Home > रिपोर्ट > विजेप्रमाणे तळपणारी एक "तेजस्विनी"

विजेप्रमाणे तळपणारी एक "तेजस्विनी"

विजेप्रमाणे तळपणारी एक तेजस्विनी
X

अनेकवेळा आपण आदर्श व्यक्तींचा धांडोळा इतिहासात घेऊन त्यांच्यापासून प्रेरणा घेत असतो. त्या सर्व वंदनीय व्यक्तींचा पूर्ण आदर बाळगूनही मी मात्र दहा वर्षांपूर्वी थोडा वेगळा विचार केला होता की, किती दिवस आपण त्याच त्याच लोकांबद्दल बोलणार ? आजच्या काळात तशा कुणी व्यक्ती नाहीतच का ? नसतील तर का नाहीत हे शोधू.... मात्र असतील तर त्यांच्यावर का नाही बोलायच? आणि तिथेच माझ्या एका नवीन पुस्तकाचा जन्म झाला. "कर्तृत्वाला सलाम" या त्या पुस्तकात मी अशाच आजच्या काळातील ३० लढणाऱ्या तेजोशलाकाबद्दल लिहिलं. त्यात शेवटी मी लिहिलं की, "आजच्या काळातील्या या झाशीच्या राण्या!! तुम्ही त्यांना थेट भेटू शकता" (असं सांगून प्रत्येकीचे पत्ते व फोन नंबर दिले.) याचा विलक्षण आनंद वाचकांना झाला. हातोहात पुस्तकाची पहिली आवृत्ती संपली!

*

आज हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे एफबी वर ओळख झाल्यानंतर अनेक व्यक्तीचा परिचय सहवास लाभला आणि त्यातून नकळत मीच समृद्ध होत गेलो. त्यापैकीच एका अशाच लढाऊ स्त्रीची ओळख आज करून द्यावं वाटलं. ते अशासाठी की, खडतर संकटातून बाहेर कसे यावे, निराश न होता यशाकडे कसे जावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हि महिला आहे.

त्या म्हणजे कोल्हापूरच्या विद्यापीठात उच्चपदी कार्यरत असणाऱ्या तेजस्विनी गोरनाळे.

लग्न झाल्यावर पूर्वी इचलकरंजी इथं वास्तव्य असताना ध्येयनिष्ठ पती, प्रेमळ सासू सासरे अन वेलीवर उमललेले एक फुल (मुलगा प्रतीक) असा सुंदर संसार.

परिस्थिती फार गरीब नाही पण फार श्रीमंतही नाही. पोटापुरते मिळत्ये, यात समाधानी कुटुंब !

आणि अचानक काळाचा घाला पडला अन पती देवाघरी!!

तेजस्विनी तोवर हाऊसवाइफ रोलमध्ये होती. पण अचानक घर जणू उघड्यावर पडलं. कमावणारे कुणीच नाही अन घरात चार माणसे जगवायची कशी? घरात उद्यासाठी खायला काय ? हा भीषण प्रश्न समोर उभा ! दुसरी एखादी असती तर तिथंच कोलमडून गेली असती. थोडंफार लढावं म्हणून मे बी नातेवाईकाची मदत घेतली असती.

पण हे सगळं नाकारून या लढाऊ महिलेने चक्क इचलकरंजी सोडून कोल्हापूर गाठलं.

विद्यापीठात ९६ रु. रोजावर टेम्पररी बेसिसवर त्यांनी जॉब सुरु केला. कामाचा कसलाच अनुभव नाही, विशेष त्यातलं प्रशिक्षणही नाही पण सासू सासरे आणि स्वतःच्या लेकराला चार घास खायला घालणे हेच ध्येय समजून ती लढत राहिली. त्याकाळात प्रसंगी अनेकांनी अपमान केलेही. काहींनी चेष्टाही केली असेल. किंवा "एकटी बाई" या अँगलने पाहून लाळघोटेपणा करणारे देखील वाटेत आडवे येत गेले.

पण त्याकडे दुर्लक्ष करून हिने "स्व" जपत अन स्वाभिमान टिकवून वाटचाल सुरु ठेवली. एका खोलीतले, अत्यंत अपुऱ्या जागेतले हे कुटुंब पोसण्यासाठी त्या काळात एकही सुट्टी न घेता हि आठही दिवस काम करत राहिली. (त्याबद्दल मी एकदा त्यांना विचारलं की, थकायला झालं असेल न ? मग एखादी तरी सुट्टी का नव्हती घेत? तर म्हणाल्या, "गरजूना थकून चालत नाही डीडी, म्हणून रविवारी पण काम करत गेले")

अन या लढाईला हळूहळू मांगल्य येत गेलं. यशाची फुले उमलली. जिथे ९६ रुपये रोजाने काम केले तिथंच नंतर कष्टाने प्रगती करत करत व प्रमोशन घेत घेत वरच्या पदावर पोचली.

मात्र हे करत असताना विद्यापीठात येणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना जणू स्वतःचे लेकरू समजून काळजी घेऊन योग्य मार्गदर्शन केलं. आज त्यामुळे शेकडो विद्यार्थी अभिमानाने करियरमध्ये उच्च पदावर पोचले आहेत. इतकंच नव्हे तर विद्यापीठ स्टाफसोबतही तितकेच स्नेहबंध जपले. कष्ट करता करता आनंदी कसे जगावे हा मंत्र इतरांना ती देत गेली. अनेकांच्या आयुष्यातली निराशा घालवली.

अन दुसरीकडे कौटुंबिक घडीही इतकी उत्तम बसवली की आपण चकित व्हावं. आज कोल्हापुरात स्वतःचा दोन मजली सुंदर बंगला, नवी कोरी चकचकीत कार, "आव्वा" म्हणजे सासूच्या रूपाने मिळालेली जणू आई. या आव्वाच्या शेजारी बसून पिठलं भाकरी खाण्याचा योग मला आलेला त्यावेळी मलाही त्यांच्यामध्ये जणू माझी आई दिसली. त्यांना सोशल मीडिया, फेसबुक, किंवा डीडी क्लबचे काम असं काहीही माहित असणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी मला ते सगळं बाजूला ठेवून अतिशय मायेने जवळ घेतलं. हे पक्के आठवत.

अतिशय उच्च दर्जाचे संस्कार केल्याने मुलगाही आज कॉलेज लाईफमध्ये सर्वत्र फेमस. नाटकात काम केलं तर थेट अवॉर्ड घेऊन आला. ट्रिपला जाईल तर अनेकांना सोबत घेऊन जाईल. असा हा जणू शामची मम्मी मधला शाम !!

एकदा तेजस्विनी याना मी विचारलं की, इतकी अफाट एनर्जी कुठून मिळते तुम्हाला?

तर हसत हसत म्हणाल्या, "निसर्गातुन मिळते. मला बागकामाची प्रचंड हौस आहे. त्यामुळे टेरेसवर, बाल्कनीत जिथं शक्य तिथं तिथं मी निसर्गप्रेम जपलं आहे. आता सुदैवाने आर्थिक परिस्थिती चांगली असल्याने मनातल्या सगळ्या हौस मौज पूर्ण करते. गच्चीत झोपाळा असावा, भोवती फुल उमललेली असावीत अन कामावरून आल्यावर मी तिथं बसून कपभर चहा घेत घेत सूर्यास्त पाहावा हे किती वर्षाचे स्वप्न आता पूर्ण केले." (पोस्टमध्ये त्याचेच काही फोटो आहेत)

मध्यंतरी जुने घर विकून नवीन बंगला घेताना काही तांत्रिक व कायदेशीर अडचणी आल्या. त्यावेळी जमेल तशी मी मदत व सल्ले दिले तर त्याबद्दल आजही तेजस्विनी इतरांना सांगते, त्यामुळेच आज बंगल्यात आले. अशी हि कृतज्ञ भावना जपणारी व्यक्ती अन अशी हि तेजस्विनीची तेजोगाथा. अजून बरेच काही सांगण्यासारखं आहे. पण झलक इथं फक्त सांगितली.

डीडी क्लास : जीवनात संकटे कुणालाच चुकली नाहीत. मात्र त्यातून आपण न डगमगता बाहेर कसे पडावे अन स्वाभिमान टिकवून ताठ मानेने यश कसे खेचुन आणावे हे जर पहायच असेल तर वेळ काढून कधीतरी तिच्या कोल्हापूरच्या घरी जाऊन गप्पा मारा. तुम्हाला प्रचंड एनर्जी मिळाल्याशिवाय राहणार नाही. अन विशेष म्हणजे संकटावर मात करतांना "रडणे टाळा, लढणे शिका" हे मी नेहमीच सांगतो ते प्रत्यक्षात असे उदाहरण पाहिले की तुम्हालाही ते सांगावे वाटते. अशा या लढणाऱ्या तेजस्विनी मॅडमचे कौतुक आज का करतोय? तर माझ्या मैत्र खजिन्यातल्या हिरेमाणकांचा परिचय मी त्यांच्या वाढदिनी तुम्हाला करून देत असतो. तर आज यांचा वाढदिवस असल्याने हि छोटी शब्दभेट त्यांना सप्रेम भेट.

वेगळ्या शुभेच्छा काय देऊ?

तेजस्विनी मॅडम

शतक महोत्सव करा त्यावेळी आम्हाला बोलवा

हीच आज सदिच्छा !

- धनंजय देशपांडे (dd)

Updated : 20 Jan 2020 5:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top