Home > रिपोर्ट > गरोदर बाईतला कम्युनिस्ट रशिया

गरोदर बाईतला कम्युनिस्ट रशिया

गरोदर बाईतला कम्युनिस्ट रशिया
X

रशियात कट्टर कम्युनिस्ट राजवट होती. पोलादी पडदा होता. त्यामुळे काहीही कळणे मुश्कील. अशा रशियाचे वर्णन चर्चिल सायबाने आपल्या तिरकस ब्रिटीश शैलीत करून ठेवले आहे. रशिया म्हणजे एका रहस्याच्या पोटात दडलेले, गूढात लपेटलेले, एक कोडे आहे! (It is a riddle, wrapped in a mystery, inside an enigma.) थोडक्यात रशियाबद्दल आम्हाला काहीही माहित नाही आणि काही माहित होण्याची शक्यताही नाही.

गरोदरपणी होणारा असाच एक आजार आहे. ज्याबद्दल आम्हाला काहीही माहित नाही आणि काही माहित होण्याची शक्यताही सध्या धूसर आहे. हा आजार म्हणजे रहस्याच्या पोटात दडलेले, गूढात लपेटलेले, एक कोडे आहे! एरवी माझ्यासकट तमाम डॉक्टर, ही नाहीतर ती, अशी काहीतरी माहिती सांगायला, हिरीरीने लिहित असतात. पण आज मी काहीही माहित नाही हे सांगायला लिहितो आहे. उद्या जर, ‘कोणता शोध लागला तर हमखास नोबेल मिळेल?’ असे विचारले, तर ह्या रोगाच्या कारणांचा शोध लावेल त्याला/तिला तो नक्की मिळेल यावर साऱ्या डॉक्टरांचे एक मत होईल.

हा आजार दहातल्या एका तरी गरोदर स्त्रीला होतो.

याला म्हणतात पीआयएच (Pregnancy Induced Hypertension). इतरही नावे आहेत. पण आपल्या पुरते हे एकच पुरे. जगातल्या एकूण बाळंतपणांपैकी बरीच बाळंतपण भारतात होतात. पण तरीही एकाही भारतीय भाषेत अथवा पारंपारिक शास्त्रात, आयुर्वेदात, याला विशिष्ठ नावच नाही! म्हणजे आजार म्हणून याची ओळख करून घेण्यात आपण कमी पडलो. म्हणजे कसला कसलेला बहुरूपी आहे हा आजार, ते बघा. त्यामुळे माझ्यापुरता मी या आजाराला ‘बाळंतवात’ असा शब्द शोधला आहे आणि आता इथून पुढे योजला आहे.

यात पाचव्याच्या पुढे ब्लडप्रेशर वाढते आणि लघवीतून प्रथिने वाहू लागतात. (पाचव्याच्या आतच हे सगळे घडले तर त्याची कारणे भिन्न असू शकतात.) ब्लडप्रेशरला किती महत्व द्यायचे आणि प्रथिनपाताला किती, हे निकष जरा जरा बदलत असतात. बहुतेकदा हातापायावर सूजही येते. सुजेला पूर्वी महत्व होतं. आता ते तेवढं राहिले नाही. याच्याच टोकाच्या अवस्थेत त्या बाईला झटके येतात. याला म्हणतात ईक्लाम्पशिया. शब्दशः अर्थ वीज पडणे. तडीताघातासारखेच केंव्हाही, अचानक झटके येऊ लागतात, तेंव्हा ‘बाळंतवात’ हे नाव सार्थच म्हणायचे.

बऱ्याच पेशंटला विशेष काही होत नाही. ब्लडप्रेशर वाढते, सूज येते, प्रथिनपात होत रहातो; पण हे सारं सौम्य प्रमाणात होत रहाते. पुढे डिलिव्हरी होते आणि सारे बिघाड आपोआप विरून जातात. झाले तर पुन्हा पुढच्या बाळंतपणात होतात.

काही वेळा मात्र बराच बिघाड घडतो पण बराच बिघाड घडूनही पेशंटला काही होत नाही आणि हेच फार त्रासाचे ठरते. काहीही होत नसलेल्या पेशंटला जेंव्हा, ‘तुमचे ब्लडप्रेशर फार जास्त आहे, तुम्ही गंभीररित्या आजारी आहात, ताबडतोब अॅडमिट व्हा’, असे कोणी डॉक्टर सांगतो तेंव्हा अर्थातच पेशंटचा त्यावर विश्वास बसत नाही. पेशंट म्हणतात, ‘असं कसं वाढलं? आम्ही तर तुमच्याकडे पहिल्यापासून तपासतोय!’ मग मी सांगतो, ‘मी तपासतोय आणि व्यवस्थित तपासतोय, म्हणूनच तर ही गोष्ट लक्षात आली. नीट तपासलंच नाही तर ही गोष्ट कळणारच नाही. प्रॉब्लेम वेळीच लक्षात आल्याबद्दल अभिनंदन; माझं!!’ प्रत्येकवेळी बारकाईने तपासत राहणे एवढेच डॉक्टर करू शकतात आणि करतात. आत्ता सगळे काही ठीक आहे, असे म्हणता म्हणता गंभीर दुष्परिणाम घडवणारा असा हा बिलंदर बाळंतवात आहे.

प्रत्यक्षात ज्यावेळी पेशंटला काही व्हायला लागते तेंव्हा गोष्टी फार पुढच्या थराला गेलेल्या असतात. पायावर, शरीरावर, प्रचंड सूज, असह्य डोकेदुखी, उलट्या, दृष्टी मंदावणे, नजरेसमोर लाईट दिसणे, पोटात दुखणे, अंगावरून रक्तस्राव, झटके येणे... असे काही होणे म्हणजे परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याच्या खुणा. परिस्थिती बिकट होण्याआधी काही पूर्वसंकेत मिळेलच असे नाही.

मुळात बाळंतवाताची लक्षणे आणि दुष्परिणाम जरी पाचव्याच्या पुढे दिसत असले तरी त्याची सुरवात होते अगदी दुसऱ्या तिसऱ्या महिन्यात. बाळाकडे भरपूर रक्त जावे म्हणून वारेकडे जाणाऱ्या आईच्या रक्तवाहिन्यातील स्नायू गरोदरपणात लोप पावतात. मग ह्या रक्तवाहिन्या मुळी आकुंचनच पावत नाहीत. त्या अगदी लेवाळ्या होतात. त्यांचा व्यास वाढतो. रक्तप्रवाह कित्येकपट वाढतो. (वाचकांतील इंजिनीअर लोकांना माहितच असेल की नलिकेतील प्रवाह हा थेट व्यासाच्या चौथ्या घातानुसार बदलतो. Flow is directly proportional to r4) आईच्या रक्तवाहिन्यातील स्नायुलोप ही बाळाच्या वारेची किमया. वारेच्या पेशी आईच्या रक्तवाहिन्यात घुसून त्यातील स्नायू नष्ट करतात. पण आपल्यात घुसून आईच्या रक्तवाहिन्यांनी स्नायू नष्ट करू दिले तर! म्हणजे इथे जरा समजुतीनी घ्यायचा प्रश्न येतो. अशी समज आपल्या प्रतिकारशक्तीमध्ये असते. केंव्हा प्रतिकार करायचा आणि केंव्हा भिडू आत सोडायचा याचे पक्के आराखडे, ठोकताळे असतात. बहुतेक आयांची प्रतिकारशक्ती, बहुतेक वेळी हे बिनबोभाट होऊ देते. काही वेळा मात्र हे गणित चुकते. मग स्नायू लोप पावण्याची क्रिया होतच नाही.

यामुळे अनेक घोटाळे होतात. स्नायू लोप न झाल्यामुळे या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, मग बाळाला रक्त पुरं कसं पडणार? मग ते रोडावते. जसजसा बाळाचा रक्त पुरवठा कमीकमी होतो तसतसे आपोआपच बाळ मिळतंय ते रक्त, नीट जपून वापरायला लागते. मग आहे तो प्रवाह मेंदूकडे वळवला जातो. मग बाळाच्या किडनीकडे रक्त कमी जाते. मग बाळाला शू कमी होते. शू कमी झाल्यामुळे बाळाभोवतीचे पाणी आटते. येस!! बाळाभोवतीचे पाणी म्हणजे बव्हंशी बाळाची शू असते!! हे पाणी आटले की अनेक गोच्या होतात. हातापाय नीट न हलवता आल्यामुळे सांधे आखडतात. हेच पाणी श्वसनाच्या हालचाली बरोबर फुफ्फुसात आतबाहेर होत असते. यामुळे फुफ्फुसाची वाढ होत असते. पाणी कमी असेल तर फुफ्फुसाची वाढ नीट होत नाही. पूर्वी ह्या कशाचाही पत्ता लागायचा नाही. नुसते पोट तपासून काय कळणार? आता सोनोग्राफीच्या तंत्रांनी सगळच बदलले आहे. रक्तप्रवाहाची मोजमापे घेऊन खूप काही समजते. बाळाचे नेमके वय किती? ते सुपोषित आहे का कुपोषित? निव्वळ अन्नाला मोताद आहे, का आता ऑक्सिजन कमी पडल्याने गुदमरले आहे? कलर डॉपलरमध्ये हे सगळे कळते आणि त्यानुसार निर्णय घेता येतो.

आईचे ब्लडप्रेशर का वाढते हे नेमके माहित नाही. असं म्हणतात की बाळाकडून आईकडे काही द्रव्ये जातात आणि परिणामी आईला हा त्रास जडतो. ब्लडप्रेशर वाढल्याचा परिणाम आईच्या प्रत्येक अवयवावर होतो. किडनीवर परिणाम झाला की प्रथिनपात होऊ लागतो. याने आईला अशक्तपणा, सूज वगैर मालिका सुरु होते. कधी किडनी बंद पडते. मग डायलिसीसला पर्याय उरत नाही. मेंदूच्या रक्तपुरवठ्यात गोच्या होतात. परिणामी झटके येतात किंवा दृष्टी जाते किंवा दोन्ही होते. कधी लिव्हर नीट काम करत नाही. मग तिथली विषारी रसायने साठून रहातात. कावीळ होते. रक्त साकळणे हे लिव्हरवरही अवलंबून असते. मग ती क्रिया मंदावते. कल्पना करा, जर रक्तच साकळले नाही तर प्रसूतीनंतर किती रक्तस्राव होईल? जाईल न ती बाई! नव्हे आजार तीव्र असेल तर जातेच! उत्तम काळजी घेऊनही जाते!!

नेमका कोणाला, केंव्हा, कितव्या महिन्यात त्रास सुरु होईल, हे सांगता येत नाही. ब्लडप्रेशर कोणत्याही महिन्यात वाढू शकते. झटके कोणत्याही महिन्यात येऊ शकतात. अगदी प्रसूतीवेळी किंवा प्रसूतीनंतरसुद्धा, अचानक ब्लडप्रेशर वाढून झटक्यापर्यंत गोष्टी जाऊ शकतात. ब्लडप्रेशर कधी वाढेल हे सांगता येत नाही, कुणाचे वाढेल हे सांगता येत नाही, किती वाढेल हे सांगता येत नाही. सांगता फक्त एकच गोष्ट येते...जर ब्लडप्रेशर वाढलं तर प्रसूती हाच उपाय आहे. महिना कुठलाही असो, प्रसूती होताच ब्लडप्रेशर कंट्रोल होते. विश्रांती, अळणी अन्न, प्रथिनयुक्त आहार वगैरेंचा उपयोग एकच, आपण काहीतरी करतोय हे कृतक समाधान. प्रत्यक्षात परिणाम शून्य! तेंव्हा ‘विश्रांती घ्या’, ह्या सल्याचे पालन तारतम्याने करावे. उगाच गोठ्यात म्हैस बांधल्यासारखे पेशंटला कॉटला बांधून ठेऊ नये!

गोळ्या-औषधांचासुद्धा फारसा उपयोग होत नाही. मग डॉक्टर एवढ्या भारंभार गोळ्या का देतात? डिलिव्हरी होईपर्यंत ब्लडप्रेशर तात्पुरते, पण तात्काळ कमी करण्यासाठी देतात. दिवस भरले नसतील तर प्रसूती थोडी पुढे ढकलता यावी म्हणून देतात. अशावेळी बाळाच्या फुफ्फुसांची वाढ लवकर व्हावी म्हणून काही इंजेक्शने दिली जातात, ह्यांचा परिणाम होईपर्यंत ब्लडप्रेशर ताळ्यावर रहावे म्हणून देतात. गोळ्यांचा उपयोग मर्यादित आहे हे जाणूनच देतात. झटके येऊ नयेत म्हणूनही इंजेक्शने असतात. या दरम्यान डॉक्टर; पेशंट आणि बाळावर सक्त नजर ठेऊन असतात. प्रत्येक वेळी डॉक्टर स्वतःलाच दोन प्रश्न विचारतात. सध्या बाळ पोटात सुरक्षित आहे, का पेटीत? (पेटीत म्हणजे इन्क्युबेटरमध्ये) आणि बाळ पोटात बाळगणे आईसाठी सुरक्षित आहे का? ‘पोटात का पेटीत?’ या प्रश्नाचे उत्तर ‘पेटीत’ असं येईल त्यादिवशी सरळ प्रसूती करण्याच्या मागे लागतात. तो दिवस कधी उगवेल हे सांगता येत नाही. कधीकधी तर परिस्थिती इतकी अस्थिर असते की हा प्रश्न रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ विचारला जातो आणि त्यानुसार उपचार ठरवले जातात. एकदा प्रसूती करायची असे ठरले की कळांची औषधे देऊन प्रयत्न करायचा का थेट सीझर हे ही ठरवले जाते.

शिवाय पोटात का पेटीत ह्या प्रश्नाचे उत्तर निव्वळ वैद्यकीय नाहीये. दिवस कमी म्हणजे किती कमी? बाळ अशक्त म्हणजे किती अशक्त? गुदमरलेले म्हणजे किती? अपुऱ्या दिवसाच्या, अशक्त, गुदमरलेल्या बाळाची काळजी घेणारी खास एनआयसीयु जवळ आहेत का? असल्यास अशा ठिकाणी बाळाला ठेवायची तयारी आहे का? बाळ अगदीच लहान असेल तर त्याच्या पुढील वाढीबद्दलची अनिश्चितता कुटुंबियांना माहित आहे ना? आणि मान्य आहे ना? कुटुंबियांची हा सगळा खर्च करायची क्षमता आणि तयारी आहे का? थोडक्यात प्रश्न वित्तीय तर आहेच पण प्रश्न वृत्तीचाही आहे. ह्या दोन्ही गोष्टी कुटुंबांगणिक भिन्न असतात. ह्या सगळ्या उत्तरांची गोळाबेरीज करून हा निर्णय कुटुंबीयांनी घ्यायचा आहे. डॉक्टरांनी नाही!!

आता रंगीत सोनोग्राफीच्या मदतीने बाळाकडे जाणारा रक्तप्रवाह मोजता येतो. पुढे तो कमी होणार आहे हे भाकीतही आता वर्तवता येते. शिवाय आईचे रक्त तपासून काही ठोकताळे बांधता येतात. परंतु मॉन्सूनच्या अंदाजाइतकाच हा ही अंदाज बेभरवशाचा आहे. बाळंतवात उद्भवणे भगवान भरोसे असल्यामुळे, प्रतिबंधक उपायही फारसे नाहीत. पण तुका म्हणे त्यातल्या त्यात, ह्या उक्तीला जागून आम्ही डॉक्टर असे अंदाज बांधत असतो आणि प्रसंगोपात तोंडघशी पडत असतो. तोंडघशी पडत असतो असे म्हटले कारण अंदाज आणि तो चुकणे, ह्याला पेशंटच्या भाषेत थेट निष्काळजीपणा एवढाच शब्द आहे. पण पुढे बीपी वाढणार असा काही सुगावा लागला तर अॅस्पिरीनची अल्प मात्रेतली गोळी देतात. हिपॅरीनची इंजेक्शन देतात. आधीच्या खेपेला बीपी वाढलेल्या बाया, मुळातच आधी बीपी जास्त असणाऱ्या बाया, काही ऑटोइम्यून आजार असलेल्या बाया (SLE), वयस्कर, जाड्या, जुळी/तिळी वगैरे असणाऱ्या बाया, अशा सगळ्या अतिजोखीमवाल्या! ह्यांच्यात बाळंतवाताची बाधा अधिक. औषधांमुळे बीपी वाढणे पूर्णतः टळत नाही पण निदान त्याची तीव्रता कमी रहाते. वाढायचेच झाले तर थोडे उशिरा बीपी वाढते. दरम्यान बाळ आणखी थोडे मोठे झालेले असते.

प्रसुतीनंतर आधी सांगितल्याप्रमाणे ब्लडप्रेशर आटोक्यात येते. अर्थात ते आटोक्यात आहे ना हे तपासावे लागतेच. सहा आठवड्याच्या वर जर ते वाढलेलेच राहिले, तर पुढील तपासण्या कराव्या लागतात. तीव्र बाळंतवात झाला असेल तर सुमारे ४०% बायकांना पुढच्या खेपेला पुन्हा हा त्रास जडू शकतो.

तर असा हा बाळंतवात. सगळ्यानाच वात आणणारा आजार आहे. ज्या दिवशी हे रहस्याच्या पोटात दडलेले, गूढात लपेटलेले, कोडे उलगडेल तो दिवस आरोग्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल हे निश्चित.

डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई

Updated : 26 April 2019 12:59 PM IST
Next Story
Share it
Top