Home > Max Woman Blog > आदिवासी बांधव काय खातात?..

आदिवासी बांधव काय खातात?..

महाराष्ट्राच्या संपूर्ण खाद्यजीवनात सगळाच काही लखलखाट घमघमाट नाही. दारिद्र्याने पिचलेल्या अनेक कोपऱ्यांतून जेमतेम अन्न शिजते. मग जातीय सामाजिक उतरंडी खालीच राहिलेल्यांची काय कथा… यातूनही पूर्ण बाहेर राहिलेला एक समाज म्हणजे आदिवासी समाज. महाराष्ट्राच्या आदिवासींत अन्नाची परंपरा काय आहे- नसतेच कधी कल्पना केलेली. ते सणाला काय करतात, काय खातात हे प्रश्न पडले नाहीत तर बरे..

आदिवासी बांधव काय खातात?..
X

महाराष्ट्राच्या संपूर्ण खाद्यजीवनात सगळाच काही लखलखाट नाही, घमघमाट नाही. दारिद्र्याने पिचलेल्या अनेक कोपऱ्यांतून जेमतेम अन्न शिजते. सणावाराचे कौतुक अन्नाद्वारे व्यक्त होण्यासाठी जी काही आर्थिक वत्ता लागते ती अनेक ठिकाणी नाही. आर्थिक वकुबानुसार सणाची जेवण होतात. काही वर्षांपूर्वी पं. महादेव शास्त्री जोशींचं आत्मकथन वाचलं होतं. त्यात गरीबीने गांजलेल्या कोकणी परिवारांत- उच्च जातीचे असूनही दिवाळीत पोहेदिवाळी असे. पोह्याचेच पाचसहा प्रकार करून त्यातच दिवाळी साजरी होई. फारसा खर्च नव्हता. विविध तळणीचे पदार्थ, गोडाचे पदार्थ करणे परवडण्यासारखेच नव्हते. हा वर्ग तर तसा ज्ञानसंपन्न. तरीही पैशाची गाठ पडेच असे नाही.

मग जातीय सामाजिक उतरंडी खालीच राहिलेल्यांची काय कथा… यातूनही पूर्ण बाहेर राहिलेला एक समाज म्हणजे आदिवासी समाज. महाराष्ट्राच्या आदिवासींत अन्नाची परंपरा काय आहे- नसतेच कधी कल्पना केलेली. ते सणाला काय करतात, काय खातात हे प्रश्न पडले नाहीत तर बरे अशी अवस्था.

अलिकडेच एका पोषक आहारतज्ञ असलेल्या तरुण मुलीने सांगितले की कुठल्याशा कंपनीने केलेली पोषक आहाराची पाकिटे आदिवासींच्यात वाटली तर त्यांनी ती न खाता फेकूनच दिली. काय करायचं विचारत होती. तिला विचारलं, चव कशी होती त्याची. तर एक पाकीट गोड चवीचं आणि एक खारट चवीचं. गोड जरा जास्तच गोड आणि खारट जरा जास्तच खारट. गोडात गव्हाचा रवा, दाळ आणि साखर होती. आणि खारटात गव्हाचा रवा, मिश्र डाळी आणि मीठ होतं. आमचे वारली गोड खायचंही जाणत नाहीत आणि जेमतेम मिठाची सवय असल्यामुळे खारट म्हणजे थूथू. शिवाय गहू आणि डाळी हे अगदीच अनोळखी… अगदी थोड्या वारली कुटुंबात गव्हाचा नि डाळीचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्राची म्हणवली जाणारी पक्वान्ने त्यांच्या जगण्यातून वजाच आहेत. ज्यांना त्यांच्या पूर्वापार खाद्यसवयींची माहिती नाही त्यांनी त्यांच्या पोषक आहारासाठी काही ठरवणे हे मूर्खपणाचेच ठरेल. पण शासकीय पोषक आहाराच्या चौकटीत असेच चालते.

मी फार नाही, एकच वर्षं वारल्यांच्यात प्रत्यक्ष राहिले होते. तेलाचा वापर फारसा नसलेलंच अन्न असे त्यांचं. स्निग्धांश, प्रथिने, चौरस, समतोल आहार वगैरे सगळं त्यांना अनोळखीच होतं. आज थोडी परिस्थिती बदलली असली तरीही जेवणात धान म्हणजे भात हे मुख्य. कालवण आंबट करायला चिंचा, नाही तर कैऱ्या, कुसुंबाची आंबटढाण फळं, काकडं- म्हणजे एक आवळासदृश फळ घालतात. मिळालं तर मीठ, मिळालं तर तिखट, दुधी, भोपळा, काकडी, शेवगा, शिराळी अशा काही नेमक्याच पिकवलेल्या भाज्या, स्वस्तातले सुके मासे वगैरे. सारं पाण्यात उकळत ठेवायचं. ते पाणी घालून भात खायचा ही घरोघरची तऱ्हा.

एकदा तिथं असताना आमच्या वारली मित्रांना बटाटेवडे करून देऊ असा बूट निघाला. बटाटे होते, तिखटमीठ होतं, बेसन होतं. पण ते तळायला तेल नव्हतं. आणि पुरेसं तेल आणण्याइतके पैसेही नव्हते. पण आमच्या वारली मित्रांनी चुटकी वाजवत सांगितलं- 'तलायला तेल नको हां. ओडाक तेल खायचा नाय मा.' 'अरे पण बटाटेवडे तळले नाहीत तर बटाटेवडे कसले.'

तर म्हणे, 'पाण्यात तला.' आणि खरंच त्यांनी मोठ्या भांड्यात पाणी उकळायला ठेवलं. आणि घट्ट बेसनाने लिंपलेले बटाटेवडे खळखळून उकळत्या पाण्यात टाकून 'तळून' काढलेले. आणि ते शिजबटाटेवडे सगळ्यांनी खाल्लेही आनंदात. आजही वारल्यांच्यात भाज्या करताना त्या थेंबभर तेल दाखवून शिजवलेल्या असतात. ताटाला तेल लागणार नाही. आणि चवदार वगैरे संकल्पना असतात पण त्या आपल्या दृष्टीने वेगळ्या ग्रहावरच्याच असतात. तेलाशिवाय जेवण हे वैशिष्ट्यच आहे.

कॉ. गोदाराणी परुळेकरांनी उभ्या केलेल्या वारल्यांच्या आंदोलनाचे वर्णन 'जेव्हा माणूस जागा होतो' या पुस्तकात त्यांनी केले आहे. एका ठिकाणी त्यांनी अनुभव लिहिला आहे. ते थकून भागून भुकेलेले एका वारली घरात पोहोचले तेव्हा नुसता भात समोर आला. त्यात कुस्करायला कुठून तरी आणलेली भजी होती. त्याच्याशीच तो भात खाल्ला. कोरडा भात तर वारली सहजच खातात. त्यात त्यांना काहीही वावगं वाटत नाही. ही झाली फार जुनी गोष्ट. पण अगदी आठ वर्षांपूर्वी डांगमधल्या वान्सडामध्ये गेले होते. तिथल्या देवराईत फिरून आलो आणि तिथल्या एका वारली घराच्या पडवीत पाणी प्यायला थांबलो. मला वारली भाषा बोलायला येते म्हटल्यावर त्या सर्वांना खूप आनंद झाला. मग धान जिवाडायचा आग्रह सुरू झाला. आणि थाळीत नुसता 'जिराकुच' मीठ घातलेला धानाचा डोंगर खूप प्रेमाने वाढून आला होता. ते आठनऊ जणांचे कुटुंब दुपारी तो भातच जेवणार होते… नुकताच सडून आणलेला तो भात चवदार नक्कीच होता. पण… ते तेवढंच जेवण. ही गोष्ट अजूनही छळतेच.

या समाजात तर कोंबडीही क्वचित, बकरा तर दुरापास्तच. गुरं पाळून दूध काढायचं त्यांच्या परंपरेत न बसणारं. गायीचं दूध तिच्या 'बाला'साठी असतं. म्हणून दूधदहीताक वगैरे प्रश्नच नसायचा. आत्ता आत्ता आस्वलीतून शिकून पुढे गेलेला आमच्या मित्राचा मुलगा, तलासरीत वाढलेली आणि आता डॉक्टर झालेली त्याची बायको सांगत होते, की आता दूध घालून चहा घेतात लोक. पूर्वी तेवढंही नव्हतं. एकंदर प्रथिनांची वानवा आहेच. ती गरज भागवण्यासाठी परवडू शकेल, रुचू आणि पचू शकेल असा एकच प्रकार. सुकी मासळी. सुक्या मासळीत सुखेल बोंबील आणि खारं हे सर्रास घेतलं जातं. आणि ते भरपूर खायला मिळालं की आनंदी आनंद.

तिरकमठे हा वारली अस्तित्वाचा अविभाज्य भाग होता. ब्रिटिशांनी त्यांचे जगण्याचे हत्यार काढून घेतले, आणि काँग्रेस सरकारने त्यांना तसेच बिनहत्याराचे राहू दिले. शिकार करून आपली प्रथिनं मिळवणारा वारली तेव्हापासून तसा लुळाच पडला. त्याच्या आहारातली प्रथिनं अगदीच रोडावली. त्याचं जंगल त्याचं राहिलं नाही, कितीकाळपर्यंत जमिनींवरही मालकी नव्हती. तो काळ फार हालात काढला वारलींनी. आता तथाकथित मुख्य स्रोतात येताना वारली लोकसमूह तसा खिळखिळाच झाला आहे. तरीही जिवटपणे जगला आहे. शिकारीसाठी त्याच्याकडे कुठून येणार रायफली… डुक्कर, ससे मारणं दुरापास्तच झालंय. प्रथिनं मिळवण्यासाठी गलोल आणि मासे पकडायची साधने एवढंच.

रानातले कुठलेही पक्षी गलोलीने मारून जाळात भुजून, तिथंच साफ करून खायचे हे वारली पोरांचे सहज कौशल्य. घरात थोड्या कोंबड्या पाळतात खाण्यासाठी. ती कोंबडीही हळदमीठतिखट लावून बारीक तुकडे करून चुलीतल्या निखाऱ्यांत भाजायची. आणि तीन-चार तुकड्यात समाधान मानतो प्रत्येक खाणारा. कधी कोंबडीचा रस्सा केलाच तर त्यात कसलंही वाटण नसतं. लसूण, हळद-तिखट-मीठ, लाल भोपळ्याच्या फोडी… संपलं. अंडी फार आवडीने खाल्ली जातात वारल्यांमध्ये. मीठही न घालता नुसत्या गरम तव्यावर घातलेला अंड्याचा पोळा किंवा उकडलेली 'कवटां'.

जरा चैनीचं पण साधं जेवण म्हणजे तांदळाच्या कालवलेल्या पिठाची ओतभाकरी करून तिच्याशी भाजके बोंबील, किंवा भाजलेलं खारं. आजोळ्याच्या, पानांची किंवा बियांची सुकट घातलेली किंवा नुसती मिरची घातलेली, किंवा चिंचा आणि तिखटाची चटणी खायची. आजोळा म्हणून तुळशीसारखी रानवनस्पती माहितीये का? तिच्या पानांचीही चटणी करतात. पण ती केवळ पावसाळ्यातच उगवते. तेव्हा पानांची चटणी. नंतर रान सुकायला लागलं की त्याच्या बिया गोळा करून ठेवतात वारली लोक. मग त्यात हिरवी मिरची खडेमीठ घालून बराच वेळ ठेचून कुटूनकुटून त्याची चटणी तयार करतात. त्या बियांचा मस्त सुवास येतो. वारली म्हणणार, "कसाक् सुरभाय नांग…" (कसा मस्त सुगंध येतोय पहा) ती चटणी तांदळाच्या ओतभाकरीसोबत जेवायची. एखादा सुखेल भाजेल बोंबिल सोबतीला असला तर असला.

तांदळाच्या ओतभाकरीशी वा वाफवल्या भाकरीशी खायचा एक उडदाच्या पिठाचा पिठल्यासारखा पदार्थ केला जातो. खमंग भाजलेले सालासकटचे उडीद भरडून मग सालपटं उडवून ते बारीक दळायचे. त्यात पाणी, भरपूर लसूण, मिरची मीठ घालून कालवायचं. संपली कृती. वरण नि आमट्या हे सगळं आताशा आहारात आलं असेल- पण ते मर्यादेतच. पण बिन तेलाचं, बिनफोडणीचं पिठलंही अभावातूनच आलेलं.

वारल्यांची नदीचे मासे पकडण्याची साधनं मोठी देखणी असतात. तशी ती साधनं भारतभरच्या आदिवासींमध्ये बरीचशी सारखीच आहेत. नदीला पाणी वाहतं असण्याच्या काळात म्हणजे पावसाळ्याचे चार महिने, नंतरचे दीडदोन महिने त्यांच्या कडच्या छोट्यामोठ्या 'मलया' (शिंदीच्या सराट्यांपासून बनवलेले शंक्वाकृती साधन) नदीच्या प्रवाहात शक्य तिथे बांधन घालून मधल्या फटीत लावल्या जातात. त्यात नदीचे मासे मिळतात… कधी त्यातच दिवड साप शिरून सगळे मासे मटकावूनही जातात. नदीचे हे मासे करायची मुख्य पद्धत काय. तर पातेऱ्याच्या गरम राखेत भाजून खाणे. किंवा अगदी बारीक मासे असल्यावर ते आंबटात टाकणे. नदीची मोठी वांब मिळाली तर मात्र कुठूनतरी मिरी-दालचिनीसारखा गरम मसाला आंबटाच टाकायचा प्रयत्न केला जातो.

अगदी बारीक आकाराचा- जवळ्यापेक्षाही लहान असलेला कोलीमही मिळतो. ती यांची खास आवडीची वस्तू. तो कोलीम फडक्यात बांधून चुलीच्या वरच्या बाजूला टांगून त्याचा रंग लालेलाल होईपर्यंत धुरपवला जातो. तो भात-भाकरीशी खायचा म्हणजेच मेजवानी. किंवा कधी बांबूच्या कोंभासोबत मिठात घालून ठेवतात. त्यांच्या उग्र वासाने आपण तर गारद होतो. पण पुरवठ्याची प्रथिनं म्हणून त्यांची उपयुक्तता आहेच.

पावसाळ्यात रानात मिळणाऱ्या लहान बोराएवढ्या शंखांतला बाऊ मडक्यांत गोळा करून आणतात बाया. तोही प्रथिनांचं दुर्मिळ स्रोत. बारके मासे, बारके खेकडे, खुब्यातला बाऊ सगळं कसं शिजवायचं… तर ते सगळं- मिळेल ते पाण्यात तिखट, मीठ, चैनीसाठी लसूण, चिंचा ठेचून घालून उकळवायचं बस्स. बांबूचे कोंब त्यातच ढकलायचे. बोरं, करवंद, काहीही त्यात ढकलायचं… चैन. बांबूच्या कोंभामुळे त्या सर्वाला एक उग्रस वास यायचा. माझी ते खाण्याची हिंमत झाली नाही कधी. भाताशी खाण्याच्या आंबटात आंबाडीची पाने उकळायला टाकणे ही आणखी एक पद्धत. दुसरं काहीही नाही मिळालं तरीही आंबाडीची पानं उकळलेलं आंबटतिखट पाणी भाताला आधार होत असे.

या आंबाडीची एक कहाणी सांगितली जात असे वारल्यांच्यात. संजाण जवळ रहाणाऱ्या वारल्यांची राणी होती आंबाडी. तिनेच म्हणे पारशांना पहिला आसरा दिला. आज जी गोष्ट राजाच्या बाबतीत सांगितली जाते तीच वारली आंबाडी राणीबाबत सांगतात. तिने किनाऱ्याला लागलेल्या पारशांना विचारलं तुम्ही आमच्या जमिनीत घुसून मग आम्हाला त्रास द्याल. तेव्हा ते म्हणाले आम्ही दुधात साखरेसारखे राहू. या कहाणीला ऐतिहासिक आधार काही मिळालेला नाही. पण ही आंबाडी राणी फार हुषार होती असं सांगतात. वारल्यांच्या धानावर कीड पडू लागली. डांगी, कूडा या जातीच्या भाताबरोबर वरई, नागलीही पिकवत वारली. कीड येऊ लागली तेव्हा आंबाडी राणीने त्यांना काही बिया दिल्या. आणि सांगितलं या बिया शेताच्या बांधावर पेरा. यातनं रोपं येतील ती पिकाचं किडीपासून रक्षण करतील. कीड आली की ती पहिली झेलण्याचं काम करतील ही झाडं. मग आतला भात, वरई, नागली सुरक्षित. त्या झाडाची पानं, फळं, आणि जून देठं कुसवून त्यातून निघालेली वाखं सगळंच उपयोगी असेल. तेव्हापासून त्या झाडाचं नाव पडलं आंबाडीचं झाड. ही गोष्ट जुने वारली सांगत. आता तसं बरंचसं विसरत चाललंय. पण आंबाडीची पानं, फळं अजूनही जेवणात वापरली जातात. ती हाताशी असेल तर कुठल्याही आंबटात वापरली जाते.

पावसाळ्यात, पावसाळा सरतसरता डोंगराला, नदीच्या कुशीला काळे खेकडे भरपूर निघतात. महाराष्ट्रात सगळीकडेच खेकडे आवडीने केले नि खाल्ले जातात. पण सगळीकडेच काही ना काही वाटण गरम मसाला घातला जातो. आमचे वारली मित्रही एकदा रात्री गेले आणि पहाटेवर पोतंभर खेकडे- वारली त्याला बेलकडे म्हणतात- घेऊन आले. माझी भूमिका बघ्याची होती. कारण मनात प्रश्न होतेच… हे आता याचं काय नि कसं करणार. खाडीचे खारे खेकडे नुसते उकळून खातात हे माहीत होतं. पण हे गोडे खेकडे… पण पोरांनी भराभर खेकडे जरा पाणी ओतूनओतून धुतले. आणि आमच्याकडच्या भल्या मोठ्या पातेल्यात पाणी नि मीठ घालून ते उकळायला ठेवलं. उकळी फुटल्यावर खेकडे त्यात घातले. दोन कांड्या लसूण न सोलताच ठेचला, तो त्यात घातला. थोडंसं तिखट शिल्लक होतं. ते घातलं, हळद टाकली नि उकळू दिलं. वरून जरासं तेल ओतलं. बस्स बाकी काहीही नव्हतं. मस्त लागलं की.

दिवाळीचा सण म्हणजे हिंदू परंपरेतल्या दिवाळीच्या एकेक दिवसाचे असे काहीच नसते. पिकवलेलं धान घरात आल्यानंतरचा सगळा पंधरवडा दिवाळीच असते. रात्री तरुण पोरंपोरी नाचायला जमणार, तारप्यावर नाच करत रिंगण धरणार… हे सेलेब्रेशन. अंधारातून नाचायला जाताना हातात करंजाच्या वाळल्या बियांची पेटती निखार-काडी घेऊन रांगेने जाणार… ताडी पिणार…

या दिवाळीतला सर्वांचा लाडका मेन्यू म्हणजे भिजवून, किंचित मीठ घालून मऊ उकडलेल्या चवळ्या, भाजलेले जाडे बोंबील आणि पानात वाफवलेली धानाची भाकरी. या भाकरीत मोठ्या जुनावलेल्या काकड्या किसून घालून पीठ कालवलेलं असतं आणि मग केळीच्या, भेंडीच्या, वा पळसाच्या पानावर वाफून लहानलहान भाकऱ्या काढलेल्या असतात. त्यांना सावेलं किंवा सावुलं म्हणतात. पातोळे किंवा पानगी म्हणून हा पदार्थ नागर समाजात आहेच.

क्वचित कुणी काकडीच्या किसात थोडा गूळ, तांदळाचं पीठ आणि रवा घालून जाडी केकसारखी गोड भाकरी करतात, काकडीचं सांदणच ते. पण त्याला सांदण म्हणत नाहीत. त्यापेक्षाही जास्त लाडका पदार्थ म्हणजे गोड्या ताडीत तांदळाचं जाड पीठ भिजवून केलेली केकसारखीच भाकरी करतात. बास… गोड पदार्थाची मजल या पलिकडे नाही. आम्ही तिथं रहात होतो तेव्हा काही गोड नेलं तरी आवडीनं खायची बोंबच असे.

दिवाळीचा सण म्हणजे भरपूर ताडी प्यायची… भाजलेले बोंबील खायचे. त्याच सुमारास शेतातून नवा लाल तांदूळ आलेला असतो. की तो नवा चवदार भात खाणं किती मनापासून करायचे आमचे वारली. तो खाऊन पोटं फुगायची आणि मग ढमाढम पादण्याची नि पाठोपाठ खदखदून हसण्याची स्पर्धा. दिवाळीचा फराळ आणि फटाके हेच.

सुग्रास अन्न म्हणजे काय, सणाची मेजवानी म्हणजे काय हे माहीत असलेल्यांना त्या धमाल आनंदाने नवल वाटावं… मला तर अजूनही आठवलं तर गळ्यापाशी दुखून येतं. दिवाळीत निखाऱ्यांची आरास करावी असं वाटतंय हे लिहून… पण यातून एक नक्की कळलं की आपण खाद्य-परंपरांचा उत्सव करतो तो मुळात असतो आपापल्या समाजाच्या आर्थिक क्षमतांच्या अखंड परंपरेचा. मग बाकी बारीकसारीक तपशील बदलत जातात ते इतर उपलब्धता काय असतील त्यानुसार.

पण ती आर्थिक क्षमताच जिथे चेचली गेली तिथे अन्नाचा उत्सव हा केवळ भूक भागल्याचा उत्सव होतो. चवीचा नाही. पाटपाण्याच्या साजशृंगाराचाही नाही.

मुग्धा कर्णिक

(सदर लेख या पुर्वी अंगत पंगत या दिवाळी अंकात प्रकाशीत करण्यात आला आहे.)

Updated : 5 Nov 2020 8:02 AM GMT
Next Story
Share it
Top