Home > Max Woman Blog > विश्वजीत कदम साहेब, लोक कलाकार सरुताई धडे यांना हक्काचे घर कधी देणार?

विश्वजीत कदम साहेब, लोक कलाकार सरुताई धडे यांना हक्काचे घर कधी देणार?

लोक कलाकार सरुताई गेल्या अनेक वर्षांपासून कदम कुटुंबियांसाठी गाणी लिहत म्हणत आल्यात... त्यांनी त्यांचं उभं आयुष्य कदम घराण्याला दिलं... परंतु पंतगराव कदम यांनी दिलेला शब्द कधी पूर्ण होईल याची वेडी वाट सरुताई पाहत आहेत... विश्वजीत कदम आपल्या वडीलांनी दिलेला शब्द पूर्ण का करत नाही? कधी मिळणार सरुताईला हक्काचं घर वाचा दत्तकुमार खंडागळे यांचा लेख...

विश्वजीत कदम साहेब, लोक कलाकार सरुताई धडे यांना हक्काचे घर कधी देणार?
X

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोक कलाकार कडूताई खरात यांना हक्काचे घर बांधून दिले आहे. अत्यंत गोड आवाजात भीमगीतं गावून महाराष्ट्राला भुरळ पाडणा-या कडूतायला त्यांनी हक्काचा निवारा दिला आहे. तीन वर्षापुर्वी आम्ही सर्व प्रथम वज्रधारीतून कडूतायच्या घराचा प्रश्न मांडला होता. तसेच त्यांना वज्रधारी न्युजमधून महाराष्ट्रासमोर आणले होते. नाना पटोलेंनी कडूतायला घर बांधून देण्याची घोषणा केली होती आणि अवघ्या दोन महिन्यात त्यांनी तो शब्द खरा करून दाखवला.

नाना पटोलेंच्या या दातृत्वाला आणि संवेदनशीलतेला आमचा मानाचा सलाम. त्यांनी दिलेला शब्द पाळून आणि खरा करून राजकारणातली संवेदनशीलता अजूनही संपली नसल्याचे दाखवून दिले आहे. या कामासाठी नानांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. त्यांनी केवळ घरच बांधून दिले नाही तर कडूताईला संसारोपयोगी साहित्य दिले आहे. शाब्बास नानाजी शाब्बास, भले तुमची ! कडूतायने तुमचा प्रचार केला नव्हता, तुमच्या कौतुकाची गीतं रचली नव्हती तरी तुम्हाला तिचे घर बांधून द्यावे वाटले यातच तुमचे मोठेपण दिसून येते.

नाना तुमचा हा आदर्श तुमच्याच पक्षाचे राज्यमंत्री विश्वजीत कदम घेतील का ? ते सरूताई धडे या लोक कलाकाराला घर बांधून देतील का ? हा प्रश्न या निमित्ताने पडल्याशिवाय रहात नाही.

सांगली जिल्ह्यातील पलूस येथे राहणा-या सरूताई धडे या अशाच प्रतिभावंत लोककवी आहेत. त्यांनी उभी हयात कॉंग्रेसचा प्रचार करण्यात, पतंगराव कदम आणि त्यांच्या कुटूबियांचे कौतुक करण्यात घालवली. त्यांच्यावर गीतं लिहीली आणि गायली. या कुटूंबाने त्यांना पस्तीस वर्षापुर्वी घर बांधून देतो असा शब्द दिला होता. पस्तीस-चाळीस वर्षापासून त्या पतंगराव कदमांचा व कॉंग्रेसचा प्रचार करतात. या कुटूंबाने सरूताईला दिलेला शब्द आजतागायत पाळलेला नाही. खरेतर पतंगराव कदमांनी हजारो लोकांच्या चुली पेटवल्या. प्रचंड दानत व मोठ्या मनाचा माणूस असलेल्या पतंगराव कदमांच्याकडून सरूताईचे घर कसे राहून गेले ? हा प्रश्न पडतो.मधल्या काळात टप्प्या-टप्प्याने त्यांना विश्वजीत यांनी दोन-तीन लाख रूपये दिलेत. पण घर बांधून देतो असा दिलेला शब्द पुर्ण केला नाही. विशेष म्हणजे या सरूतायची हयात या कुटूंबासाठीच खर्च झाली. कदम कुटूंबातल्या चिल्या-पिल्यांच्यावरही सरूताईने गीतं लिहीली आणि गायली. अत्यंत प्रतिभावंत असलेल्या सरूताईने हिच प्रतिभा छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसिह नाना पाटील यांच्यावर गीतं रचण्यासाठी आणि गायणासाठी वापरली असती तर महाराष्ट्र त्यांना डोक्यावर घेवून नाचला असता. विशेष म्हणजे कदम कुटूंबातल्या अनेकांनी सरूताईला घर बांधून द्या म्हणून पत्र व्यवहार केला आहे. आजवर पत्र व्यवहार खुप झाले पण आजतागायत घर मिळालेले नाही.

विश्वजीत कदम जिल्हा दौ-यावर आले की सरूताई त्यांच्यामागे पळत असते. घर बांधून द्यावे म्हणून हेलपाटे मारत असते. विश्वजीत कदमांच्याकडे चकरा मारून मारून बिचारीचे पायताण झिजले असेल पण त्यांना घर मिळालेले नाही याचे दु:ख होते.

गतवेळी सांगली जिल्ह्यात पुर आला होता तेव्हा विश्वजीत कदम पुरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून गेले होते. त्या काळात त्यांनी अतिशय चांगले काम केले, त्या कामाचे आम्ही कौतुकही केले होते. पण सरूताई धडे यांच्या घराबाबत जो प्रकार सुरू आहे तो वेदनादायी आहे. खरेतर सरूताईला घर बांधून द्यायला विश्वजीत कदम यांच्यासाठी अवघड काही नाही. त्यांनी मनावर घेतले की एका दिवसात तो प्रश्न सुटेल. त्यांच्या कुटूंबातील सर्वांनीच तिला तसा शब्द दिलाय. पण तो वास्तवात कधी येणार ?

सरूतायला घर बांधून द्यायला विश्वजीत कायद्याने बांधील नसतील पण नैतिकतेचा विचार केल्यास त्यांनी त्या माऊलीचे घर बांधून द्यायला हवे. नाना पटोले यांच्यासाठी कडूतायने काहीच केले नव्हते पण सरूतायने उभी हयात कदम कुटूंबासाठी खर्च केलेली आहे. त्यांचेच कौड-कौतुक गायले आहे. तिने या कुटूंबातल्या पोरा-ठोरांच्यावर रचलेली आणि गायलेली गीत ऐकली की आश्चर्य वाटते. या माऊलीने तिची अख्खी प्रतिभा केवळ कदम कुटूंबासाठीच वाहिली आहे. तिच्या अनमोल प्रतिभेची फरफट पाहून वाईट वाटते. तिने जितके काव्य कदम कुटूंबाच्यावर रचले आणि गायले तेवढे स्वतंत्र लिहीले असते आणि गायले असते तर तिला लाखो रूपये मिळाले असते.

नाना पटोलेंनी जसे कडूतायला घर दिले तसेच सरूताईलाही नक्कीच दिले असते. कारण सरूताई धडे नावाची लोक कलाकार तेवढी मोठी आहे. पण इतकी प्रतिभावंत कलाकार ज्यांना फुकटात मिळाली आहे त्यांना तिचे मोल आहे असे वाटत नाही. कदाचित नाना पटोले यांच्या इतकी संवेदनशिलता आणि दिलेल्या शब्दाची बांधिलकी विश्वजीत कदम यांच्याकडे नसावी. त्यामुळेच सरूताई धडे यांची फरफट चालू आहे. आयुष्याची संध्याकाळ सुरू झालेली सरूताई धडे विश्वजीत कदम जिकडे येतील तिकडे धावत असते. त्यांच्यामागे घरासाठी पळत असते.

सरूताईला कधी भेट मिळते कधी मिळतही नाही. पण ती हेलपाटे मात्र मारत असते. "मला हक्काच घर हवय आणि माझ्या सायबाने मला शब्द दिला होता. तो शब्द माझे बाळासाहेब खरा करणार याची मला खात्री आहे. असं तीच म्हणण असत. ही अपेक्षा घेवून सरूताई विश्वजीत कदमांच्या मागे मागे पळत असते. पण दरवेळी तिच्या पदरात पुढल्या तारखेशिवाय काही पडत नाही.

काही दिवसापुर्वी मुंबईत सरूताईला विश्वजीत कदमांनी पन्नास हजार दिल्याचे फोन करून सरूताईने मला सांगितले होते. खरेतर सरूताईची ही फरफट पाहताना, तिला मनापासून म्हणाव वाटत की, ताई राहू दे आता घर. नको मागू त्यांच्याकडे, तुला घर देण्याइतकी श्रीमंती आणि दानत त्यांच्याकडे नसेल तर का त्यांना अडचणीत आणतेस ? का त्यांना कोड्यात टाकतेस ? माणसातल्या चांगुलपणावर विश्वास ठेव, एखादा नाना पटोले तुलाही भेटेल आणि घर बांधून देईल.

दत्तकुमार खंडागळे, संपादक, वज्रधारी

Updated : 2021-10-28T12:36:50+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top