Home > रिपोर्ट > या महिला लोकप्रतिनिधींची कृती खऱ्या अर्थाने पुरोगामी होती

या महिला लोकप्रतिनिधींची कृती खऱ्या अर्थाने पुरोगामी होती

या महिला लोकप्रतिनिधींची कृती खऱ्या अर्थाने पुरोगामी होती
X

कार्यकर्त्याच्या पार्थिवाला स्मृती इराणींनी दिला खांदा

लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींना त्यांच्या पारंपारिक मतदारसंघात धूळ चारणाऱ्या स्मृती इराणी सध्या आणखी एका कारणाने चर्चेत आहेत. लोकसभेच्या निकालानंतर इराणी यांचे निकटवर्तीय सुरेंद्र सिंह यांची हत्या झाली. सिंह यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी त्या दिल्लीहून अमेठीत आल्या. भावूक झालेल्या स्मृती यांनी सुरेंद्र सिंह यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होत त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला. एखाद्या राष्ट्रीय पातळीवरच्या लोकप्रतिनिधीनं आपल्या कार्यकर्त्याच्या पार्थिवाला खांदा देण्याची ही पहिलीच वेळ असावी.

सुप्रिया सुळेंचं कौतुकास्पद पाऊल

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांचा विवाह काही दिवसांपूर्वी पार पडला. या सोहळ्याला आबांच्या ओढीनं अनेक नेते, कार्यकर्ते आवर्जुन उपस्थित होते. मात्र सगळ्यांचं लक्ष वेधलं ते खा. सुप्रिया सुळेंच्या एका कृतीनं. आर. आर. आबा यांच्या पत्नी सुमनताई या आबा गेल्यापासून कुंकू लावत नाहीत. जेव्हा सुप्रिया ताईंनी सुमनताईंची गळाभेट घेतली तेव्हा सुप्रियाताईंना रहावलं गेलं नाही आणि त्यांनी सुमनताईंच्या कपाळावर टिकली लावली. यावेळी लगळ्यांचे डोळे पाणावले होते.

पंकजा मुंडेंची धाडसी कृती

भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडेंच्या अपघाती निधनानंतर राज्यभरात शोककळा पसरली होती. त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून लोक परळीच्या दिशेने आले. आपल्या लाडक्या नेत्याचं असं एकाएकी जाणं त्यांच्या समर्थकांना सहन न होणारं होतं. अंत्यसंस्कारावेळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा पंकजा यांनी सर्व परिस्थिती हाताळली. ‘तुम्हाला साहेबांची शपथ आहे’ असं पंकजांनी म्हणताच लाखोंचा जमाव स्तब्ध झाला.

पंकजांनी आपल्या वडीलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. एका मुलाप्रमाणे त्यांनी सर्व विधी पार पाडले. हा अत्यंत धाडसी निर्णय होता. त्यावेळी त्यांच्या या निर्णयाचं सगळ्यांनी स्वागत केलं. त्यांच्या या कृतीनं त्यांनी समाजापुढं एक आदर्श निर्माण केलाय. यासोबतच मुलगा-मुलगी भेद करणाऱ्या विचारांना त्यांनी चांगलीच चपराक लगावली.

आपल्याकडे समाज लोकप्रतिनिधींचं अनुकरण करत असतो. अशा स्थितीत या सर्व घटना धाडसी आणि कौतुकास्पद आहेत. पक्ष, विचारधारा यापेक्षा एक महिला म्हणून त्या व्यक्त झाल्या. कित्येक वर्षांपासून चालत आलेल्या पारंपारिक रुढी आणि बंधनांना या तिनही महिलांनी आपल्या कृतीतून उत्तर दिलं. देशातल्या महिलांचं प्रतिनिधीत्व अशा महिलांकडे आहे हे चित्र आशादायी आहे. मात्र, संसदेमध्ये अशा महिला लोकप्रतिनिधींची संख्या आणखी वाढली तर देशातल्या स्त्री-पुरुष समानतेसाठी ते महत्वाचं पाऊल असेल.

Updated : 30 May 2019 6:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top