Home > Max Woman Blog > उन्हाळ्यातील पाणी प्रश्न आणि महिला आरोग्य : सोमिनाथ घोळवे

उन्हाळ्यातील पाणी प्रश्न आणि महिला आरोग्य : सोमिनाथ घोळवे

महिलांच्या डोक्यावरचा हंडा खाली कधी उतरणार? पायपीट आणि शेतातली कष्टाची कामं... अशा अनेक संकटांचा सामना करणाऱ्या महिलांच्या आरोग्याची काळजी आपल्याला वाटत नाही का? जागतिक आरोग्य दिनानिमित्त पाणीटंचाईचा महिलांच्या आरोग्यावर होणारा परिणाम, व्यवस्था आणि घरातील पुरुषमंडळीकडून होणारं दुर्लक्ष या संदर्भात डॅा. सोमीनाथ घोळवे यांनी महिलांच्या आरोग्याच्या प्रश्नाबाबत उपस्थित केलेला सवाल


उन्हाळ्यातील पाणी प्रश्न आणि महिला आरोग्य : सोमिनाथ घोळवे
X

ग्रामीण भागातील अनेक खेड्यांमध्ये आणि दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांमध्ये फेब्रवारी-मार्च महिना (उन्हाळा) सुरु झाला की पिण्याच्या पाण्याची प्रचंड टंचाई असतेच. काही गावांचा (काही तालुक्यांचा) अपवाद वगळता ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यास शासनाला अपयश आल्याचे मान्य करावे लागेल. गेल्या 60 वर्षात ज्या गतीने पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्याचे प्रयत्न झाले आहेत, पुढे हीच गती राहिली तर पुढील किती वर्षे ही समस्या सोडवण्यासाठी लागतील हे देखील सांगणे कठीण आहे. मात्र, पाणी टंचाईग्रस्त परिसरातील महिलांनाच पाणी भरण्याचे काम करावे लागते, हे कष्टाचे, मेहनतीचे असलेल्या कामामुळे महिलांच्या आरोग्यावर अनेक परिणाम होत आहेत, ते हळूहळू पुढे येऊ लागले आहेत. त्यामुळे उन्हाळ्यातील पाणीप्रश्न आणि महिला आरोग्य यांचा अतिशय घनिष्ट संबध आहे. त्याची उलगडा करण्याची गरज आहे. ७ एप्रिल या आरोग्य दिनानिमित्ताने उन्हाळ्यातील पाणीप्रश्नामुळे महिलांच्या आरोग्यावर कशा प्रकारे परिणाम होत आहे, याचा आढावा या लेखामध्ये घेतला आहे.

ग्रामीण भागातील पाणीटंचाई

प्रत्येक वर्षी उन्हाळा सुरु झाला की पाणीप्रश्न दिसून येतो. त्यात महिला आणि लहान बालके यांच्या डोक्यावर हंडे-घागरी, सायकलीला अडकवलेली केंड-घागरी, हातगाड्यावर पाण्याच्या टाकी, घागरी व इतर माध्यमातून पाणी मिळवण्यासाठी धावपळ करत असताना दिसून येते. हे चित्र प्रत्येक उन्हाळ्यात कमी-अधिक फरकाने दिसते. अलीकडे काही पुरुषमंडळी घरातील महिलांबरोबर पाणी भरण्याच्या मदतीसाठी येत असल्याचे दिसतात. मात्र संख्या फार कमी आहे. प्रामुख्याने पाणी भरण्याचे काम महिलांनाच करावे लागते. या वर्षी देखील अनेक जिल्ह्यांमध्ये टंचाईग्रस्त गावांना टॅकरने पाणीपुरवठा करण्यासाठी ई-निविदा मागवल्या आहेत. तर काही जिल्ह्यांमध्ये उशिराने निविदा काढण्याची प्रकिया चालू आहे. त्यामुळे आता किती गावांना टँकरने पाणी पुरवठा चालू आहे ही आकडेवारी उपलब्ध नाही.

गेल्या दोन वर्षांपासून चांगला पाऊस झाला असल्याने पाणीटंचाई नसल्याचा भास होत आहे. वास्तवात अनेक गावांना पाणीटंचाई आहे. टँकरची संख्या दिसल्याशिवाय आपल्याला पाणीटंचाई असल्याचे मान्य होत नाही. टँकर संख्या वाढली की जलसंधारणाच्या कामांविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होतात. त्यामुळे शासकीय पातळीवरून पाणी पुरवठा करण्यासाठी पुढाकार घेण्यात येत नाही. टँकर चालू करण्यासाठी टंचाईग्रस्त गावांमधून पाणी पुरवठ्याची मागणी होण्याची वाट पाहिली जाते.

या वर्षी करोनाची पार्श्वभूमी असल्याने पिण्याच्या पाण्याची मागणी करण्यास रस्त्यावर उतरून आंदोलन, मोर्चा करणे गावकऱ्यांना (महिलांना) शक्य नाही. मात्र पिण्याच्या पाणी मिळवण्यासाठी अनेक गावांना खूप मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ह्या समस्येवर गावकऱ्यांनी कशी मात करावी हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. या प्रश्नाला लोकप्रतिनिधी फारसे गांभीर्याने घेत नाहीत. केवळ आश्वासने दिली जातात. दुसऱ्या बाजूने गावकऱ्यांनी प्रशासनाकडे पाणीटंचाईची समस्या सोडवण्यासाठी मागणी केली, तर ऐकूण घेतली जाते. पण समस्या सोडवली जात नाही. हा गेल्या 7 ते 8 वर्षातील पाणीटंचाई ग्रस्त परिसरातील गावांचा अनुभव आहे.

पाणीप्रश्न आणि महिला

पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम-कष्ट करणाऱ्या महिला, मात्र पुरुषप्रधान संस्कृतीने कुटुंबामध्ये कामांची विभागणी करून महिलांना दुय्यम स्थान दिले. कुटुंबातील प्रत्येक कामाला पुरुषाच्या बरोबरीने महिला उभा राहत असताना दिसत असली, तरी कुटुंबातील श्रमाचे विभाजन करत कमी कष्टाची, कमी दर्जाची कामे महिलांच्या वाट्याला देवून टाकली. त्यात पाणी भरण्यासारखे कष्टाचे असलेले देखील काम महिलांकडे चलाखीने देवून टाकले. त्यामुळे ग्रामीण भागात महिला आणि पाणी भरणे या एकाच नाण्याच्या दोन बाजू झालेल्या आहेत. घरातील पाण्याचा भरण्याचा विचार महिलांना वगळून करता येत नाही. दुष्काळी भागात, दुर्गम भागात पाणीटंचाईला सुरुवात झाली की महिलांना झळ बसायला सुरुवात होते. ग्रामीण भागातील महिलांना जास्त कष्टांची कामे करावी लागत असल्याने शरीराची मोठ्याप्रमाणावर झीज होते.

ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये नळांद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असल्यायचा दावा आहे. पण पाणी टंचाईग्रस्त परिसरातील गावांमध्ये नियमित किती दिवस नळाला पाणी येते हा प्रश्नच आहे. अनेक गावांमध्ये नळ योजना आहे तर पाणी नाही. पाणी आहे तर नळ योजना नाही ही अवस्था आहे. मात्र अनेकदा उन्हाळा सुरु झाला की नळाला पाणी येणे कमी होते. अनेक गावांमध्ये प्रत्यक्ष उन्हाळ्यातील तीन किंवा चार महिने नळयोजना असताना देखील पाणी पुरवठा होत नाही. कारण नळाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहीर, बोअरवेल, तलाव व इतर स्रोत कोरडे पडलेले असतात. अशावेळी टॅकरने पाणी पुरवठा गावाला होतो, किंवा गावात पाणी चालू असलेलेल्या बोरवेल-विहिरीचे अधिग्रहण करावे लागते. अधिग्रहण केलेल्या ठिकाणाहून पाणी वाहून आणावे लागते. पाणी वाहून आणावयाचे म्हटले की महिलांच्या डोक्यावर किंवा कमरेवर हंडा-घागर आलीच, हे समीकरण सर्वत्र पहावयास मिळते.

दुसरे असे की, ज्या गावामध्ये नळ योजना असते त्या गावातील देखील पाणी मिळण्यात विषमता दिसून येते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरीब कुटुंबाला नळ योजनेतील कनेक्शन मिळत नाही. त्यांना सार्वजनिक नळाहून पाणी वाहूनच आणावे लागते. दुष्काळी भागात सार्वजनिक नळाद्वारे पाणी पुरवठा करणारी व्यवस्था पाण्याअभावी बंद पडल्यानंतर पाणी जेथे विहीर, बोअरवेल, आड, हातपंप, टॅकर उभा असेल तेथून किंवा टॅकर ज्या विहिरीत पलटी केले जाते, तेथून पाणी वाहून घ्यावे लागते. पाणी मिळण्याचे मध्यम-साधन कोणतेही असले, तरी महिलांनाच जबाबदारी घेवून पाणी भरावे लागते. हे काम महिलांच्या दृष्टीने जबाबदारीचे असले तरी कष्टप्रद आहे.

अलीकडच्या काळात ग्रामीण भागातील शेतीसाठीच्या भूगर्भातील पाणी प्रचंड उपश्यामुळे भूजलपातळी खोलवर गेली आहे. विहिरीवर पाणी भरणे अतिशय त्रासदायक आणि कष्टप्रद झालेले आहे. अशा खोलवर जलपातळी असलेल्या विहिरीतून पाणी शेंधून भरणे, पाणी भरलेल्या हंडे-घागरी पाणी डोक्यावर किंवा कमरेवर घेवून शरीराचा तोल सांभाळत जीवघेणे कसरत, पायपिठी महिलांना करावी लागते. प्रसंगी पोटात गर्भ किंवा मुलबाळ कमरेवर असले तरी महिलांची पाणी भरण्यापासून सुटका होत नाही. काही ठिकाणी तर नदीच्या पत्रातून झरे खोधून वाटीने पाणी हंड्यात भरावयाचे, आणि ते घेवून घरी येणे, अशा कसरती कराव्या लागतात.

नेहमीच पाणी भरणे आणि इतर काही कष्टाची कामे करण्यामुळे महिलांच्या आरोग्याची मोठी हानी होत आहे. मात्र त्याकडे महिला दुर्लक्ष करत असतात. डोक्यावर हंडा, घागर, कळशी घेऊन चालणे, तेही दूरचे अंतर. डोक्यावर पाणी पाहण्यामुळे डोक्याचे केस गळती होते, पाठीचे कणा दुखणे, झीज होणे, डोके दुखणे, डोक्यासंदर्भातील इतर आजार असल्याचे प्रमाण महिलांमध्ये वाढले आहे. कमरेवर पाणी वाहन्यामुळे मणक्याचे, मानेचे, सांधेदुखी, पायदुखी, पोटाचे विकार वाढणे, शारीरिक व्यंग तयार होणे, गर्भवती महिला असेल तर गर्भपात होणे अशा अनेक आजारांना महिला बळी ठरत चालल्या आहेत. काही तरुण महिलांना तरुणपणामुळे आजार जाणवत नसतील. तरी 45 वयानंतर हळूहळू जाणवण्यास सुरुवात होते. त्यावेळी आरोग्याविषयी हळूहळू बोलण्यास सुरुवात करताना दिसून येतात. अलीकडे कष्टाच्या कामांमुळे (पाणी भरणे व इतर) तरुणपणीच आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्याचे अनेक उदाहरणे पुढे आले आहेत. उदा. महिलांच्या स्तनांचा कॅन्सर, संधिवात, डायबिटीस, उच्च रक्तदाब इत्यादी. महिलांच्या आरोग्याकडे व्यवस्था आणि कुटुंबातील पुरुषमंडळी अजाणतेपणाने किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसून येते.

स्वातंत्र्य मिळून इतके वर्ष होवूनही पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देऊ शकलो नाहीत हे दुर्दैव आहे. रोजंदारी, कष्टकरी, हातावर काम करून पोट भरणाऱ्या महिलांना दिवसभर काम करायचे आणि संध्याकाळी-सकाळी पाणी मिळवण्यासाठी वणवण. हा दिनक्रम चालू होतो. जास्त कष्टाची कामे असली तरी कमी महत्व देऊन महिलांकडूनच करून घेणे ही येथील संस्कृती. जास्त कष्टाची कामे करण्यामुळे महिलांच्या शारीराची किती झीज होते, त्यांच्या शरीरावर काय आणि कोणत्या प्रकारचे परिणाम होतात याचा विचार करण्यात येत नाही. महिला देखील त्याकडे दुर्लक्ष करतात. पाणी भरण्यासारखे कष्टाचे काम असताना देखील त्यांना त्यांचीच (महिलांची) जबाबदारी आहे असे वाटते. त्यामुळे पाणी भरणे कितीही त्रासाचे असले तरी विरोध करत नाहीत. पण माध्यमातून महिलांच्या आरोग्याचे अनेक समस्या-प्रश्न पुढे आले आहेत. त्याचे काय करावयाचे हा प्रश्न आहे. तसेच महिलांनीच पाणी का भरावयाचे? या श्रमविभागणीत बदल कधी घडून येणार आहे. पुरुषसत्ताक मानसिकता कधी बदलणार आहे. त्यासाठी सानाजिक आणि राजकीय व्यवस्था अश दोन्ही पातळीवर बदल घडवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

ग्रामीण भागातील स्त्रियांचे प्रश्न हे बदलांची वाट पाहत आहेत. शहरी स्त्रियांच्या तुलनेत ग्रामीण स्त्रियांचे जीवन जास्त कष्टाचे आहे. घरकाम, स्वच्छता, स्वयंपाक, धुणीभांडी, साफसफाई या बरोबर घरातील पाण्याचे व्यवस्थापन करणे ही महिलांची मुख्य महत्वाचे कामे. ही घरातील कामे नेहमीचे आहेत. महिलांच्या कष्टाची चर्चा हळूहळू सुरु झाली आहे. मात्र या पाणीटंचाई आणि आरोग्य या बाबीकडे दुर्लक्ष करण्यात येते. आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. त्यामुळे आरोग्याची केवळ चर्चाच नाही तर उपाययोजना देखील होणे आवश्यक झाले आहे. त्या संदर्भातील सखोल संशोधन होणे देखील गरजेचे आहे. महिला पाणी भरणेच नाही तर इतरही कष्टाची अनेक कामे करत असतात. त्या कामांचा देखील एकत्रित परिणाम हा आरोग्यावर होतो. या सर्वांचा सहसंबध लावण्यात आला नाही. आरोग्य दिनाच्या निमित्ताने किमान पातळीवर महिलांकडील पाणी भरण्याची जबाबदारी पुरुषांकडे हळूहळू का होईना सुरुवात झाली तरी महिलांच्या आरोग्याच्या वाढत्या समस्याचे प्रमाण कमी होईल. ही परिवर्तनाची नांदी ठरेल हे मात्र निश्चित.

लेखक : डॉ.सोमिनाथ घोळवे, हे शेती, दुष्काळ, पाणी प्रश्नांचे अभ्यासक असून 'द युनिक फाउंडेशन, पुणे' येथे वरिष्ठ संशोधक आहेत. (sominath.gholwe@gmail.com)

Updated : 6 April 2021 7:19 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top