतेक सर्वांच्याच वर्गजाणीवा मध्यमवर्गीय आणि भारतीय परिप्रेक्षात त्यांच्या जातजाणीवा ब्राह्मनाळलेल्या (brahaminical) असल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे, त्यामुळे त्यांना या नव्या फॅसिस्ट शक्तींच्या विरोधात प्रत्यक्षात लढ शक्य नाही. परंतु, हे उघड सत्य स्वीकारण्याची त्यांची मानसिक तयारीही दिसत नाही.

या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्रात आणि देशात जे काही सुरु आहे. ते नेमके काय आहे? हे तपासण्याचा छोटासा प्रयत्न या लेखातून मी करण्याचा प्रयत्न करत आहे .

आपल्यापैकी काही भाबड्या पुरोगामी लोकांनी महाराष्ट्रातील या लढाईचा झेंडा सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि गेल्या काही दिवसांपासून शिवसेना यांच्या खांद्यावर दिला आहे. यातल्या काही भाबड्या पुरोगामी लोकांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना मतदानही केले आहे. निदान महाराष्ट्रापुरता तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी संघपरिवाराचा राजकीय पराभव करतील, असे त्यांना वाटते. भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याची या पक्षांची कसरत बघून या भाबड्या पुरोगामी लोकांची भावनिक गुंतवणूकही या पक्षांबरोबर झाली आहे. काहींना तर हेच आपले तारणहार आहेत, असा पक्का विश्वासही वाटू लागला आहे. साहजिकच मान टाकायला आपले कुणी नसल्याने, त्यांनी आपली भाबडी मान कॉग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या खांद्यावर टाकली आहे. त्यांची अवस्था सामान्य गरीब माणसासारखी झाली आहे. सामान्य गरीब माणूस जेव्हा संकटात सापडतो तेव्हा तो देवाचा धावा करतो आणि सगळे उपाय खुंटले की, शेवटचा उपाय म्हणून तो देवाच्या खांद्यावर आपली मान टाकतो. त्याचप्रमाणे संकटकाळी बाहेर जाण्याचा मार्ग म्हणून तो या पक्षांच्या आश्रयाला आला आहे. त्यात या भाबड्या लोकांची काही चूक आहे असे मला वाटत नाही.

फॅसिझम आणि हुकुमशाही ही या जगाला नवी गोष्ट आहे का ? तर नाही. अनेक वेळा मानवी समाज या संकटातून गेला आहे. भारतासारख्या देशात तर वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था हेच एक फॅसिझमचे रूप आहे आणि गेल्या पाच हजार वर्षांपासून देशांतर्गत शुद्रातीशूद्र विरोधी फॅसिस्ट ब्रह्माणी छावणी असा सुप्त अंतर्विरोध कायम आहे. याला जशी सांस्कृतिक शोषणाची (कधी कधी!) किनार आहे. तसाच आर्थिक शोषणाचा गाभा (कधी कधी ! ) असतो. कधी हे उलटही होते. आज सांस्कृतिक बाजू वर आली आहे. आणि आतून सर्वधर्मीय शुद्राती शूद्रांची जबर आर्थिक कोंडी करण्यात आली आहे. वरून हिंदुराष्ट्र निर्मितीचे लेबल लावून आतून संपूर्ण पब्लिक सेक्टर खाजगी मालकांना विकण्याचा कार्यक्रम जारी आहे. आत मध्ये चालू असलेल्या आर्थिक काळाकांडी कुणाच्या सहजासहजी लक्षात येऊ नये. म्हणून हिंदुराष्ट्राच्या लेबलसाठी मुस्लिमद्वेषाचे भरपूर पेट्रोल टाकले आहे. एकूण हे पाताळयंत्री सत्ताधारी देशाला सिव्हील वॉर कडे घेऊन चालले आहेत. देशात यादवी माजली की, संविधान धाब्यावर बसवून सरळ एकपक्षीय हुकुमशाही आणून सुरुवातीला देशातल्या काही धार्मिक गटांना दुय्यम नागरिकत्व देण्याचा हा डाव आहे. नंतर क्रमाक्रमाने हे प्रकरण शेतकरी जातीपर्यंत येईल आणि शेवटी जे शुद्ध रक्ताचे वैदिक उरतील, त्यांच्यातही गोत्रावरून उच्च नीच भेद करून कत्तली होतील किंवा गुलामी लादून दुय्यम नागरिक बनविले जाईल. यात पहिला क्रमांक मुस्लिमांचा आहे. हे स्पष्ट झाले आहे. दुसरा नंबर अर्थात त्यांना कडवटपणे विरोध करणाऱ्या आंबेडकरवादी आणि डाव्या लोकांचा आहे. हळूहळू ख्रिस्ती शीख वैगरे लोकांचा क्रमांक आहे.

आज जे हिंदूराष्ट्राच्या नावाने प्रचंड खुश आहेत. त्या ओबीसी जातींचा नंबरही त्या मागोमाग आहे. त्यानंतर जे स्वत:ला क्षत्रिय किंवा बनिया समजतात त्याचा नंबर शेवटी लागेल. या कत्तलीची आणि दुय्यम नागरिकत्व बहाल करण्याची strategy आज सरळ सरळ दिसून येऊ लागली आहे. एक एक धार्मिक किंवा जातीय गट टार्गेट केला जाईल, जेव्हा एकाला टार्गेट करतील, तेव्हा त्याच्या समर्थनात दुसरे सामाजिक गट उभे राहू नयेत, याची दक्षता घेतली जाईल, जसे आज मुस्लिम टार्गेट आहेत आणि त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी निरनिराळ्या कायद्यांचे हत्यार वापरण्यात येत आहे. परिणामी एकटे मुस्लिम लढत आहेत. अपवाद म्हणून काही ठिकाणी इतर लोक आंदोलनात उतरले आहेत बाकी "तुमचा प्रश्न आहे तर तुम्हीच लढा" या न्यायाने बाकी कुणीही त्यांच्यासोबत नाहीत. एकदा मुस्लिम दुय्यम नागरिक झाले किंवा हाकलून लावले किंवा तुरुंगात डांबले, की फॅसिस्ट शक्तींचे टार्गेट बदलेल. मग पुन्हा तेच गणित, प्रथम बदनाम करा. मग घृणा निर्माण करा!! मग हे लोक आमच्या सोबत जगण्यास नालायक कसे आहेत? असे जाहीर करा, मग पुन्हा कत्तली आणि हाकला हकली किंवा तुरुंगवास......!!

काहींचा पहिला नंबर असेल, तर काहींचा नंतर असेल, पण त्यांच्या लिस्टमध्ये सारे धार्मिक अल्पसंख्यांक आणि ब्राह्मण्याला विरोध करणारे शुद्रातिशूद्र आहेत. दरम्यानच्या काळात काही लोकांनी शरणागती पत्करली, तर त्यांची घरवापसी होईल, पण जे लोक घरवापसीला तयार होणार नाहीत. त्यांच्या साठी detention कॅम्पबांधणी सुरु आहे. आणि त्याप्रकाराचे कायदेही तयार करण्याची कोणतीही अडचण आता सरकार समोर नाही.

प्रश्न आहे हया ब्राह्मणी कार्पोरेट हुकूमशाहीचा अंत कसा होईल? किंवा रोखावी लागली तर या हुकुमशाहीला कशी रोखता येईल? या कामी हे जे काही संसदीय पक्ष आहेत, त्यांची काही मदत होईल का ??

सर्वप्रथम हे लक्षात घ्या, की कोणत्याही हुकुमशाहीचा अंत युद्धात होतो. किंवा जन उठाव होऊन हुकूमशाहया गाढल्या जातात. परंतु हे सारे long term ची उत्तरे आहेत. हुकुमशाहीला रोखता येते का ?? तर हो! अजूनही वेळ गेलेली नाही. भारतात हुकुमशाहीची सुरुवात होत आहे. अजून धर्मराष्ट्राची कायदेशीर घोषणा झालेली नाही किंवा अजूनही एकपक्षीय हुकुमशाही आलेली नाही. अश्या काळात जोपर्यंत निवडणूकांची प्रक्रिया चालू राहिल. तोपर्यंत हे तथाकथित संसदीय विरोधी पक्ष काही काम करू शकतील का ?? असा प्रश्न ऐरणीवर येतो आणि प्रत्येक लोकशाहीवादी नागरिकला वाटते की, या सगळ्या विरोधकांनी एकत्र यावे आणि फॅसिस्ट शक्तींचा संसदीय पातळीवर तरी पराभव करावा. परंतु खरोखर हे विरोधी पक्ष आहेत का ??

वस्तुस्थितीचा विचार करता, हे पक्ष खऱ्या अर्थाने विरोधी पक्ष नाहीत. हे आपापल्या क्षेत्रातील सत्ताधारी आहेत. त्यामुळे केंद्रातील सत्ताधारी आणि हे क्षेत्रीय सत्ताधारी यांच्यात जास्त फरक नाही. तपशिलात थोडे बहुत फरक आहेत, पण यांचे वर्ग आणि वर्ण चरित्र एकच आहे, त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हे फॅसिस्ट शक्तीच्यांविरुद्ध ताठ उभे राहू शकत नाहीत. कारण हे स्वभावत: सॉफ्ट हिंदू किंवा ब्राह्मणवादी आहेत. तसेच हे एकत्र निवडणूकही लढवू शकत नाहीत. कारण प्रत्येकाला पंतप्रधान होण्याच्या स्वप्नाने घेरले आहे.

मागच्या निवडणुकीत फॅसिस्ट पक्षाचा पंतप्रधान पदाचा उमेदवार एक होता, तर विरोधकातील सुमारे 22 लोकांना पंतप्रधान होण्याची स्वप्ने पडली होती. यातले काही लोक भ्रष्ट असल्याने त्यांच्या घोटाळ्याच्या फाईली फॅसिस्ट लोकांच्या हातात आहेत. थोडा जरी आवाज केला तर ईडी मागे लावली जाते. म्हणून प्रश्न पडतो की, या देशात खरा विरोधी पक्ष उरला आहे किंवा नाही??

देशात खरा विरोधी पक्ष का उभा राहिला नाही ?? याचे विश्लेषण मागील एका लेखात मी केले होते, (लेख: हुकुमशाही येते तेव्हा). जिज्ञासूंनी सदर लेख वाचावा.

हे झाले इतर पक्षांचे, परंतु परिवर्तनाची आस असलेल्या आंबेडकरी आणि डाव्या पक्षांचे काय झाले आहे ..? त्यांना सुद्धा बाकीच्या विरोधकांचाच रोग लागला आहे. काही पवित्र आंबेडकरी आहेत तर काही भ्रष्ट आंबेडकरी आहेत. काही उजवे साम्यवादी !! तर काही डावे साम्यवादी आहेत. या क्रांतिकारकांचे इगो इतके भयंकर आहेत की, देश फॅसिस्ट लोकांच्या टाचेखाली चिरडला तरी हरकत नाही, पण साप मारणार तर मीच! आणि तोही माझ्याच काठीने मरणार! असे दावे ते रोजच्या रोज करत असतात. निवडणुकीचे सोडा, पण फॅसिस्ट शक्तीच्या विरोधातील लढ्यात भांडवली पक्षांबरोबर युती होणे शक्य नाही, हे आपण समजू शकतो, पण क्रांतिकारकांची क्रांतीकारकांबरोबरसुद्धा युती होत नाही. प्रत्येकाचे प्रोटेस्टसुद्धा वेगळे वेगळे असतात. प्रत्येकाला आपले पावित्र्य म्हणा किंवा वोटबँक टिकवायची चिंता आहे. जातीची वोटबँक बनविणे सोपी असल्याने, काहींनी गेल्या शतकापासूनच जाती जोडून सत्तेवर येता येते हे सिद्ध केले, परंतु ते हे विसरले की ज्या उत्तरप्रदेशातही सत्ता आली, तिथे आज योगीच्या अनन्वित अत्याचाराविरोधी आंबेडकरी आंदोलन का सक्षमपणे लढत नाही?? लढत आहे ती भीम आर्मी !!

जातीच्या जोडाजोडीने प्रत्येक जातीतील धनदांडगे एकत्र येतात आणि आपल्याच जातीचे शोषण करतात हे आता पुरसे स्पष्ट झाले आहे. एवढा मोठा इतिहास साक्षी असताना काही लोकांना पुन्हा जाती जोडून सत्तेवर येण्याची स्वप्न पडत आहेत. पण हे लोक पुर्वीच्या जाती जोडोवाल्यापेक्षा हुशार असल्याने तोंडाने जातीअंताची भाषा बोलत बोलत कार्यक्रम मात्र, जाती उद्धाराचा राबवत आहेत. साम्यवादी आणि आंबेडकरवादी नव्या प्रश्नाना नवी उत्तरे शोधण्यापेक्षा नव्या प्रश्नाला जुनी उत्तरे देत बसले आहेत.

या देशातल्या जनतेला सगळ्यात मोठा धोका दिला आहे तो या विखुरलेल्या विरोधकांनी !! हे मूलतः सच्चे विरोधक नाहीत तर सत्तेसाठी कुठुनही कुठेही उड्या मारणारे सबगोलंकारी लोक आहेत, त्यामुळे हे फॅसिस्ट शक्तीबरोबर लढतील असली तरी आशा बाळगणे म्हणजे अंधाराला फुले येण्याची वाट बघण्यासारखे आहे.

अश्या काळात जनता आपले मार्ग शोधते, त्याचे प्रत्यंत्तर दिल्ली येथे सुरू झालेल्या स्त्रियांच्या आंदोलनातून येतो. आज शाहीनबागच्या माध्यमातून गेले दोन महिने देशाच्या कानाकोपऱ्यात लक्षावधी स्त्रिया चिवटपणे आणि अहिंसेच्या मार्गाने लढत आहेत. या ठिकाणी काही मोजके नेते पोहोचले. त्यांनी तोंडी या लढ्याला पाठींबा दिला आहे, पण त्यांच्या प्रभाव क्षेत्रात हे लोक लढताना दिसत नाहीत. एकट्या मुसलमान स्त्रिया बसून आहेत. अपवाद म्हणून काही हिंदू आणि शीख स्त्रिया त्यांच्यासोबत दिसत आहेत. आंबेडकरी स्त्रिया काही ठिकाणी मुस्लिम स्त्रियांच्या सोबत दिसत आहेत. पण आंबेडकरी आंदोलन या ठिकाणी गैरहजर आहे.

अश्या काळात मी आशेचा किरण म्हणून स्त्रियांकडे पाहतो. सर्व धर्मातील शोषित स्त्रिया या काळात एकत्र येऊन त्याच्या पद्धतीने लढतील, असा आशावाद मला वाटतो. स्त्रियांच्या ब्राह्मणीकरणाची प्रक्रिया अजून पूर्ण झाली नाही, असे माझे निरीक्षण आहे. या स्त्रियाच उद्याची वाट दाखवतील. शोषित पुरुषांनी आपल्या पुरुषसत्तेचे उसने ओझे फेकून देऊन या स्त्रियांच्या मागे उभे राहावे.

-लोकशाहीर संभाजी भगत

Updated : 29 Feb 2020 6:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top