Home > रिपोर्ट > कोरोना आणि साबण...

कोरोना आणि साबण...

कोरोना आणि साबण...
X

आज सकाळी लिलावती हॉस्पीटलमध्ये गेलो. दारात सुरक्षा तपासणी झाल्यानंतर सॅनिटायझरने हात पुसून आत जायचं, असा शिरस्ता होता. सुरक्षारक्षक असोत की कारकून वा परिचारिका सर्वांनी तोंडाला मास्क बांधलेले. औषधं घ्यायला हॉस्पीटलच्या केमिस्टकडे गेलो. मिनिटाभरात चार-दोन ग्राहकांनी मास्कची चौकशी केली. मास्क संपलेले आहेत, केव्हा येतील माहीत नाही, असं उत्तर मिळालं.

सॅनिटायझर्स?

दुपारी येतील. किती वाजता ते नेमकं सांगता येणार नाही. कोरोना (Corona Virus) व्हायरसपासून मास्क आणि सॅनिटायझर्स आपलं रक्षण करतील अशी लिलावती इस्पितळातील डॉक्टर, कर्मचारी, पेशंट, पेशंटचे आप्त अशी सर्वांचीच धारणा होती.

वास्तविक कोरोना विषाणूचा खात्रीलायक नाश कोणताही साबण करतो. या विषयावर न्यूयॉर्क टाइम्सने एक सविस्तर लेखच प्रसिद्ध केला आहे. कोरोना किंवा अन्य विषाणूंची रचना आणि साबणाच्या रेणुंची रचना यांची सविस्तर माहिती देऊन विषाणूच्या नाशाची प्रक्रिया कशी घडते हे सदर लेखात विशद केलं आहे. कोणत्याही विषाणूच्या बाह्य आवरणावर काटे असतात. ह्या काट्यांचा विद्ध्वंस साबणातले रेणू करतात. काट्यांसोबत बाह्यावरणही फाटतं त्यामुळे विषाणूमधील प्रथिनं आणि अन्य द्रव्याचाही नाश होतो.

सॅनिटायझर्सपेक्षा साबणाचा वापर का विश्वसनीय आहे याचंही विवेचन सदर लेखात आहे. परंतु साबण हे उत्पादन मध्ययुगातलं आहे. सॅनिटायझर हे प्रगत तंत्रज्ञानाचं उत्पादन आहे असा आपला विश्वास असल्यामुळे आपण सामान्यतः सॅनिटायझरला पसंती देतो. लिलावती हॉस्पीटल पंचतारांकित समजलं जातं त्यामुळे तिथे प्रगत तंत्रज्ञानालाच मागणी असते.

प्राचीन ईजिप्तमधले लोक कपडे धुण्यासाठी साबणसदृश्य उत्पादनाचा वापर करायचे. रोम साम्राज्यातही अंग आणि कपडे स्वच्छ करण्यासाठी साबणसदृश्य उत्पादनं होती. परंतु तो साबण नव्हता. त्याचं सार्वत्रिकीकरण झालेलं नव्हतं. गरीबांना साबण परवडतही नव्हता. युरोपातल्या अंधार युगात रोम साम्राज्यच विस्मृतीत गेलं होतं. एवढ्या मोठ्या टोलेजंग प्रासादांमध्ये कोण लोक राह्यचे, कसे राह्यचे असे प्रश्न लोकांना पडत. बहुसंख्य जनता लाकडाच्या घरांमध्ये राहू लागली होती. पॅलेस्टीनमधील पवित्र मंदिरं ताब्यात घेण्यासाठी युरोपातून क्रूसेडस (क्रूस हाती घेतलेले योद्धे) अरबस्थानात जाऊ लागल्या. त्या काळात, शस्त्रं, तंत्रज्ञान, विज्ञान सर्वच बाबतीत अरब प्रगत होते तर युरोपियन मागासलेले होते.

युरोपातून येणाऱ्या या धर्मयोद्ध्यांच्या अंगाला दुर्गंधी येत असे असं अरबांनी नोंदवलं आहे. युरोपियन लोक आंघोळ करताना साबण वापरत नसत वा कपडे धुण्याचा साबणही त्यांच्याकडे नव्हता. त्यामुळे युरोपियन सैनिकांच्या अंगाला दुर्गंधी येत असे. कपडे स्वच्छ धुणं आणि आंघोळ करणं या दोन्ही बाबींना इस्लाममध्ये धार्मिक मूल्य आहे. त्यामुळे मुसलमानांनी साबण बनवण्याची सोपी, स्वस्त आणि ठोक उत्पादन करणारी पद्धत शोधून काढली, इस्लामी जगतात साबणाचा वापर सार्वत्रिक झाला.

शांपूचा म्हणजे केस धुण्याच्या साबणाचा शोधही मुसलमानांनीच लावला. इंग्लडमध्ये एका मुसलमानाने हमामखाना उघडला. ब्रिटीश लोक तिथे आंघोळीला येत. या हमामखान्यात शांम्पूचा वापर करून केस धुतले जात. १७५९ मध्ये जॉर्ज सहावा, या इंग्लडच्या राजाने या मुसलमानाची आपला वैयक्तीक शांपू सर्जन म्हणून नियुक्ती केली होती.

आपल्या देशातही साबण अरबस्थान वा इराणमधूनच आला. तुकाराम महाराजांचा अभंग—नाही निर्मळ जीवन, काय करील साबण, आजही उद्धृत केला जातो. तुका म्हणे जीवने विण, पिक नव्हे नव्हे जाण असा या अभंगाचा शेवट आहे. या अभंगात जीवन म्हणजे पाणी असा अर्थ आहे. पाणी स्वच्छ नसेल तर साबण काय करणार वा पाणी नसेल तर पिक नाही, असं तुकाराम महाराज सांगतात.

अरब मुसलमानांनी साबण बनवण्याची जी पद्धत मध्य युगात शोधून काढली तिच्यामध्ये कोणतेही मूलभूत बदल न करता आजही साबण बनवला जातो. म्हणजे अंगाचा साबण. डिटर्जन्ट म्हणजे कपडे धुण्याचे साबण औद्योगिक क्रांतीनंतरच बनवले जाऊ लागले.

कोरोना विषाणूचा प्रसार शिंक वा खोकल्यातील द्रवबिंदूंतून होतो. हे द्रवबिंदू धातूच्या वा बिगर धातूच्या पृष्ठभागावर काही तास जिवंत राहातात. आपल्या हातावर ते काही मिनिटंच जिवंत राहातात. मात्र यावेळी आपला नाकाला वा डोळ्याला हात लागला तर ते आपल्या शरीरात विशेषतः श्वासनलिकेत, फुफ्पुसात प्रवेश करतात. त्यामुळे वारंवार साबणाने हात स्वच्छ धुणे आणि साबणाने हात स्वच्छ केल्याशिवाय डोळ्याला वा नाकाला वा चेहेर्याकला स्पर्श करायचा नाही हे पथ्य पाळणं गरजेचं आहे.

ही बाब सोपी भासली तर प्रत्यक्षात अंमलात आणणं खूप कठीण आहे. कारण डोळ्याला वा तोंडाला वा नाकाला आपण प्रतिक्षिप्त क्रियेनुसार स्पर्श करतो. म्हणून तर स्वच्छताच नाही तर जंतुसंसर्गाबद्दल कमालीची खबरदारी घेणाऱ्या म्हणजे हायजिन पाळण्याची खबरदारी युरोपियन राष्ट्रांतही कोरोनाचा प्रसार झाला आहे. इटलीमध्ये वैद्यकीय आणीबाणी जाहीर करण्यात आलीय. जागतिक आरोग्य संघटनेच्या नोंदीनुसार ११४ देशांतील १२४,००० लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यापैकी ६८,००० लोक पूर्णपणे बरे झाले आहेत असं जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाचा डेटा सांगतो.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार एकूण ४,६०० कोरोना बाधित लोक मृत्यूमुखी पडले आहेत. चीन, इटली, दक्षिण कोरीया आणि इराण या चार देशांमध्ये कोरोना विषाणूने बाधित लोकांची संख्या सर्वाधिक आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे. या विषाणूचा सामना करण्याची क्षमता अनेक राष्ट्रांकडे नाही तर काही राष्ट्रांकडे क्षमता आहे पण पैसा म्हणजे संसाधनं नाहीत, असं निरीक्षण जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अँढेनोम घेब्रेयेसस यांनी नोंदवलं आहे.

आरोग्याचं उत्पादन कोण करतं? व्यक्ती वा लोक, बिरादरी वा समूह, संस्कृती, सरकार की खाजगी कंपन्या? असा प्रश्न उपस्थित केला तर प्रत्येक घटकाचं महत्व ध्यानी येईल. औद्योगिक क्रांतीपूर्व क्रांतीच्या काळात आरोग्याच्या उत्पादनात व्यक्ती, बिरादरी, संस्कृती यांचा सिंहाचा वाटा होता. औद्योगिक क्रांतीनंतर नवीन उत्पादनं आली. संशोधनाची, शोधाची गंमत अशी असते की शत्रूलाही त्याचा स्वीकार करावा लागतो. मुसलमानांचा तिरस्कार करणाऱ्या विविध धर्माच्या वा निधार्मिक लोकांना साबणाचा उपयोग टाळता येत नाही.

आयुर्वेदाचा पुरस्कार करणाऱ्या रामदेवबाबाला शस्त्रक्रियेसाठी परदेशात जावंच लागतं. अमेरिकेतही लाखो लोक योगासनं करतात. व्यक्ती, बिरादरी आणि संस्कृती यांना टाळून आरोग्याचं उत्पादन करता येत नसतं. आपण आज जो साबण वापरतो आहोत त्याचा शोध मध्य युगात अरबी मुसलमानांनी लावला. भारतच नाही तर जगभरच्या संस्कृतीने हे उत्पादन आपलंस केलं. कोरोनाचा सामना करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय साधनसुविधा व पैसा सर्व राष्ट्रांकडे नसतीलही परंतु साबण नावाचं स्वस्त, सर्वांना परवडण्याजोगं उत्पादन आपल्याला हाती आहे. त्याचा उपयोग संस्कृतीमध्ये रुजवला तर कोरोनाच्या प्रसाराला पायबंद घालता येईल.

Updated : 16 March 2020 6:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top