पहिल्याच भाषणात आ. श्वेता महाले यांनी मांडले महत्त्वाचे प्रश्न
Max Woman | 20 Dec 2019 1:04 PM IST
X
X
विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्या नंतर आ. श्वेताताई महाले यांना बुधवार, दि. १८ डिसेंबर रोजी प्रथमच सभागृहात बोलण्याची संधी मिळाली. राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या सुरूवातीला केलेल्या अभिभाषणावर विधानसभेमध्ये झालेल्या चर्चेत भाषण करतांना आ. श्वेताताई महाले यांनी शेतकरी, शेतमजूर, महिला, अंगणवाडी सेविका यांच्या प्रश्नांना वाचा फोडली, जिजाऊ जन्मस्थळ विकास आणि खामगाव - जालना रेल्वेमार्गाच्या कामात गती द्यावी अश्या महत्त्वाच्या मागण्या केल्या. या शिवाय त्यांनी चिखली मतदार संघासह जिल्ह्य़ातील अनेक महत्त्वाच्या समस्या सभागृहात मांडल्या.
महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपुरात सुरू आहे. या अधिवेशनाची सुरूवात राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या अभिभाषणाने झाली. राज्यपालांच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेत सर्वपक्षीय सदस्यांनी आपापले विचार व्यक्त केले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रथमतः च सभागृहात पोहचलेल्या आ. श्वेताताई महाले यांना देखील या चर्चेत सहभागी होण्याची संधी मिळाली. या वेळी केलेल्या भाषणात आ. श्रीमती महाले यांनी आपल्या अभ्यासूपणाची चुणूक आणि विविध क्षेत्रातील प्रश्नांविषयी आपल्याला असलेली तळमळ दाखवून दिली.
शेतकरी, शेतमजूर, व अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांना फोडली वाचा
यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकर्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. अश्या संकटकाळी राज्य सरकारने शेतकऱ्यांना सावरण्यासाठी हेक्टरी २५ हजार रुपये आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आ. श्वेताताई महाले यांनी सभागृहात केली. या शिवाय बांधकाम कामगारांना ज्या पद्धतीने वेगवेगळ्या सुविधा आणि सवलती दिल्या जातात त्याच धर्तीवर शेतमजूर , हमाल , ट्रक ड्रायव्हर ,क्लिनर , ऑटो रिक्षा चालक , मकेनिक या व असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सुध्दा कल्याणकारी योजना सुरू करुन शासनाने त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी त्यांनी केली. ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविकांना मिळणारे मानधन अतिशय तुटपुंजे असल्याने आजच्या महागाईच्या काळात त्यांचा चरितार्थ व्यवस्थित चालू शकत नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढवावे अशी मागणी आ. श्वेताताई महाले यांनी आपल्या भाषणातून केली.
१२ जानेवारीला मुख्यमंत्र्यांनी करावी जिजाऊ जन्मस्थळाच्या विकासासंदर्भात घोषणा
महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान असलेल्या शिवाजी महाराजांचे जागतिक दर्जाचे भव्य दिव्य स्मारक राज्य सरकारकडून मुंबई लगतच्या अरबी समुद्रात बांधले जात आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकीर्दीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकाचे भूमीपूजन मागेच करण्यात आले. या शिवाय भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे देखील मुंबईतल्या इंदू मिलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमीपूजन केले. परंतु, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांसह मातृतीर्थ सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊ मॉ साहेबांच्या जन्मस्थळावरील जिजाऊ सृष्टीविषयी राज्यपालांच्या अभिभाषणात काहीही उल्लेख नसल्याबद्दल श्रीमती महाले यांनी खेद व्यक्त केला. येत्या १२ जानेवारीला साजर्या होणार्या जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त सिंदखेड राजा येथे उपस्थिती लावून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जिजाऊ सृष्टीच्या विकासासंदर्भात घोषणा करावी अशी मागणी आ. श्वेताताई महाले यांनी केली.
खामगाव - जालना रेल्वेमार्गास गती द्यावी
आपल्या भाषणात आ. श्वेताताई महाले यांनी जिल्ह्य़ातील सर्वाधिक प्रलंबित प्रश्न असलेल्या खामगाव - जालना रेल्वेमार्गाचा मुद्दा आवर्जुन उपस्थित केला. ब्रिटिश राजवटीत १९१० मध्ये सुरू झालेल्या या रेल्वेमार्गाचे काम स्वातंत्र्यप्राप्ती नंतर ठप्प झाले, याकडे त्यांनी लक्ष वेधले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पहिल्या पाच वर्षांतच हा रेल्वेमार्ग मंजूर केल्याचे श्वेताताई महाले यांनी निदर्शनास आणून दिले. विद्यमान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये प्रचारादरम्यान या रेल्वेमार्गाचे काम सुरू करण्याचे आश्वासन जिल्ह्य़ातील जनतेला दिले होते याची आठवण आ. श्वेताताई महाले यांनी करून दिली. आता मुख्यमंत्री पदावर आल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी खामगाव - जालना रेल्वेमार्गाचे काम तातडीने हाती घेऊन जिल्ह्याला दिलेले आश्वासन पूर्ण करावे अशी मागणी त्यांनी केली.
तीन पक्षाच्या आघाडीतून स्थापन झालेले हे सरकार महिला सक्षमीकरणाचा विषय केवळ बोलण्यापुरताच वापरत असल्याचा चिमटा आ. श्वेताताई महाले यांनी बोलतांना काढला. प्रणिती शिंदे आणि यशोमती ठाकूर यांच्या सारख्या अनुभवी महिला आमदार सत्ताधारी पक्षाकडे असूनही त्यांचा समावेश मंत्रीमंडळात करण्यात आला नाही या बद्दलची खंत श्रीमती महाले यांनी बोलून दाखवली. आपल्या पहिल्याच भाषणात आ. श्वेताताई महाले यांनी शेतकरी, कष्टकरी व महिलांच्या समस्या , सामाजिक व सांस्कृतिक विषय आणि जिल्ह्य़ातील प्रलंबित प्रश्न मांडले. या माध्यमातून त्यांनी आपल्यातील सामाजिक तळमळ आणि अभ्यासू वृत्तीचा परिचय सभागृहाला करून दिला. विशेष म्हणजे नवख्या आमदार असून देखील प्रभावी भाषण केल्या बद्दल भारतीय जनता पक्षासह इतरही पक्षातील अनेक ज्येष्ठ आमदारांनी श्वेताताई महाले यांचे कौतुक आणि अभिनंदन केले.
https://youtu.be/l8IALlp3sgM
Updated : 20 Dec 2019 1:04 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire