Home > Max Woman Blog > मुख्यमंत्री साहेब दिलेला शब्द पाळणार?

मुख्यमंत्री साहेब दिलेला शब्द पाळणार?

वाढवण बंदराबाबत शिवसेना पक्ष स्थानिक जनतेसोबत राहील, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रचारादरम्यान दिले होते. आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असून त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री साहेब दिलेला शब्द पाळणार?
X

आज मुंबई कफ परेड ते डहाणू झाईपर्यत स्थानिक मच्छिमारांनी बंद पुकारला आहे. ह्या बंदला मुंबई आणि पालघरमधील सर्व मच्छिमार आणि कोळीवाड्यातून १००% प्रतिसाद मिळाला आहे. मुंबई ते विरार आणि विरार ते अर्नाळा जेटीवर जातांना कळंब गावापासुन कोळीवाड्याचे प्रवेशद्वार आहे. कळंबपासूनच गावात नाकाबंदी सुरू होती. या बंदमध्ये मढ, माहीम कोळीवाडा, उत्तन, डहाणू झाई, सायन कोळीवाडा, कफ परेड, डॉकयार्ड, गोराई, केळवा माहीम अशा सर्व कोळीवाड्यात आज कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. ह्या सर्व ठिकाणच्या बंदमध्ये स्थानिक मच्छिमार मोठ्या संख्येने उपस्थित होते. अर्नाळा जेटीवर नॅशनल फिश वर्कर फोरमचे सरचिटणीस मोरेश्वर वैतीनी या बंदमागची भूमिका स्पष्ट करतांना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब दिलेला शब्द पाळा. आम्ही तुम्हाला आठवण करून देत आहोत हे मत मांडले.

वाढवण बंदराबाबत शिवसेना पक्ष स्थानिक जनतेसोबत राहील, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रचारादरम्यान जाहीर केले होते. आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असून त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. केंद्र सरकार बुलेट ट्रेन प्रकल्पापाठोपाठ वाढवण बंदर प्रकल्प लादण्याचा प्रयत्न करीत असताना या दोन्ही प्रकल्पांबाबत राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून शिवसेनेची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

डहाणू तालुक्यात हे बंदर झाले तर आयात आणि निर्यात यांना खूप मोठ्या प्रमाणात चालना मिळणार असून ९०% कंटेनरची वाहतूक ही वाढवण बंदरातून केली जाईल. या बंदराच्या माध्यमातून आयात होणार कंटेनर हे देशभरात वितरित केले जाणार आहेत. वाढवण बंदराला तत्त्वतः मंजुरी दिली असूनही येथील स्थानिकांचा ह्या बंदराला विरोध कायम आहे. गेली १८ वर्षे स्थानिक मच्छिमार, भूमिपुत्र आणि बागायतदार वाढवण बंदर संघर्ष समितीच्या माध्यमातून वाढवण बंदर रद्द करावे यासाठी सतत लढा देत आहे. वाढवण बंदरामुळे आयात निर्यातीला चालना मिळते असली तरी स्थानिकांच्या ह्या बंदराला तीव्र विरोध आहे.

पालघर जिल्ह्यातील प्रास्ताविक वाढवण बंदराला विरोध म्हणून पालघर विधानसभा आणि डहाणू विधानसभा क्षेत्रातील जवळपास परिसरातील पंधरा गावांनी निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला होता.

केंद्र सरकारच्या होऊ घातलेल्या वाढवण बंदराला विरोध म्हणून पालघर जिल्ह्यातील पश्चिम किनारपट्टी लगत असलेल्या वाढवणसह इतर पंधरा गावांनी निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला होता. अनेक वर्षांपासून मागणी करूनही सरकार वाढवण बंदर रद्द करत नसल्याने अखेर स्थानिक नागरिकांनी आक्रमक होत मतदानावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे वाढवण सह वरोर , धाकटी डहाणू , टीगरे पाडा , गुंगवाडा सह परिसरातील मतदान केंद्रांवर शुकशुकाट होता . या भागात जवळपास दहा ते बारा हजार मतदार होते .

येथील स्थानिक हे वर्षानुवर्ष आणि पिढ्यांपिढ्या या किनारपट्टीवर वसलेले आहेत. त्यांनी निसर्गाचे जतन करूनच किनारपट्टीचे संरक्षण केले आहे परंतु महाकाय वाढवण बंदर झाले तर हे बंदर भविष्यात विनाशकारी होईल आणि येथील स्थानिकांचे , मच्छिमारांचे , शेतकऱ्याचे मोठे नुकसान होणार होईल, समुद्रातील जैवविविधता नष्ट होईल आणि स्थंनिकांवर उपासमारीची वेळ येईल. ही भीती आणि चिंता मच्छिमारांनी व्यक्त केली आहे. 'एकच जिद्द वाढवण बंदर बंद'चा नारा दिला आहे.

यावेळी सहभागी असलेल्या सर्व मच्छिमारांनी विकासाला आमचा विरोध नाही ही भूमिका व्यक्त केली आहे. केंद्र सरकार सबका साथ सबका विकास म्हणत सत्तेत आले असले तरी प्रत्यक्षात कृती किसका साथ आणि किसका विकास यावर मोठे प्रश्नचिन्ह आहे.

- रेणुका कड

Updated : 16 Dec 2020 11:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top