Home > रिपोर्ट > पुन्हा एकदा 10 वी 'अ'

पुन्हा एकदा 10 वी 'अ'

पुन्हा एकदा 10 वी अ
X

शाळा हा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. शाळेच्या आठवणी, ते मित्रांसोबतचे किस्से आजही आठवले की चेहऱ्यावर हास्य उमलतं. प्रत्येकालाच आपली शाळा स्पेशल असते. तशी मलाही आहे. त्यातल्या त्यात 10 वी जास्त. आयुष्याच्या एक महत्वाचा टप्पा. शाळा सोडून चार वर्ष झाली पण त्या आठवणी आजही ताज्या आहेत. खूप दिवसांपासून जायचं म्हणत होतो पण योग काही येत न्हवता. पण शेवटी जमवलंच. यावेळी वेळ काढून ख़ास मित्रांना भेटायला म्हणून गावाकडे गेलो.जवळ जवळ पोहचत असताना फोनाफोनी झाली. मी पोहचेपर्यंत हळूहळू सगळे शाळेत म्हणजे खंडोबाच्या देवळात जमले. कट्टा पुन्हा एकदा भरला. ऐकमेकांच्या हातावर टाळ्या देत शाळेतल्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.

आमच्या शाळेची ती दगडी इमारत, लाकडी दंटे, पत्र्याचे वर्ग सगळं सगळं आमच्यासाठी स्पेशल आहे. शाळा खंडोबाच्या देवळात असल्याने त्याचा फील फार वेगळा असायचा. सकाळी सकाळी देवळात आरतीच्या वेळी वाजणारा नगारा वातावरण प्रसन्न करायचा. तसं प्रसन्न वातावरण हे प्रार्थनेच्या वेळीही असायचं कारण आमच्या भिंतीपालिकडचा 10 वी 'ब' तेव्हा आम्हाला न्याहाळायला मिळायचा. अर्थात प्रकरण तेव्हा फ़क्त बघण्यापुरतच मर्यादित होतं. या बाबतीत मी बाकीच्यांपेक्षा जरा लकी होतो.पूर्ण 'ब' ज्या रस्त्याने ये-जा करायचा, त्या बाजूच्या खिड़कीत मी बसायचो. त्यामुळे कोणाला त्याचं 'समवन स्पेशल' दिसलं नाही की सगळे विचारपुस करायला माझ्याकडे. हे समाजसेवेच काम मी नित्यनेमाने एक वर्ष केलं. त्यावेळी याचा फायदा कोणाला झाला नाही, पण आता काही जणांना होतोय असं चित्र दिसतंय. त्यादिवशी सर्वांनी आपापल्या स्रोतांकडून माहिती काढून कोण कुठे 'सेटल' आहे यावर एक दृष्टिक्षेप टाकला. त्याचबरोबर आपल्या 'कार्यकर्तु त्वाचा पाढाही वाचला.असो... ज्या पिंपळाच्या झाडाखाली परिपाठाला उभं राहायचो त्याचठिकाणी सेल्फ़ी काढले. याची त्याची खेचत वेळ गेला.

त्यानंतर आमची टोळी पोहोचली आमचे 10 वीचे वर्गशिक्षक ज. र. कांबळे सरांच्या घरी. आमची बॅच सरांची शेवटची बॅच. त्यामुळे अर्थातच आम्ही स्पेशल आहोत. आम्हाला पाहुन सरांना जरा आश्चर्य वाटलं पण कौतुकही वाटलं. त्यादिवशी पुन्हा एकदा '10 अ' भरला. तोही सरांच्या घरात. सगळ्यांची पुन्हा एकदा हजेरी झाली. कोण कोण काय करतय विचारताना आपल्या मिष्किल स्वाभावात त्यानी सागळ्यांचीच उडवली. गप्पा बऱ्याच वेळ रंगल्या, चहा झाला. शाळेत असताना ज.र. गुरूजी वर्गात आले की अगदी शेवटच्या बाकावरचा मुलगाही शांत असायचा. सरांविषयी आदरयुक्त भीती असायची. पण त्यादिवशी सरांसोबत चहा पितांना केवळ आदर होता. त्यांच्या प्रेमळ बोलण्याने भीती कुठल्या कुठे पळाली होती. शाळेत सर्वात कड़क शिस्तीचे म्हणून ओळखले जाणारे सर निरोप घेताना हात वर करून 'परत या रे बाळांनो' म्हणताना जरा सेंटी झाले होते.

यानंतर मोर्चा वळाला तो बस स्टॅण्डकडे. याच स्टॅण्डवर कधिकाळी आम्ही कल्ला करायचो. स्टैंडच्या कट्टयवरच्या गप्पाही काही औरच असायच्या.गाडीची वाट बघत कित्येक वेळ थांबणे, गाडी आली की मागे पळणे, त्या गर्दीत धक्काबुक्की करत आत घुसने, या सर्व गोष्टी त्यादिवशी पुन्हा डोळ्यासमोर येत होत्या .बालपणीच्या सर्व आठवणी मी पुन्हा त्यादिवशी जगलो. निरोप घेताना साश्रुनयन वगैरे न करता पोरांनी मला इज्जतीत कटवलं. ते शाळेचे दिवस आणि त्या आठवणी जगवणारा हा दिवस निश्चितच अविस्मरणीय राहील.

अंजिक्य गुठे, पत्रकार, मॅक्समहाराष्ट्र

Updated : 13 Jun 2019 8:45 AM GMT
Next Story
Share it
Top