Home > रिपोर्ट > ...म्हणून मी या देशातली सर्वात भाग्यवान महिला, निकालानंतर वैशाली येडेंनी व्यक्त केल्या भावना

...म्हणून मी या देशातली सर्वात भाग्यवान महिला, निकालानंतर वैशाली येडेंनी व्यक्त केल्या भावना

...म्हणून मी या देशातली सर्वात भाग्यवान महिला, निकालानंतर वैशाली येडेंनी व्यक्त केल्या भावना
X

पारंपारिक राजकारणाच्या पलिकडे राज्यातली एक वेगळी लढत म्हणून यवतमाळकडे पाहिलं जात होतं. त्याचं कारण म्हणजे वैशाली येडे. आ. बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षानं कर्जबाजारीपणानं आत्महत्या केलेल्या शेकतऱ्याच्या पत्नीला उमेदवारी दिली होती. यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्यांमुळे देशभरात चर्चिला गेला होता. त्यामुळं वैशाली येडेंची उमेदवारी खास ठरली. वैशालीताईंना या निवडणुकीत 19,918 मतं मिळाली. तर शिवसेनेच्या भावना गवळी 542098 मतं घेत विजयी झाल्या.

देशी दारू दुकानासमोर दूध वाटप करून आणि रक्तदान करून येडे यांच्या प्रचाराचा नारळ फोडला गेला. लोकवर्गणीतून त्यांनी ही निवडणूक लढवली. त्यांच्यासाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार केला. वैशालीताईंनीही मतदारांमध्ये जात निवडूण देण्याचं आवाहन केलं. पण तगड्या प्रतिस्पर्ध्यांसमोर वैशालीताईंचा निभाव लागला नाही. आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनीही आपला पराभव मोठ्या मनानं स्वीकारत यापुढेही आपण समाजकार्यात सहभागी रहाणार असल्याचं सांगितलं. फेसबुकवर पोस्ट लिहून त्यांनी आपण या देशातली सर्वात भाग्यवान स्त्री असल्याचं सांगितलं. मतदारांचेही आभार मानायला त्या विसरल्या नाहीत.

कोण आहेत वैशाली येडे?

28 वर्षाच्या वैशाली येडे या यवतमाळ जिल्ह्यातल्या राजूरच्या आहेत. त्या अंगणवाडी सेविका म्हणून काम करतात. त्यांचं शिक्षण 10वी पर्यंत झालं आहे. लग्नानंतर दोनच वर्षांत त्यांचे पती सुधाकर यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. त्यावेळी वैशाली यांचा मुलगा 1 वर्षांचा होता तर वैशाली या दोन महिन्यांच्या गरोदर होत्या. वैशाली यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबावर आधारीत नाटकांमध्येही काम केलंय. नाटकांतून त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर भाष्य केलं.

वैशाली येडे या प्रथम प्रकाशझोतात आल्या त्या यावर्षी झालेल्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने. यवतमाळमध्ये झालेल्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात वादामुळं ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना संमेलनापासून दूर ठेवण्यात आलं. त्यानंतर वैशाली येडे यांच्या हस्ते संमेलनाचं उद्धाटन झालं. यावेळी त्यांनी केलेलं उद्धाटनपर भाषण चांगलंच गाजलं होतं.

शेतकऱ्यांचा आवाज संसदेत पोहोचवण्यासाठी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील व्यक्तीलाच उमेदवारी मिळावी, या भूमिकेतून आमदार बच्चू कडू यांनी वैशालीताईंना उमेदवारी दिल्याचं सांगितलं होतं. पण आता हा आवाज संसदेत पोहोचला नसला तरी शेतकऱ्यांसाठी तो कायम बुलंद असेल अशी अपेक्षा करुयात.

Updated : 24 May 2019 3:51 PM IST
Next Story
Share it
Top