Home > रिपोर्ट > नकारचं तिच्या जीवावर बेतला...

नकारचं तिच्या जीवावर बेतला...

नकारचं तिच्या जीवावर बेतला...
X

प्रेम म्हणजे प्रेम असते... मात्र दिवसेंदिवस प्रेमाची भाषा बदलण्यासोबतच त्याचे परिणामही बदलत चालले आहे. कधी समाज या प्रेमाच्या जीवावर उठतो तर कधी प्रेमचं प्रेमावर हावी होतं... ऑनर किलिंगपासून ते प्रियकराकडून होणाऱ्या हत्या... हे या समाजातील बदलतं आणि काळीमा फासणारं रुप... प्रेम न केल्याची आणि प्रेम केल्याची किंमत चुकवावी लागणारचं अशी परिभाषा होत चाललेल्या प्रेमाची कहाणी बुलढाण्यात घडली आहे. तिचा नकार तिला मृत्यूच्या दारात कसा घेऊन जातो आणि समाजात प्रेमाचं धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा समोर येतं.

काय आहे प्रकरण?

बुलढाण्यातील खामगाव शहरातील सनी पॅलेस जवळील सुधीर निंबोकार यांची मुलगी अश्विनी हिच्याशी अकोला जिल्ह्यातील पातूर येथील सागर निंबोळे या युवकाशी पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सागर हा अश्विनीचा वर्ग मित्र असल्याने दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली होती. दरम्यान, याच जवळकीतून सागर निंबोळे याने अश्विनीच्या वडीलांकडे अश्विनीसोबत लग्नाची मागणी केली होती. एकाच समाजातील असल्याने अश्विनीच्या नातेवाईकांकडून सागरच्या संबंधाला फारसा विरोध करण्यात आला नाही. मात्र, विवाहाच्या बोलणी दरम्यान, सागरच्या कुटुंबातील अवास्तव अपेक्षेमुळे अश्विनीच्या कुटुंबियांकडून हा संबंध नाकारण्यात आला. हुंडा देवाण-घेवाणीच्या कारणावरुन हे ठरलेले लग्न मोडले यामुळे नाराज झालेल्या अश्विनीला आपण साथ सोडणार नसल्याचे आश्वासन सागरने दिले. आपण पळुन जावुन लग्न करु असा प्रस्ताव त्याने अश्विनी समोर मांडला तो प्रस्ताव अश्विनी धुडकावुन लावला. आपण पळुन जाणार नाही हा तिचा निर्णय तिने सागरला ऐकवला. या निर्णयाने बिथरलेल्या सागरने मला केवळ एकदा भेट अशी विनवणी त्याने अश्विनीला केली. ती विनवणी अश्विनीने मान्य केली त्यावेळी ही भेट म्हणजे आपल्या आयुष्याचा शेवट असेल याची पुसटशीही कल्पना तिला नव्हती. ठरल्याप्रमाणे दोघे भेटले व एका झाडाखाली येताच सागरने तिच्यावर चाकूने सपासप वार करत अश्विनीचा खून केला. भरदिवसा झालेल्या या खुनाने सर्व नागरिक स्तब्धच झाले. हत्या करुन पळून जातांना सागरने चालत्या रेल्वेतून उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र तो पोलिसांच्या हाती लागला. सागर रुग्णालयात असून त्याची झूंज आता मृत्यशी सुरु आहे.

या घटनेमुळे अश्विनी निंबोकार हिच्या घरी दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृतक अश्विनी आणि सागर निंबोळे यांच्यात पाच वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. मुलाकडील मंडळीच्या अवास्तव मागणीमुळे अश्विनीच्या कुटुंबियांनी विवाहास नकार दिला होता. त्यामुळे चिडलेल्या सागर निंबोळे यानेच अश्विनीची हत्या केली असल्याचे तपासाअंती स्पष्ट झाल्याचे खामगाव उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, समाजात प्रेमविवाहालाही विरोध होताना आपण पाहिला आहे. घरच्यांचा नकार असतानाही लग्न केलेल्या अनेक जोडप्यांना ऑनरकिलिंगच्या प्रकाराला सामोरं जावं लागल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. मात्र बुलढाण्यातल्या सागर-अश्विनीच्या प्रेम प्रकरणात तिच्या नकारावर प्रियकरचं तिला मृत्यूच्या दारात नेईल अशी जरासुद्धा कल्पना तिला नसावी. हुंड्यामुळे अश्विनीचे लग्न मोडले मात्र आपण पळुन जावुन लग्न करणार नाही या तिच्या निर्णायाने तिचा जीवच घेतला. एकीकडे मुलींना गर्भात मारलं जातयं तर दुसरीकडे पुरुषसत्ताक पध्दत मुलींना त्यांचा निर्णयाचा अधिकारच नाकारते आहे आणि त्यासाठी त्यांचा जीवही पणाला लागला आहे. या समाजात अजूनही तिला निर्णय घेण्याचा अधिकार नाकारला जातोय. मग तो कुठलाही विषय असो...

Updated : 19 May 2019 11:16 AM GMT
Next Story
Share it
Top