होय, अगोदर ती दलित असते मग महिला…
X
आपल्याकडे दलित महिलेवर बलात्कार झाला त्याबद्दल जनतेचा उद्रेक झाला की जात कशाला बघता? ती एक स्त्री आहे अशी जात निरपेक्ष मानवतावादी उपदेशांची पोस्ट मालिका सुरू होते. वास्तविक निषेध करणारे स्त्रीवरील अत्याचार व दलित असण्याविषयी झालेला अत्याचार या दोन्ही विषयीही बोलत असतात परंतु त्यातील जातीय उतरंडीचा चेहरा सौम्य करण्यासाठी अशा मानवतावादी उपदेशाचे डोस दिले जातात.
होय दलित महिलेवर अत्याचार होताना ती अगोदर दलित असते.एक उदाहरण देतो. पोलीस कोठडीत पारधी भटके-विमुक्त दलित महिला पूर्वी ठेवल्या गेल्या तेव्हा त्या कोठडीत त्यांच्यावर अनेकदा अत्याचार झाले. फुलन देवीच्या आत्मचरित्रात असे अत्याचार दिले आहेत.
रिया चक्रवर्ती कोठडीत असताना तिला स्पर्श करणे सोडाच तिच्याकडे पोलीस वाईट नजरेने तरी बघू शकतील का? कारण तिच्या मागे उभी असणारी अर्थसत्ता, जातसत्ता, माध्यम सत्ता असल्याने ती हिम्मत होणार नाही. समाजातील राजकीय पक्षात काम करणाऱ्या महिला, उद्योगपतींच्या घरातील महिला, उच्च जातीतील महिला यांच्याबाबत असा मनात विचार आणण्याची सुद्धा हिम्मत होणार नाही. अगदी गाव पातळीवर त्या गावातील उच्चवर्णीय पाटील यांच्या घरातील मुलगी महिला एकटीच घरी चालली तरीही ती कोण आहे? असे केल्यास त्याचा परिणाम काय होईल? याचा विचार अगोदर मनात येतो. गावातील एखाद्या जातीची संख्या मोठी असेल तरीही असा विचार मनाच्या तळाशी असतो आणि दलित, गरीब शोषित कुटुंबातील मुली महिलांच्या बाबतीत होऊन होऊन काय होणार आहे हे गृहितक मनाच्या तळाशी असते, तेव्हा महिला या आजच्या जातीव्यवस्था व विषमतेच्या समाजात आहेतच आहेत परंतु त्यातही त्यांच्या पाठीशी जातसत्ता, धनसत्ता राजसत्ता आहे. त्या किमान सुरक्षित राहण्याची शक्यता वाढते..... शक्यता अशा अर्थाने म्हणालो की लगेच काही उदाहरणे हा विषय सौम्य बनवण्यासाठी असे प्रकार घडले असे दिली जातील परंतु सर्वसाधारण स्थितीत जात व्यवस्था हे वास्तव येते हे आपण समजावून घेतले पाहिजे.
यवतमाळ जिल्ह्यात आंध्र प्रदेशातून येणारे मिरची व्यापारी तिथे कामाला येणाऱ्या गरीब शाळेतील मुलींचे लैंगिक शोषण करतात त्यातून अनेक मुली गर्भवती राहिल्या आहेत. निपाणी येथील तंबाखू व्यापारी कामगार महिलांचे लैंगिक शोषण करतात त्याचे तपशील अनिल अवचट यांच्या ‘माणसं’ या पुस्तकात दिले आहेत. अशा स्थितीत त्या महिलांची आर्थिक स्थिती व जात यामुळेच ही मग्रुरी वाढते त्या गावातील पाटील सरपंच यांच्या कुटुंबातील महिलांकडे वाकडी नजर करायची या मस्तवाल व्यक्तींची हिम्मत होत नाही. हे लक्षात घ्यायला हवे.






