Home > रिपोर्ट > अठ्ठावीस युगांचं एकटेपण...

अठ्ठावीस युगांचं एकटेपण...

अठ्ठावीस युगांचं एकटेपण...
X

गेल्या दोन तीन वर्षापासून आषाढी एकादशी आली की, जेष्ठ्य कवी श्री अरुण कोल्हटकर यांची अठ्ठावीस युगांचं एकटेपण ही कविता कोणत्या न कोणत्या व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवरुन फॉरवर्ड होत असते. ही कविता जितक्या वेळा वाचावी तितक्या वेळा त्यातील मर्म अधिक समजत जाते. बाईपणाच अठ्ठावीस युगांचं एकटेपणाचं दु:ख कस असेल? भावनिक बांध मोकळे करायला आपल माणूसही जेव्हा जवळ असून जवळ नसेल तेव्हा काय अवस्था होते हे शब्दात कस व्यक्त करायचं.

मराठवाड्याच्या दुष्काळा निमित्त मराठवाड्यातील बहुतांश गावे फिरलो. या ठिकाणी राहणार्‍या एकट्या स्त्रियांचे प्रमाणही मोठे आहे. एकटीने जीवन जगत असतांना येणार्‍या सगळ्या संकटांवर मात करत या महिला जगत आहे. कामानिमित्त अनेक ठिकाणी जात असतो अनेक लोक भेटत असतात. अगदी खेडे गाव ते दिल्ली मुंबई सारखी शहर आणि या शहरात राहणार्‍या अनेक स्त्रिया. अशाच काही भेटल्या स्त्रियांच्या एकटेपणाच हे वास्तव: पुणतांबा यागावी आमच्या संस्थेचे आशा केंद्र हे हॉस्पिटल चालत. पुणतांब्याला जायचं होत म्हणून मुंबई ते शिर्डी असा रात्रीच्या बसने प्रवास सुरू केला. माझ्या शेजारी 55-60 वर्षाची एक स्त्री होती. बस सुरू झाल्यावर शिर्डीला साईबाबाच्या दर्शनासाठी जात आहे का असे बोलून आमच्यामधील संवाद सुरू झाला होता. अधून मधून त्यांनाचा फोन वाजत होता पण त्यांनी फोन घेतला नाही. एकदा बहिणीचा फोन होता म्हणून मी आता बरी आहे. आपण दोन दिवसांनी बोलू असे म्हणून फोन कट केला. माझ्याशी बोलतांना तू एकटी प्रवास नेहमी करते का विचारले.

मी, हो म्हणाले. तेव्हा ‘कितनी लकी हो’! ‘किसी का कोई टेंशन नही’! यावर मी त्यांना तुम्ही पहिल्या वेळी एकटीने प्रवास करता का हे विचारले? तेव्हा हो म्हणल्या ! बोलू लागल्या, ‘ सोला साल की थी तब शादी हो गयी. फिर बच्चे हुवे. हजबेंड के साथ रहेती हू. पर कभी उसके साथ जी नही पाई. उसने जो बोला वही किया. मै कभी कुछ बोल दू तो उनका काम, उनके दोस्त, उनके लोग सब कुछ उनका मेरा कभी कुछ है ही नही. ३५ साल हो गये शादी को. आज इसलीये घर से निकल चुकी हू. दोन दिन साई बाबा के मंदिर मे रहुंगी. फिर जब दिल बोला तोही वापस जाने का सोचुंगी. कितने सालो के बाद खुल कर सांस ले रही हू. हे सगळं बोलत असतांना त्या सारखं रडत होत्या. पुढे नाशिक हायवे जवळ बस थांबली. काही तरी खाऊ या म्हणून आम्ही खाली उतरलो. हॉटेलमध्ये त्यांनी डोसा ऑर्डर केला. वेटरने सर्व्ह केल्यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता खायला सुरुवात केली. परत वेटरला बोलावून अजून एका डोशाची ऑर्डर दिली. मी सहज विचारलं डोसा आवडतो तुम्हाला. त्यावेळी त्यांनी दिलेल उत्तर मला वॉटरचित्रपटाची लाडू खाण्याच्या प्रसंगाची आठवण करून देणारा वाटला. त्यांनी पंधरा वर्षापूर्वी डोसा गणपती पाहायला गेले तेव्हा खालला होता. त्यानंतर त्यांना हॉटेलमधील डोसा कधीही खायला मिळाला नव्हता. पुढे आम्ही बसमध्ये बसलो. पहाटे ४.०० वाजता शिर्डीला पोहचलो. शेवटचे बाय करतांना मुझे लगा तो मै शनी शिंगणापुरभी घुम कर आयुंगी असे म्हणाल्या. त्यांनी साई आश्रमाची वाट धरली आणि मी आमच्या आशा केंद्राची.

गेल्या काही दिवसांपासून माझी आई आजारी होती. मधल्या काळात तिला अॅडमिटही कराव लागलं होत. हॉस्पिटलमध्ये आईसोबत राहताना तिथल्या इतर लोकांशी ओळख झाली. दिवसभर हॉस्पिटलमध्ये बसून तुम्ही काय करणार म्हणून आजूबाजूच्या रूममधील पेशंटसोबत असलेले नातेवाईक थोड्यावेळ का असेना गप्पा मारायला येत. याठिकाणी दम्याने आजारी असलेले एक गृहस्त अॅडमिट झाले होते. सोबत त्यांची पत्नी होती. एकूण तीन मुले. दहा दिवसाच्या काळात तिन्ही मुलांनी कधी कोणी डबा आणून द्यायचा हे ठरवले होते. घरून येणारा डबा एकदा सकाळी आला की तोच दुसर्‍या दिवशी सकाळी येत. गृहस्थ आजारी असले तरी स्वभाव कडक. आपण हॉस्पिटलमध्ये आहोत याची काळजी नाही तिथेही आपल्या पत्नीला नेहमीच्या पद्धतीने ओरडूनच बोलणार. दमा असल्यामुळे रात्रभर त्यांना खोकला येत. त्यामुळे बाईनं रात्रभर झोप नाही. जी काही औषध आणायची. त्यासाठी त्यांनाच सारखं खाली वर येणजाण कराव लागायचं. तरी गृहस्थांचे दोन शब्दही चांगले नाही. त्यांना थोडी झोप लागली की, त्या वेळेपुरत त्यांनी येऊन दोन शब्द बोलायचे. उभा जन्म त्यांचे बोलणे ऐकण्यात गेला. कधी उलट बोलायचा लाग नाही. साध वरजरी मान केली तर हातात जे येईल ते फेकून मारायचं हा त्यांच्या ४०-४५ वर्षाच्या संसाराचा अनुभव होता. अजूनही तेच हाल आहेत असे बाईंचे म्हणणे होते. त्यांनी सांगितलं तितकच वागायचं आणि दोनच शब्द बोलायचे हो किंवा नाही. तिसरा शब्द नाही.

आषाढी वारी सुरू आहे. अनेक भक्तजन पांडुरंगाच्या भेटीला पंढरीत दाखल झाले आहे. ह्या निमित्ताने ज्या स्त्रिया यावारीत दाखल होतात त्यांचे अनुभवही यापेक्षा वेगळे नाही. वर्षानुवर्ष संसार करून अनेकींच्या वाट्याला एकटेपणा येतो. त्यातून येणारे मानसिक ताणतणाव वेगळेच असतात त्यावर बोललेच जात नाही उलट बाई वेडी झाली हेच बोलून तिला टाळले जाते. ज्या स्त्रिया एकट्या राहतात त्यांचे एकटेपण त्यातील समस्या ह्या अजून वेगळ्या आहेत.

रखम्याच्या वाट्याला अठ्ठावीस युगांचं एकटेपण चुकलं नाही तर ते तुमच्या आमच्या घरातील सर्वसामान्य स्त्रीला कसे चुकेल...... घरात इतकी लोक असून तू एकटी कशी म्हणतेस? घरात सगळं काही आहे, भरला संसार आहे याचे उदात्तीकरण करत बाईच्या गरजाकडे लक्ष दिले जात नाही. असेच काहीसे या कवितेतील शेवटच्या दोन कडव्यात सांगितले गेले आहे.

वामांगी

अरुण कोल्हटकर

देवळात गेलो होतो मधे

तिथं विठ्ठल काही दिसेना

रख्माय शेजारी

नुस्ती वीट

मी म्हणालो ऱ्हायलं

रख्माय तर रख्माय

कुणाच्या तरी पायावर

डोकं ठेवायचं

पायावर ठेवलेलं

डोकं काढून घेतलं

आपल्यालाच पुढं मागं

लागेल म्हणून

आणि जाता जाता सहज

रख्मायला म्हणालो

विठू कुठं गेला

दिसत नाही

रख्माय म्हणाली

कुठं गेला म्हणजे

उभा नाही का माझ्या

उजव्या अंगाला

मी परत पाह्यलं

खात्री करून घ्यायला

आणि म्हणालो तिथं

कोणीही नाही

म्हणते नाकासमोर

बघण्यात जन्म गेला

बाजूचं मला जरा

कमीच दिसतं

दगडासारखी झाली

मान अगदी धरली बघ

इकडची तिकडं जरा

होत नाही

कधी येतो कधी जातो

कुठं जातो काय करतो

मला काही काही

माहिती नाही

खांद्याला खांदा भिडवून

नेहमी बाजूला असेल विठू

म्हणून मी पण बावळट

उभी राहिले

आषाढी कार्तिकीला

इतके लोक येतात नेहमी

मला कधीच कसं कुणी

सांगितलं नाही

आज एकदमच मला

भेटायला धावून आलं

अठ्ठावीस युगांचं एकटेपण

- रेणुका कड

Updated : 12 July 2019 5:23 AM GMT
Next Story
Share it
Top