सोशल मिडीयावरही "ती" दबंग
X
एका ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातून आलेल्या, आई वडिलांच्या परिश्रमांचे चीज करून शिक्षण घेत पोलिस दलात अधिकारी पदावर रुजू झालेल्या जालना येथील ‘दामिनी’ पथकाच्या प्रमुख पोलिस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांचे ‘इन्स्टाग्राम’वर चक्क तब्बल दीड लाख फाॅलोअर्स झाले आहेत. दामिनी पथकाच्या माध्यमातून त्यांनी मागील काही महिन्यांत जिल्ह्यातील मुली – महिलांमध्ये आत्मविश्वास जागवण्याचा प्रयत्न चालवला आहे. दामिनी पथकाच्या कार्यपद्धतीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचे काम जाधव यांनी केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात या ‘दामिनी’ चा झंझावात वाढताना दिसतो आहे. आता सोशल माध्यमावर देखील त्यांची क्रेझ वाढली आहे. पल्लवी नेहमीच ऑडिशनच्या निमित्ताने रायगड जिल्ह्यात येत असतात.
कुटूंबातील कुणीही सदस्य पोलीस खात्यात नोकरीला नसतानाही बालपणापासून असलेली खाकी वर्दीची आवड व शेतकरी कुटूंबातून प्रचंड कष्टातून एमपीएससीचा गड सर करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांच्याकडे सध्या जालना येथील दामिनी पथकाची जबाबदारी आहे. सन 2014 मधील एमपीएससी बॅचच्या अनुसूचित जाती प्रवर्गातून राज्यातून दुसऱ्या क्रमांकाने पास होणाऱ्या पल्लवी जाधव यांना जालना येथे पहिलीच पोस्टींग मिळाल्यानंतर त्यांच्या कामाचा ठसा पोलीस प्रशासनासह येथील जनमाणसावरही उमटला आहे. सुरुवातीला सन 2016 मध्ये कदिम जालना पोलीस ठाण्यातील महिला तक्रार निवारण कक्षाची जबाबदारी सांभाळल्यानंतर गत पाच महिन्यांपासून जिल्ह्यातील रोड रोमिओंना अद्दल घडविण्याचे कार्य त्या यशस्वीरित्या बजावत आहेत.
पोलीस दलातील डॅशिंग अधिकारी नेहमीच तरुणांना भुरळ घालतात. अनेकांना आपणही असेच अधिकारी व्हावे, असे त्यांच्याकडे पाहून वाटत असते. पल्लवी जाधव यांच्यातला रांगडेपणा युवक व युवतींचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. पल्लवी जाधव यांनी दिवसा शेतीमातीत राबून रात्री अभ्यास केला व एमपीएससीचा गड सर केला, अशी यशोगाथा त्यांच्या कन्नड तालुक्यातील रेलगाव येथील बालमैत्रिणी सांगतात. महिला सबलीकरण, मुलींसाठी कराटे प्रशिक्षणातून स्वसंरक्षण, बालकांच्या हक्काबाबत जन जागृती अशा अनेक मुद्द्यांवर त्या सध्या काम करीत आहेत. घर सोडून निघून गेलेल्या दोन चिमुकल्यांना त्यांनी गस्तीवर असताना पालकांपर्यत नुकतेच पोहचविले आहे.
हा वर्दीचा सन्मान
खाकी वर्दी मला जनतेची सेवा करण्याची संधी देते. सर्व पोलीस अधिकाऱ्यांप्रमाणे मी ही कर्तव्य बजावत असते. लोकांना माझ्या कामाची पद्धत आवडते, अशा प्रतिक्रिया मला येतात. समाजात मिळणारा आदर व समाज माध्यमावरील लोकांचे प्रेम हा माझा वैयक्तिक नव्हे तर माझ्या वर्दीचा सन्मान आहे, जो मला काम करण्याचे बळ देतो.
– पल्लवी जाधव, पोलीस उपनिरीक्षक, दामिनी पथक प्रमुख, जालना.
https://youtu.be/ZGMt4S97H4c