Home > पर्सनॅलिटी > मॉडेल, अभिनेत्री ते केंद्रीय मंत्री, स्मृती इराणींचा चढता आलेख

मॉडेल, अभिनेत्री ते केंद्रीय मंत्री, स्मृती इराणींचा चढता आलेख

मॉडेल, अभिनेत्री ते केंद्रीय मंत्री, स्मृती इराणींचा चढता आलेख
X

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना त्यांचा पारंपारिक मतदारसंघ अमेठीत धूळ चारणाऱ्या स्मृती इराणी यांनी अपेक्षेप्रमाणे कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. यासोबतच त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रीमंडळातल्या सर्वात तरुण मंत्री ठरल्यात. त्यांच्याकडे महिला आणि बालकल्याण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आलीय.

शिक्षण आणि मॉडेलिंग

स्मृती इराणी यांचा जन्म 23 मार्च 1976 रोजी दिल्लीत झाला. दिल्लीमध्येच त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. 10 वी उत्तीर्ण झाल्यानंतरच त्यांनी मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली. सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिराती करत त्यांनी ग्लॅमरच्या दुनियेत पाऊल ठेवलं. 1998 मध्ये त्यांनी मिस इंडीया स्पर्धेत सहभाग घेतला. मॉडेलिंग करत असताना संघर्षाच्या काळात त्यांनी मॅकडॉनल्ड्समध्ये नोकरी केली.

छोट्या पडद्यावरची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री

2000 मध्ये एका मालिकेमधून त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. पण त्यांना खरी ओळख मिळाली ती एकता कपूर यांच्या क्यों की सास भी कभी बहू थी या मालिकेतून. यात स्मृती यांची प्रमुख भूमिका होती. ही मालिका त्या काळातली सर्वात यशस्वी मालिका समजली जाते. यै भूमिकेतून त्या घराघरात पोहोचल्या. आपल्या अभिनयासाठी स्मृती यांना सर्वश्रेष्ठ अभिनेत्री म्हणून भारतीय टेलिव्हीजन अकादमी पुरस्कार, चार इंडियन टेली अवॉर्ड आणि आठ स्टार परिवार पुरस्कार मिळाले आहेत.

राजकारणात प्रवेश

2003 मध्ये त्यांनी भाजपच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. दिल्लीच्या चांदणी चौक लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली मात्र, काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. 2004 मध्ये स्मृती भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष झाल्या. 2010 मध्ये महिला मोर्चाची जबाबदारी त्यांच्यावर दिली गेली. 2011 मध्ये गुजरातमधून त्या राज्यसभेवर निवडून गेल्या.

वाद आणि खातेबदल

2014 मध्ये स्मृती इराणी यांच्याकडे मानव संसाधन मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांचा हा कार्यकाळ वादाचा राहीला. स्मृती यांच्या शिक्षण आणि पदवीवरुनही मोठा गदारोळ झाला. त्यानंतर हे मंत्रालय प्रकाश जावडेकरांकडे देण्यात आलं आणि स्मृती इराणी यांच्याकडे वस्त्रोद्योग मंत्रालय देण्यात आलं.

जुलै 2017 मध्ये व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपती झाल्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची अतिरीक्त जबाबदारी स्मृती यांच्याकडे देण्यात आली. मात्र, फेक न्यूजबाबत घेतलेल्या निर्णयामुळं सरकारवर प्रसारमाध्यमातून मोठ्या प्रमाणात टीका झाली. सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्य अडचणीत आणत असल्याचा आरोप झाला. त्यानंतर मे 2018 मध्ये पुन्हा स्मृती यांच्याकडचा मंत्रालयाचा पदभार राज्यवर्धन राठोड यांच्याकडे सोपवण्यात आला.

राहुल गांधींना आपल्याच मतदारसंघात हरवत इतिहास रचणाऱ्या स्मृती इराणी आता आपल्या नव्या जबाबदाऱ्या कशा पार पाडतात याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Updated : 31 May 2019 9:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top