Home > Max Woman Blog > मैत्रिणीच्या बाळाला स्तनपान करत तिने दिला खरा मैत्रीचा संदेश

मैत्रिणीच्या बाळाला स्तनपान करत तिने दिला खरा मैत्रीचा संदेश

मैत्रिणीच्या बाळाला स्तनपान करत तिने दिला खरा मैत्रीचा संदेश
X

पहिले १००० दिवस हे बाळाच्या वाढीसाठी अत्यंत महत्वाचे मानले जातात. केवळ शारिरीक नाहीतर मानसीक आरोग्यासाठीही या १००० दिवसात बाळाची योग्य काळजी घेतली तर बाळाचे पुढचे आयुष्य बरेच सुकर असु शकते, यात आईच्या दुधाचा महत्वाचा वाटा समजला जातो. या दुधाला अमृत म्हटले जाते ते उगीच नाही. मात्र हे अमृत सगळ्याच बालकांच्या वाट्याला येते असे नाही. मात्र आपल्या मैत्रिणीच्या बाळालाही हे अमृत मिळावा म्हणुन मैत्रिणीनेच स्तनपान केल्याची दुर्मिळ घटना घडली. खरंतर हे चित्र फार दुर्मिळ असलं तरीही ते सध्या पाहायला मिळत आहे.दोन मैत्रिणी अगदी जिवाभावाच्या...नेहा व अक्षता.

गरोदर असणाऱ्या नेहा सिंहने सहाव्या महिन्यातच मुलीला जन्म दिला. त्यामुळे तिच्या स्तनात दुध तयार होण्याची प्रक्रिया पुर्ण होवु शकली नाही.सहाव्या महिन्यातच 'प्री-मॅच्युअर' जन्माला आलेल्या मुलीचं 'मेहर' असं या नाव ठेवून बाळाला वाढवण्याचा निर्णय सिंह कुटुंबीयांनी घेतला. अशावेळी त्या बाळासाठी धावून आली तिच्या आईची जवळची मैत्रीण अक्षता शेट्टी.याचदरम्यान अक्षताने एका मुलीला 'इयाना'ला जन्म दिला होता. अशावेळी मेहरला अक्षताने दूध देण्याचा निर्णय घेतला. सहाव्या महिन्यातच जन्माला आलेल्या मेहरवर डॉक्टर सर्वतोपरी उपचार करत होते. पण आईचं दूध हे बाळासाठी कायमच अमृतासमान असतं. हेच दूध अक्षताने मेहरला देण्याचा निर्णय घेतला. अक्षताने घेतलेला निर्णय हा खरंच धैर्याचा होता.

जवळपास महिनाभर अक्षताने मेहरला दूध दिलं. शय आणि इयाना अशी दोन मुलं घरी असल्यामुळे अक्षताला हॉस्पिटलला जाऊन दूध देणं शक्य नव्हतं. अशा वेळी Ease my Life या ऍपच्या माध्यमातून दूध देण्याची सोय करण्यात आली. 4 जानेवारी ही नेहाची प्रसूतीची तारीख होती पण 27 सप्टेंबरलाच नेहाने मेहरला जन्म दिला. अवघ्या सहा महिन्याच्या मेहरने असंख्य वेदना सहन करत 65 दिवस रूग्णालयात काढले. जन्मतःच परिस्थितीशी झुंजणारी मेहर लवकरच चार महिन्यांची होईल. तिच्या या चार महिन्यांच्या काळात प्रकृतीत बरीच सुधारणा झाली आहे. यामध्ये अक्षताचा महत्वाचा वाटा आहे.

याकाळात अक्षता काही कामानिमित्त बाहेर गेली होती. अशावेळी मेहरला दूध मिळावं याकरता तिने सोशल मीडियावर नुकत्याच आई झालेल्या स्त्रियांशी संपर्क साधला. यावेळी मेहर करता नुकतीच प्रसूती झालेल्या मातांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. अनेक माता घरी येऊन मेहर करता दूध देत होत्या तर अनेक महिलांनी ऑफिसच्या लंच ब्रेकमध्ये हॉस्पिटलमध्ये जाऊन मेहरला दूध पाजलं. 'आताच्या धावपळीच्या जगात कुणी कुणासाठी काहीच करत नाही अशी बोंब होत असताना माझ्या मेहरसाठी असंख्य आया धावून आल्या. यावरून माणुसकीवरचा विश्वास आणखी दृढ झाल्याचं, मेहरची आई नेहा सांगते. तसेच मेहरही माझी मुलगी असली तरीही अक्षताच तिची पहिली आई असल्याची भावना नेहा शेअर करते.

मेहर सारख्या असंख्य बाळांना आईच्या दुधाची गरज असते मात्र सगळ्याच्या वाट्याला अक्षता सारखी मैत्रिणही नसते. मात्र स्तनदा मातांचा जर काही सपोर्ट गट तयार करता आले तर कुपोषण याबरोबरच बाळाला होणारे आजार टाळता येवु शकतील व स्वस्थ भारताचे स्वप्न आपण ख-या अर्थाने पाहु.

-प्रियदर्शिनी हिंगे

Updated : 23 Jan 2020 4:50 AM GMT
Next Story
Share it
Top