Home > रिपोर्ट > व्यसनाधीनता आणि सेक्स

व्यसनाधीनता आणि सेक्स

व्यसनाधीनता आणि सेक्स
X

अनेक सुशिक्षित पुरुष व महिला असा विचार करतात की, मद्यपानामुळं सेक्समध्ये अधिक मजा येते किंवा त्यात रंग भरले जातात. हा अतिशय मोठा गैरसमज आहे. प्रत्यक्षात लैंगिक क्रिया आणि मद्यपान यांच्यात दुरान्वयेही सख्य, संबंध नाही. मद्यपानामुळं लैंगिक ताकद वाढते, हिच मुळात भ्रामक समजूत आहे.

एका प्रख्यात व्यसनमुक्ती केंद्रात स्त्रियांसाठी विशेष कक्ष सुरु करण्यात आला. त्यावेळी तिथे येणाऱ्या अनेक स्त्रिया या निराशेने ग्रस्त म्हणून व्यसनाधीन झालेल्या आहेत, असे दिसले. धक्कादायक बाब म्हणजे सेक्सच्या आनंदासाठी अनेक पती स्वतः आपल्या पत्नीला व्यसनाधीनतेच्या गर्तेत ढकलत होते. अशाच व्यसनाधीनतेच्या समुद्रात बुडालेल्या नीरजाची ओळख झाली. नीरजा लहानपणापासून आर्थिक संपन्नता नांदत असलेल्या घरात वाढलेली. आई वडिलांची एकुलती एक. अत्यंत लाडात लहानाची मोठी झालेली. घरात आर्थिक संपन्नता असली तरी, नीरजा अतिशय शिस्तीत वाढली होती. अती लाड ना आईला चालत, ना वडिलांना. अशा वातावरणात मोठी होत असताना तिने शिक्षणातही उत्तम प्रगती केली. एका मोठ्या कंपनीत उच्च पदावर काम करत असतानाच तिचे आदेशशी रितसर ठरवून लग्न झालं.

आदेशही वरिष्ठ हुद्द्यावर काम करत होता. पुण्यात दोघांनी मिळून स्वतःचे घर घेतले. तसं सगळं सुरळीत चाललेलं होतं. काही वर्षांतच त्यांच्या संसाराला मुलाची चाहूल लागली, तेव्हा दोघे अतिशय खूष होते. मुलीच्या जन्मानंतर नीरजाने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला, मुलीच्या पालनपोषणात काही कमी राहू नये, असं तिला वाटत होतं. तेव्हापासून तिचं आयुष्यच बदलून गेलं. तिनं केवळ मुलीवर लक्ष केंद्रित केलं. तिचा दिनक्रम मुलीच्याच अवतीभवती आखला गेला. आदेशही आता चांगला कमावत होता. त्यामुळं नीरजानं नोकरी सोडून मुलीकडं लक्ष द्यायला सुरवात केली, याचं त्याला कौतुकच होतं. हळूहळू मुलगी मोठी होत गेली, तसतशी तिला आईची गरज भासेनाशी झाली. तसं नीरजा आणि तिच्या मुलीची अगदी गट्टी होती; मात्र तरीही मुलगी आता आपल्या वयाच्या मैत्रिणींमध्ये रमू लागलेली. आदेश त्याच्या कामात सतत व्यग्र असत. त्यामुळं नीरजाला एकटेपणा जाणवू लागला. ऐन भरात असताना नोकरी सोडलेली. इतकी वर्षे मुलगी सोडून अन्य कोणत्याही गोष्टीचा तिनं विचार केलेला नव्हता. आता १४ वर्षांनी परत नोकरी कशी करायची, हे तिला समजत नव्हतं. या वाढत्या एकाकीपणामुळे तिच्यात आणि आदेशमध्ये खटके उडायला लागले. नाही म्हटलं तरी आदेशकडं नीरजाचं दुर्लक्ष झालेलं होतंच. याबाबत आदेशनं कधी काही बोलून दाखवलं नव्हतं. तोही त्याच्या कामात व्यग्रच असायचा. ऑफिस संपल्यानंतर पार्टी, मिटींग हे रोजचंच झालेलं. यावरुनच एकदा दोघांचं भांडण चालू असताना आदेश नीरजाला म्हणाला, “इतके दिवस तुझं सेक्सकडे दुर्लक्ष झालं, तेव्हा मी काही म्हणालो नाही. जरा स्वत:कडे बघ, किती मागासलेली वाटतेस. माझ्यासोबत पार्टीला, मिटींग्जना तुला कसं नेऊ? साधी बिअरही तू घेत नाहीस.” त्याचं हे वाक्य नीरजाच्या कानात घुमत राहीलं. आपण खरंच सेक्स लाईफकडे खूपच दुर्लक्ष केलं, हे तिला जाणवलं. मग आता काय करावं?, तिनं ही गोष्ट आदेशलाही बोलून दाखविली. या सर्वांवर उपाय म्हणून नीरजानं हळूहळू बिअर घेण्यास सुरवात करावी, असं त्यानं सुचवलं. त्यामुळे सेक्स लाईफही एक्सायटिंग होईल आणि नीरजा ‘सोशल क्लास’मध्येही येईल, असं त्याला वाटलं.

भरपूर वेळ आणि सततचा एकटेपणा यामुळे नीरजानंही ते मान्य केलं. कधी दारुच्या ग्लासालाही स्पर्श न करणारी नीरजा एक दिवस ग्लासच्या ग्लास रिते करू लागली. सुरवातीला आदेश खूष झाला; मात्र, जसजसं नीरजाच पिण्याचं प्रमाण वाढलं, तसा तो त्रासला. आता नीरजा दिवसभर नशेतच राहायला लागली. तेव्हा मात्र आदेशनं तिच्या आई वडिलांशी बोलून तिला व्यसनमुक्ती केंद्रात भरती केलं. समुपदेशनाच्या कित्येक सेशन्सनंतर नीरजा व्यसनमुक्त झाली. या सगळ्यात तिच्या लेकीनं तिला खूप मोलाची साथ दिली. व्यसनमुक्ती केंद्रातून घरी आल्यानंतरही रात्री आदेश तिला थोडी घे, म्हणून आग्रह करायचा, “अग घे थोडी, मग एकमेकांजवळ झोपायला मजा येते,” असं तो सारखं म्हणायचा, पण नीरजा काही केल्या तयार होत नसे. पुढे आग्रहाचं रुपांतर जबरदस्तीत होत गेलं आणि आदेश चक्क तिला मारहाण करायला लागला. शेजारच्याच खोलीत आपली मोठी लेक आहे, तिला हे कळलं तर काय वाटेल? यामुळे नीरजा आदेशचे सारे अत्याचार सहन करत राहिली, मात्र पुन्हा तिनं दारुच्या थेंबालाही स्पर्श केला नाही. एक दिवस मात्र आदेशही हट्टाला पेटला. “आज जर नाही घेतलीस तर, बघतोच तुला..” असं म्हणत तो नीरजाला प्रचंड मारहाण करत होता, ते नीरजाच्या मुलीनं पाहिलं आणि त्याच क्षणी तिनं आपल्या आईचा हात धरला आणि तिला घेऊन घराबाहेर पडली. आईला घेऊन ती थेट आपल्या आजोबांकडे गेली. आपल्या मुलीची अवस्था पाहून आईवडलांच्या पायाखालची जमीनच सरकली. या घटनेच्या वीस वर्षांनंतर नीरजा एक मोठी उद्योजक म्हणून नावा रुपाला आली. तिच्या उद्योगात तिची मुलगी तिला मदत करते आणि आदेश मात्र २० वर्षांपूर्वीच आपली बायको आणि मुलगी गमावून बसला.

नीरजाची ही कहाणी ऐकून अंगावर काटाच आला. आदेशसारखे अनेक सुशिक्षित पुरुष व महिला असा विचार करतात की, मद्यपानामुळं सेक्समध्ये अधिक मजा येते किंवा त्यात रंग भरले जातात. हा अतिशय मोठा गैरसमज आहे. प्रत्यक्षात लैंगिकक्रिया आणि मद्यपान यांच्यात दुरान्वयेही सख्य, संबंध नाही. मद्यपानामुळं लैंगिक ताकद वाढते, हीच मुळात भ्रामक समजूत आहे. याच समजुतीतून अनेक पुरुष वेश्यागमन करताना मद्यपान करून जातात.

थोड्याशा मद्यपानानं मेंदूतील सारासार विवेक आणि वर्तणूक नियंत्रण केंद्रावर परिणाम होतो. या परिणामामुळे व्यक्तीच्या वागणुकीमधले सभ्यपणाचे, समाजात वावरताना सर्वसाधारण पाळावयाचे नियम, शिस्त, संकेत वा संकोच आदी बाबी बाजूला सारल्या जातात. मन उगीचच हलकं झाल्यासारखं वाटतं. त्यामुळंच लैगिक वासना व अश्लील बोलण्याची वृत्ती मोकाट होते. याचा अर्थ दारू कामोत्तेजक आहे, असा मुळीच होत नाही. दारू जास्त झाली की वृत्ती बेताल होऊन जाते. मुळात लैंगिक क्रिया जमताहेत की नाही, हे समजण्याइतकाही मेंदू कार्यरत राहात नाही. आजूबाजूला सगळा भ्रमच तयार होत असतो. मद्यपानाने वासना जागृती होते, असे वाटते; मात्र, याची सवय काही काळाने मनाला लागते. हळूहळू एक-दोन पेगनेही काही होतेय, असे वाटेनासे होते. मग मद्यपानाचे प्रमाण वाढते आणि त्याचे व्यसनच जडते. या सगळ्यात कामभावना पडते बाजूला आणि माणूस होतो व्यसनाधीन! मद्यपानाबद्दल असं म्हटलं जातं की, “इट इन्क्रिझेस डिझायर, बट टेक अवे द परफॉर्मन्स!” याचा अर्थ मद्यपानाने केवळ वासना जागृत होते; मात्र, लैंगिक क्रिया करण्याचे सामर्थ्य मात्र मद्यपीत राहात नाही. केवळ दारूमुळेच नव्हे, तर भांग, गांजा, चरस यांच्यामुळेही कामवासना प्रदीप्त होते, असं मानणारे खूप जण आहेत. पण, जे दारुच्या बाबतीत, तेच अन्य व्यसनांच्या बाबतीतही लागू आहे. कोणत्याही प्रकारच्या व्यसनांमुळे माणसाची सारासार विवेकबुद्धी खुंटते. खोटी आणि भ्रामक प्रसन्नता मात्र निर्माण होते.

काही तीव्र दाहक विषद्रव्यही कामोत्तेजक म्हणून वापरली जातात. ही द्रव्ये कृत्रिमरित्या तयार केली जातात. दारूतून ती दिली जातात. या द्रव्यांमुळं मूत्राशयाचा आणि मुत्रमार्गाचा तीव्र दाह होतो. त्यामुळं तिथल्या रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. त्यामुळं लिंगात रक्तपुरवठा वाढून ताठरता जाणवू लागते. अशा प्रकारची द्रव्ये वापरणं, हे कोणत्याही क्षणी जीवावर बेतू शकते. हे सर्व प्रकार मर्दानगीच्या खोट्या संकल्पनेतून जन्माला येतात.

वास्तविक कोणत्याही मानवाला कामोत्तेजक द्रव्यांची गरज नसते. ही द्रव्ये जन्मतःच असतात सर्वांकडे. कामोत्तेजना निर्मितीची क्षमता प्रत्येक पुरूषात असते. उगीचच मर्दानगीच्या खुळचट अपेक्षा बाळगल्याने चिंता, निराशेच्या आवरणाखाली ती हळूवार भावना दडपली जाते. कामोत्तेजनेची सांगड कशाशीही न घालता सरळ प्रेमभावनेशी जोडली तर कामभाव सहजरित्या खुलतो आणि तीच भावना टिकते. कामभावना, उत्तेजना येणे, टिकवणे हे कौशल्य आहे, ते हळूहळू आत्मसात करावे लागते. त्यासाठी मन स्थिर लागते. कुठलेही व्यसन ही कौशल्ये शिकवू शकत नाही. कामजीवनाविषयी निकोप दृष्टीकोन, योग्य ज्ञान यांच्यामुळेच कामजीवन खुलते; कुठल्याही व्यसनाने नव्हे!

प्रियदर्शिनी हिंगे

Updated : 20 Jan 2020 10:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top