Home > पर्सनॅलिटी > अनाथांच्या आयुष्यात सुर्योदय आणणारी माय

अनाथांच्या आयुष्यात सुर्योदय आणणारी माय

अनाथांच्या आयुष्यात सुर्योदय आणणारी माय
X

‘अनाथांची माय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचा आज वाढदिवस आहे. सिंधूताईंचा जिवन प्रवास फार खडतर ठरला आहे. यातूनच त्यांना अनाथांची सेवा करण्याची प्रेरणा मिळाली.

सिंधू ताईंचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी वर्धा येथे झाला. त्यांच्या आई वडिलांना नको असताना मुलगी झाली म्हणून त्यांचं नाव चिंधी ठेवले.

ही चिंधी लहानपणापासूनच बुद्धिमान असली तरी परिस्थितीमुळे तिला चौथी पर्यंतच शिकता आलं. खेळण्या बागडण्याच्या वयातच म्हणजे अवघ्या नवव्या वर्षी तीचं लग्न वयाने २६ वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झालं. लग्नानंतर त्यांना सासरी मिळालेल्या म्हणजेच 'सिंधू' या नावाने ओळखले जाऊ लागले. पुढे वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत त्यांची तीन बाळंतपणं झाली होती. चौथ्या वेळी गर्भवती असताना पतीने चारित्र्यावर संशय घेतला आणि घराबाहेर काढलं.

इथुन सुरु झाला तिच्या आयुष्याचा संघर्ष... आणि मग या सिंधूताईने आपलं दु:ख मागे सारत खडतर परिस्थितीतून स्वत:ला सावरलं. पूर्वीची चिंधी आता अनाथांची माय ‘सिंधुताई’ झाली होती. आपल्या मुलीसोबत अनेक अनाथ मुलांना देखील स्वत:च्या पोटाशी कवटाळलं आणि त्यांचं पालन पोषन केलं. गरज पडेल तेव्हा आपल्या मुलीकडे दुर्लक्ष करत अनाथ मुलांना आधार दिला. आपल्या समाजात मुलगी जन्मली की.. ती नकोशी होते. आणि कुठेतरी रस्त्याच्या कोपऱ्यावर अथवा कचरा पेटीत फेकून दिली जाते. सिंधूताईंनी अशाचं नकोशी मुलींना आपल्या पदरात घेतलं आणि त्यांना जपलं. आणि अनाथ मुलांना देखील सांभाळल.

१९९४ साली त्यांनी पुण्यात पुरंदरमध्ये पहिला अनाथआश्रम आपली मुलगी ममता हिच्या नावाने सुरू केला. आजतागायत त्यांचा हा प्रवास अथकपणे चालू आहे. त्यांच्या छायेत वाढलेली अनेक मुलं आज यशाच्या शिखरावर ठाम उभी आहेत.

“एकट्या बाईचे लचके तोडणाऱ्या समाजातल्या जीवंत भुतांपेक्षा, स्मशानातली भुतं कैकपटीनं चांगली” असं बेधडकपणे सांगणारी आणि अनाथांसाठी जगणारी ही माय आज ७२ वर्षांची झाली आहे. ‘मॅक्सवुमन’ परिवारातर्फे माईंना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा...

Updated : 14 Nov 2019 9:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top