Home > Max Woman Blog > 'त्याला तू ब्लॉक का करत नाहीस?'

'त्याला तू ब्लॉक का करत नाहीस?'

त्याला तू ब्लॉक का करत नाहीस?
X

वैतागून माझ्या एका मैत्रिणीनं न राहावून आज विचारलंच. माझ्या प्रत्येक पोस्टवर तो मूर्खासारख्या कमेंट करतो. तरी, मी काही त्याला ब्लॉक करत नाही. माझ्या सगळ्या जवळच्यांना याचा त्रास होतो. अशा कमेंट करणारा तो एकटा नाही. खूप आहेत.

तरीही, मी या कमेंट्स झेलत असतो. कधी मौन, तर कधी संयत असतो. माझ्या या सोशिकतेचा अनेकांना त्रास होतो.

अगदी, माझे विचार ज्यांना मान्य नाहीत. पण जे माझे जिवलग आहेत. अशा सन्मित्रांनाही माझा असा 'अवमान' आवडत नाही. त्यांना याचा विलक्षण त्रास होतो.

एकच नाही, खूप जण असे आहेत. की जे माझे फेसबुकवर मित्र आहेत. भयंकर पद्धतीने माझ्या पोस्टवर व्यक्त होतात आणि तरीही मी त्यांना ब्लॉक करत नाही. याचा अर्थ, मी कोणालाच आजवर ब्लॉक केले नाही, असे नाही. पण, सहसा करत नाही.

माझ्या लेखी खरे आव्हान हेच तर आहे. तसे ते नसते, तर लोकसभेचे दोन्ही निकाल सलग असे लागले नसते. एकच भूमिका असलेल्या लोकांनी परस्परांशी बोलत राहाणे, हा संवाद नव्हे. 'नामंजूर' वगैरे ग्रुप्स बनवत राहाणे, हा त्यावरचा मार्ग नव्हे.

विसंवादी सूर असलेल्या मित्र- मैत्रिणींसोबतचा संवाद सोडणे खरे नव्हे. फेक चेहरे आणि सुपारीबहाद्दर तर सोडाच, जित्या-जागत्या बहुसंख्य मित्रांनाही गांधी समजत नाहीत. पण, राममंदिराचं भूमिपूजन करताना मोदींनाही गांधीच सांगावे लागतात! मात्र, म्हणून ते खरे गांधी नसतात.

आणि, खरे राम प्रभूही तिथं नसतात.

गांधी- नेहरू न समजणारे, आंबेडकर न कळणारे, संविधानिक मूल्यं विसरलेले मित्रही काही कमी नसतात.

गांधी-नेहरू वा आंबेडकर यांनी चुका केल्या असतीलही, नव्हे केल्याच; पण ती खरीखुरी 'माणसं' होती! हे माणूसपण न समजलेल्या मित्रांशी-मैत्रिणींशी बोलावं तर लागेलच.

मला खरं म्हणजे कोणती जात नाही. 'जगाला प्रेम अर्पावे', याशिवाय धर्म नाही. 'लेना ना देना, मगन रहना' म्हणणारा कबीर मला माझा वाटतो नि कबीराचे शेले विणणारा 'कौसल्येचा राम' ही प्रिय भासतो. इथला साधा माणूस मला माझ्या कथेचा नायक वाटतो.

तरीही, वेगवेगळ्या विचारांच्या मित्रांशी असणारं नातं जपावं, असं वाटतं. त्यांच्याशी बोलावंसं वाटतं. कोणी उलटसुलट बोललं म्हणून ना संताप होतो, ना त्यांच्याशी मैत्र असल्याचा पश्चाताप होतो.

मी तर म्हणेन, आपल्यापैकी प्रत्येकानं विरोधी विचारांच्या मित्र- मैत्रिणींशी मैत्री करायला हवी आणि त्यांना जात- लिंग- धर्माच्या पल्याडची 'आयडिया ऑफ इंडिया' सांगायला हवी. पेरत राहायला हवी ही 'बिलियन कलर्स आयडिया'. उगवेल या खात्रीनं, पावसाच्या साक्षीनं, पेरणी करत राहायला हवी.

अर्थात, त्यासाठी माणूसपणाची आपली ओळख मुळात आपल्यालाही पटायला हवी.

  • संजय आवटे, ज्येष्ठ पत्रकार

Updated : 10 Aug 2020 10:03 AM GMT
Next Story
Share it
Top