एड्सबाधित अनाथ मुला-मुलींची माऊली.
Max Woman | 18 Jun 2019 5:49 AM GMT
X
X
तू समाजाचे काहीतरी देणं लागतेस. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. अशी शिकवण तिला घरापासून मिळाली. तिचा संघर्ष हा कुटुंबाशी नव्हता तर तिचा संघर्ष होता हा समाजासोबत… अशी ही संघर्षातून धाडसाने उभी राहिलेली डिंपल घाडगे.
डिंपलचा जन्म सुशिक्षित,ऐश्वर्यसंपन्न घरात झाला असला तरी त्यांना लहानपणापासूनच सामाजिक जाणीव होती. गेली अनेक वर्षे एड्सबाधित अनाथ मुला-मुलींना सांभाळण्याचे शिवधनुष्य हाती घेतले आहे.काहीवर्षापुर्वी पंढरपूर तालुक्यातील एका खेडेगावात दोन मुलींना नातेवाईकांनी जनावरांच्या गोठ्यात ठेवल्याचे त्यांच्या आईला (मंगलताई शहा) समजले.त्यांनी डिंपल यांना सोबत घेऊन त्यागावी आल्या.त्या मुलींचे आई-वडिल एड्समुळे मरण पावले होते.जर दोन मुलींना घरात ठेवले तर नातेवाईकांना पण एड्स होईल या भितीने त्यांना नातेवाईकांनी गोठ्यात ठेवले.दोन मुलींना पंढरपुरात आणून मंगलताई-डिंपल सांभाळू लागल्या.त्याचवेळी प्रभाहिरा प्रकल्पाची २००१ मध्ये पालवी फुटली.
डिंपल यांनी स्वत:चा संसार संभाळत एच.आय.व्ही संसर्गित मुलांची आई बनल्या वेळप्रसंगी वडील सुध्दा बनल्या. डिंपल यांना एवढं शक्य झालं ते त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहिलेल्या पतीमुळे. नातेवाईकांनी, सासरच्या मंडळींनी वाळीत टाकले तरी पतीने त्यांची साथ कधीच सोडली नाही तर वेळोवेळी मार्गदर्शन, प्रोत्साहनच दिले.
सध्या त्यांची आकाश आणि तेजस ही दोन्ही मुलं पालवीची संपूर्णपणे जबाबदारी आनंदाने सांभाळत आहेत.आपल्या समाजात आजही एड्स बद्दल जागृती पुरेशी झालेली नाही आणि याच गैरसमजामुळे एड्सने मृत्यूमुखी पडलेल्या पालकांच्या बालकांना अक्षरशः कुठेही टाकून दिले जाते. अशा मुलांची प्रेमाची,वात्सल्याच्या स्पर्शाची गरज हे भागविण्यासाठी पालवी आपले कार्य यथाशक्ती करीत आहे.सध्या एड्सबाधित ११० बालकांचे संगोपन केले जाते.साधारण यात तीन महिन्यांच्या बालकापासून ते बावीस वयाच्या मुलांपर्यंत समावेश आहे.साधारण, तीस वर्षांपासून गोपाळपूर रस्त्यावर कृष्ठरोग्यांच्या वसाहतीमध्ये जाऊन कृष्ठरोग्यांसाठी आरोग्य सुविधा, खाण्यासाठी फळं देणे,स्वयंसिध्दता शिबिर,रस्त्याकडे पडलेल्या मुलांचा सांभाळ करणे त्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवणं अशी अनेक कामे धाडसाने डिंपल करतात.यावरूनच समाजाच्या बुरसटलेल्या विचारांतून आणि नातेवाईकांच्या कुत्सित मानसिकतेतून मात करत ही झाशीची राणी या बालकांना मायेची सावली येत आहे.
Updated : 18 Jun 2019 5:49 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire