प्लस साईज? डोन्ट वरी!
X
फिट राहून झिरो फिगर मेंटेन ठेवणं हे अनेकांच्या बकेलिस्ट मध्ये असतं. खासकरून मुलींना आपण मस्त फिट असावं हे सातत्याने वाटतं राहतं. पण हल्ली प्लस साईझही अगदी हक्काने प्रमोट करताना अनेक जणी आपल्याला बघायला मिळतात.
आज अश्याच एका कलंदरी आणि गोंडस अभिनेत्रीची गोष्ट आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत. अक्षया नाईक ही प्लस साईझ प्रमोट करत, अनेक कमालीच्या भूमिका साकारून तिने जगासमोर स्वतःच असं एक अनोखं विश्व निर्माण केलंय. जाणून घेऊ या तिच्या या ‘प्लस साईझ’ प्रवासाबद्दल तिच्याच शब्दांत...
आत्मविश्वास टिकवणं महत्त्वाचे!
मी नुसतं प्लस साईझ पेक्षा शरीर कसं सकारात्मक राहिलं यावर लक्ष देऊन ते प्रमोट करण्याचा प्रयत्न करते. आपलं शरीर जस आहे त्याला तसंच्या तसं स्वीकारून, त्याचा आदर करणं हे महत्वाचं आहे. मग आपण जाड असू किंवा बारीक, जसे आहोत तसे छान आहोत हे स्वतःहून स्वीकारून आयुष्य जगते. पण या सगळ्यात मी कधीच ‘अनहेल्दी खा’ हे असं मी कधीच सांगत नाही. आपल्या शरीरात होणारे बदल आपल्याला जाणवले पाहिजे. मी प्लस साईझ आहे म्हणून मी एखादी गोष्ट करू शकत नाही असं नाही तर अगदी आत्मविश्वासाने मी अनेक गोष्टी करत असते. स्वतः मध्ये आत्मविश्वास टिकवून ठेवून सतत सकारात्मरित्या काम करायला हवं असं मला वाटतं.
वजन किंमत ठरवत नसते
आपल्या समाजात जाड दिसणं हे मोठं पाप आहे असं समजलं जातं. पण माझं इतकंच म्हणणं आहे, दिसण्यापेक्षा आपण किती फिट आहोत यावर लक्ष दिलं पाहिजे. जाड असण्यात किंवा दिसण्यात काही हरकत नाही. पण तुम्ही तब्येत जपून तिची योग्य काळजी घेणं फार महत्वाचं असतं. तुमचं वजन कधीच तुमची किंमत ठरवत नाही. ही गोष्ट डोक्यात ठेवून आपण फिट राहील पाहिजे.
जाड आहे म्हणून मिळाली भूमिका
मला आजवर इंडस्ट्रीत जी काम मिळाली ती केवळ मी जाड आहे आणि त्या भूमिकेला साजेशी आहे म्हणूनच मिळाली. जाड असल्यावरून लोकं नक्कीच गॉसिप करतात. पण या गोष्टीचा विचार कधीच न करता मला प्रत्येक वेळी कमालीच्या भूमिका साकारायला मिळत गेल्या याचा जास्त अभिमान वाटतो.
मी केलेल्या भूमिकेशी कोणतीही व्यक्ती अगदी सहजरित्या स्वतःला त्यात बघू शकते मग ती बघणारी व्यक्ती जाड आहे की बारीक यादृष्टीने कधीच विचार केला जात नाही. बऱ्याचदा विनोदी भूमिका किंवा "फॅट फ्रेंड विथ बर्गर इन हँड" अश्या तऱ्हेच्या जाड असण्यावरून स्क्रिप्ट लिहिल्या जातात तर या गोष्टीचा फार राग येतो. आजवर मी केलेल्या भूमिका माझ्यासाठी खास होत्या आणि तितक्याच वेगळी होत्या म्हणून आनंद आहे.
लोकांचा भरभरून प्रतिसाद
मला आजवर खूप जास्त छान प्रतिसाद मिळत आला आहे. खूप मस्त वाटतं जेव्हा फक्त मुलीच नाही तर तरुण मुलंही मला मेसेज करून म्हणतात की त्यांना माझ्या कामाकडे बघून फार प्रेरणा मिळते. अशा प्रतिक्रिया मिळणं माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. मला या सगळ्या प्रतिसादामुळे माझ्या कामासाठी कायम प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळत आलंय. भविष्यात आणखी जिद्दीने काम करण्यासाठी अशा प्रतिसादाची आणि पोचपावतीची साथ लाभते.
खाऊन रहा फिट!
मी फिट राहण्यासाठी असं काही वेगळं करत नाही. अर्थात मी जाड आहे पण मी तितकीच फिट देखील आहे. घरचं जेवणं आणि शक्य होतील तितकं शारीरिक उपक्रम (फिजिकल ऍक्टिव्हिटी) करत राहते. बऱ्याचदा चिट मिल्स हे सगळंच मला फिट ठेवण्यासाठी मदत करत.
‘प्लस साईझ’चं अनोखं विश्व
फॅट असून फॅशन करणं हा एक अनोखा फंडा आपल्याकडे आला आहे. यात नक्कीच फॅशन इंडस्ट्रीचा मोठा हातभार आहे. आपण जे कपडे घालतो त्यावरून आपल्या व्यक्तिमत्वाची पारख केली जाते. त्यामुळे नक्कीच प्लस साईझ इंडस्ट्रीने जाड असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक नवं पर्व सुरू केलं आहे. मुळात शरीरात एक सकारात्मक ऊर्जा असली की आपल्या आत्मविश्वासात भर पडते तर ही गोष्ट आजच्या घडीला फार महत्वपूर्ण आहे.
मालिका, नाटक आणि वेबसरीज
२०१४ पासून मी अनेक हिंदी टीव्ही शो केले ‘ये रिश्ता क्या केहेलाता है’ या मालिकेत मी १ वर्ष काम केलं. मग ‘मेरे रंग मै रंगने वाली’ या मालिकेपासून सहाय्यक व्यक्तिरेखा साकारण्याची सुरुवात झाली. मराठीत ‘गणपती बाप्पा मोरया’ आणि ‘प्रेमा तुझा रंग कसा?’ यासारखे शो केले. एक वेबसिरीजसुद्धा केली. सध्या ‘ये रिश्ते है प्यार के’ नावाची मालिका करत आहे. मालिका, वेब यांच्या सोबतीने रंगभूमीवरही माझं काम सुरू आहे. नाटक, मालिका आणि वेब या तिन्ही क्षेत्रात मी काम करतेय.
ब्लॉगर, अभिनय आणि बरंच काही...
मी अभिनयाच्या बरोबरीने ब्लॉगिंग सुद्धा करते. ब्लॉगिंगमध्ये अनेक हटके विषय घेऊन मी लोकांच्या भेटीला येत असते. त्याच बरोबरीने अभिनयाच्या शाळेत रंगभूमीच्या निगडित अनेक गोष्टीची उलगड करून मुलांना शिकवण्याच काम करते आहे. ब्लॉगर, अभिनय, आणि एक थिएटर मेंटॉर असा माझा प्रवास सुरू आहे. तुमच्या साथीनं आणखी चांगलं काम कराचंय!