Home > रिपोर्ट > महिलांना राजकारणातलं काय कळतंय ?

महिलांना राजकारणातलं काय कळतंय ?

महिलांना राजकारणातलं काय कळतंय ?
X

महुआ मोईत्रा आणि हिना गावित, एकदम व्हायरल झाल्यायत. नव्या भारतात, राजकारणात आणि सोशल मिडीया वर सध्या व्हायरल होण्याला फार महत्व आहे. स्पेशल कारण असल्याशिवाय असंच कुणी व्हायरल होत नाही. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चेत बोलताना हिना गावित या दुसऱ्या टर्मच्या खासदार आणि महुआ मोईत्रा या पहिल्या टर्मच्या खासदार पुरूष सदस्यांच्या कांकणभर पुढे जाऊन मुद्देसूद बोलल्या.

दोघींची भाषणं तशी दोन टोकांची. हिना गावित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तारिफ केली तर महुआ यांनी कुठल्याही कसलेल्या विरोधी पक्षनेत्या पेक्षा जास्त आक्रमक भाषण केलं. महुआ यांचं भाषण ऐकलं तर असं वाटतंच नाही की यांची ही पहिलीच टर्म असावी. वर्षानुवर्षे संसदेत राहिलेल्या कसलेल्या संसदपटूंनाही असं आक्रमक आणि मुद्देसूद भाषण करता आलेलं नाही. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसंच महुआ यांची संसदेतली कामगिरी कशी असेल याची चुणूक त्यांच्या पहिल्या भाषणात पाहायला मिळाली. महुआ यांनी फॅसिझमची सुरूवात कशी होते हे सांगताना देशातल्या लोकशाही रक्षणासाठी मोठा लढा उभारण्याची गरज बोलून दाखवली.

या दोन्ही भाषणांत केवळ महिलांचे प्रश्न होते असे नाही. या आधी महिला खासदार केवळ महिला प्रश्नांवर हिरीरीने बोलतांना दिसत, मात्र आता हे चित्र बदलते आहे. बोटावर मोजण्या इतक्या महिला लोकप्रतिनीधी राजकारणात सक्रिय सहभाग घेताना दिसायच्या, मात्र 17 व्या लोकसभेच महिला खासदारांचा सहभाग वाढताना दिसतोय.

महिला विधेयक संसदेत पास झाल्यानंतर नेमकं काय होईल याची रंगीत तालिम सध्या संसदेत आपल्याला पाहायला मिळते. महिला खासदार कामकाजात भाग घेतायत, यापुढच्या काळात त्या सत्तेतल्या सर्व महत्वाच्या पदांना काबिज करतील. महिलांना राजकारणातलं काय कळतंय अशी टिप्पणी सर्रास केली जाते, यापुढे असा शेरा मारण्याआधी सावधान... महिलांना आता राजकारणातलं बरंच काही कळतंय.

Updated : 28 Jun 2019 1:00 PM GMT
Next Story
Share it
Top