Home > Max Woman Blog > आम्ही वडाला फेर्‍या मारतो, कारण..

आम्ही वडाला फेर्‍या मारतो, कारण..

आम्ही वडाला फेर्‍या मारतो, कारण..
X

अनेक वर्षे संसार झाला. मुलाबाळांची लग्नंही झाली. सुना, जावई आले. नातवंडं झाली आणि मग बायको आवडत नाही म्हणून आत्याला तिच्या नवर्‍याने सोडलं. ती माहेरी येऊन राहू लागली. वटसावित्रीचा दिवस उजाडला. परित्यक्ता आत्या हाच नवरा सात जन्म मिळो म्हणून वडाला फेर्‍या मारू लागली.

मी तिला म्हटलं, " अगं, तुझ्या नवर्‍यानं तुला सोडलं ना? तरिही तोच नवरा सात जन्म कशाला हवाय तुला?"
आत्या म्हणली, "पोरी, त्यानं त्याचा धर्म सोडला. आपण आपला धर्म पाळावा."

दर वटपौर्मिणेला आमचा हा वादसंवाद व्हायचाच. आत्या काही ऎकत नव्हती. तिची वटपुजा चालूच होती.
मग मला सुचलं, " अगं आत्या, तुला सोडल्यावर तुझ्या नवर्‍याने दुसरी बायको केली. तीही वडाला फेर्‍य मारीत असणार. म्हणजे हीच सवत तुला सात जन्म मिळणार बघ. कसं म्हणतेस?"

ही गोळी लागू पडली. आत्यानं हातातलं पुजेचं ताट फेकून दिलं. म्हणाली, " नको गं बाई, ती अवदसा मला सवत नको. आजपासून पुजा बंद."

( स्त्रोत- कुमुद पावडे, अंतस्फोट )

आम्ही एक सर्व्हेक्षण केलं होतं वटसावित्री पुजेचं ज्यांना आकर्षण आहे अशा बायकांचं.
" तुम्ही वडाला फेर्‍या मारता, ते अंत:प्रेरणेनं की दबावाखाली? खरंच हा नवरा तुम्हाला सात जन्म हवाय का?"
निम्म्यापेक्षा अधिक बायकांचं उत्तर होतं, " सात जन्म चुलीत घाला. याच जन्मात नको झालाय मुडदा. सोय असेल तर ही साखळी तोडावी म्हणून आम्ही इथल्याइथं उलट्या फेर्‍याही मारायला तयार आहोत."
मग ह्या फेर्‍या का मारताय?

" नाही केली वटपुजा तर शेजारीण संशय घेते. नवरा मारहाण करतो. लोकं नस्त्या चर्चा करतात. त्यापेक्षा फेर्‍या मारलेल्या बर्‍या."

काही बायका म्हणाल्या, " नवरा चांगला आहे. आम्ही आवडतो परस्परांना. चालेल हाच नवरा. शिवाय या पुजेच्या निमित्ताने नवर्‍याकडून नवी साडी, कधीकधी दागिने, पार्टी, सिनेमा हे सारे उकळता येते. मलाही आवडतं, नटायला मुरडायला. काय बिघडलं या पुजेनं?"

काही म्हणाल्या, " आम्ही फेर्‍या मारतो, कारण आमची ही इन्व्हेस्टमेंट आहे. लग्नानंतरचे काही दिवस सोडले तर नवरा वाईटच वागत होता. मग सुधारणेचं पॅकेज वापरलं. सलग २०,२५ वर्षांनंतर कुठं नवरा सुधारला. आता चांगला वागतो. तेव्हा पुढची सात जन्मं हाच असलेला बरा. परत नवा नवरा म्हणजे पुन्हा उमेदीची २५ वर्षे दुरुस्तीत जाणार. त्यापेक्षा हाच बरा. कळलं ना? ही पुजा म्हणजे आमची गुंतवणूक आहे."

काही रामतीर्थकर पंथीय बायका म्हणाल्या, " वडापासून ऑक्सीजन मिळतो. ही सार्ट ऑफ निसर्गपुजा आहे. आमची हिंदुंची ही सुवर्णपरंपरा आहे. तुम्ही इतर धर्मातल्या गोष्टींवर का बोलत नाही?"

" छान. पण ऑक्सीजन नवर्‍याला का नको? दोघांनी जोडीनं का करायची नाही ही निसर्गपुजा? दुसर्‍या धर्माचं म्हणाल तर, तुम्ही स्वत:च्या नवर्‍यासाठीच का करता पुजा? मैत्रिणीच्या किंवा शेजारणीच्या वतीनं का करीत नाही वटपुजा तिच्या नवर्‍यासाठी? वडाचं झाड नाही मिळालं तर वडाच्या झाडाच्या चित्राला काही शहरी बायका फेर्‍या मारतात. चित्रातून कसला ऑक्सीजन मिळतो?"

काही बायका स्मार्ट होत्या. त्या म्हणाल्या, "सात जन्माचं कंत्राट डोक्यात आमच्या जन्मापासून आमच्या डोक्यात फिक्स बसवण्यात आलंय... आम्ही ही पुजा करतो कारण आमची प्रार्थना वेगळी असते. देवा, हाच जन्म सातवा डिक्लेअर कर!"


-प्रा. हरी नरके, ६/६/२०२०

Updated : 6 Jun 2020 12:36 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top