Home > Max Woman Blog > farmers protest : पदर खोचलेल्या महिला

farmers protest : पदर खोचलेल्या महिला

शेतकऱ्याची ताकद काय? हे आपण दिल्लीतील शेतकरी मोर्चावरुन पहातच आहोत. स्वातंत्र्य लढ्याप्रमाणेच या आंदोलनातही महिलांनी पुढाकार घेतल्याचं दिसतं. नसानसात संघर्ष भिनलेल्या महाराष्ट्रातल्याही महिला या मोर्चात पदर खोचून सहभागी झाल्या आहेत...

farmers protest : पदर खोचलेल्या महिला
X

शेतकऱ्यांना बळी'राजा' का म्हणतात? आणि शेतकऱ्याची ताकद काय? हे आपण दिल्लीतील शेतकरी मोर्चावरुन पहातच आहोत. या आंदोलनाला स्वातंत्र्य लढ्याची उपमा दिली जातेय. स्वातंत्र्य लढ्याप्रमाणेच या आंदोलनातही महिलांनी पुढाकार घेतल्याचं दिसतं. या आंदोलनात सहभागी महिलांचे फोटो तुम्ही पाहिलेच असतील.. नसानसात संघर्ष भिनलेल्या महाराष्ट्रातल्याही महिला या मोर्चात पदर खोचून सहभागी झाल्या आहेत.

मेधा पाटकर

मेधा पाटकर यांचा 1 डिसेंबर ला वाढदिवस असतो. पण वाढदिवसाचं कौतुक न करता 1 तारखेलाच चलो दिल्ली म्हणत त्यांनी दिल्ली गाठली. 1 तारखेलाच मेधा पाटकर यांनी हिंदीतून एक व्हिडीओ प्रसिध्द केला. देशातील जनतेला 'असाल तिथून' शेतकऱ्यांना पाठिंवा देण्याचं आवाहन त्यांनी केलं.


त्या एवढ्यावरच थांबल्या नाहीत ; तर त्यांनी एक फेसबूक पोस्ट केली आणि "आपण दिलेल्या जन्मदिवस शुभेच्छांसाठी धन्यवाद....तुमच्या प्रेमावरच जगतेय ,लढतेय.. पण रोजच असतो वाढदिवस.. समस्या, अत्याचार्, भ्रष्टाचार, विनाश, विषमता, अन्याय व शेतकऱ्यांच्या आत्महत्याही वाढताना.. वाढतो आहे प्रतिरोध, संघर्षही! इथे दिल्लीतील जनसैलाब देतो आहे आश्वासन... त्याचेच celebration...!!" असं म्हणत आपली भूमिका जाहिर केली.

प्रतिभा शिंदे

मेधा पाटकर यांच्यासोबत आणखी एक रणरागिणी दिल्लीत शेतकऱ्यांसाठी लढा देतेय त्या म्हणजे प्रतिभा शिंदे. प्रतिभा शिंदे या 25 नोव्हेंबरला नंदूरबारहून दिल्लीला निघाल्या. सध्या त्या दिल्लीत केंद्र सरकारच्या कृषीधोरणाविरोधात पदर खोचून उभ्या आहेत.

लाखोंच्या संख्येने या आंदोलनाला लोक दाखल झाले आहेत. सिंघु बॉर्डर परिसरात जवळपास पावणेदोन लाख शेतकरी 11 हजार ट्रॅक्टर व इतर वाहनं घेऊन दाखल झाले आहेत. अनेक लोक तर आपल्या पदाचा राजिनामा देऊन या आंदोलनात दाखल झाले आहेत. दिल्ली-हरयाणा दरम्यान टिकरी बॉर्डरवरचे शेतकरीही सध्या तिथंच जमलेले आहेत.


या आंदोलनाबद्दल सांगताना प्रतिभा शिंदे म्हणतात की, "हे सरकार शेतकऱ्यांना धमकी देतंय. देशाचे गृहमंत्री अमित शहा आम्हाला पत्र पाठवून सांगतात की तुम्ही बुराडी परिसरात जा ; तरच आम्ही तुमच्याशी बोलू, असं म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला किती लोक तुमच्यासोबत येतील? असं विचारतात आणि त्यातही जाणूनबुजून मुद्दाम त्यात पंजाबच्या संघटनांना बोलावून हे आंदोलन पंजाब राज्याचं आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. शेतकरी संघटना मात्र हे सर्व हाणून पाडत आहेत."

"काल जी चर्चा झाली, त्यात त्यांनी सरकार या कृषी कायद्याबद्दल कुठलीही चर्चा करतंय हे दाखवलं नाही. कायद्याचा विचार करायचा नाही. शेतकऱ्यांचं आंदोलन गुंडाळून टाकू. सरकार या मानसिकतेत अजूनही आहे. कदाचित त्यांना ग्राउंड लेवलवरचा अंदाज अजून आलेला नाही." असं शिंदे यांनी म्हटलं.

या आंदोलकांना खलिस्तानवादी, अतिरेकी म्हणूनही संबोधण्यात आलं . याबाबत प्रतिभा शिंदे यांनी माध्यमांवर टीका केली. त्यांनी "या आंदोलनाला माध्यमांना हाताशी धरून बदनाम करण्याचा प्रयत्न केला जाईल. शेतकऱ्यांना खलिस्तानवादी, मुसलमान अतिरेकी म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न केला, पण इथं त्यांची डाळ शिजली नाही. आता या आंदोलनाला कॉंग्रेसने सपोर्ट केलेलं आंदोलन म्हटलं जाईल. त्यानंतर दिल्लीकरांना असुविधा होतेय, असा प्रपोगंडा चालवला जाइल. जेणेकरुन पोलिसांना पुढे करून हे आंदोलन दाबता येईल आणि हे सर्व लोकशाहीचा चौथा स्थंभ असलेल्या माध्यमांच्या साक्षीने सुरूआहे." असं म्हणत आपली नाराजी व्यक्त केली.

उल्का महाजन

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यादेखील मागे नाहीत. त्यांनी दिल्लीला न जाता महाराष्ट्रातूनच या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. महाजन यांनी आज (2 डिसेंबर) मुंबईत पत्रकार परिषद घेतली व त्यात त्यांनी सरकारने 'माज सोडावा' असं म्हणत खडे बोल सुनावले आहेत.

"देशातील केंद्र सरकार ज्या पध्दतीचे कायदे करतंय, यातून ते सामान्य माणसाच्या नाहीतर उद्योजक आणि भांडवलदारांच्या बाजूने असल्याचा स्पष्ट संदेश देतात. त्यामुळे आम्ही पंतप्रधानांना सांगू इच्छितो की तुम्ही स्वत:ला जनतेचे सेवक म्हणवता तर सेवक म्हणून समोर या. जनतेचे मालक असल्यासारखं शेतकऱ्यांवर अश्रुधूर, पाण्याचा मारा करुन त्यांची मुस्कटबादी करणं थांबलं पाहिजे."

"देशाचा अन्नदाता आज संकटात आहे. हे आम्ही खपवून घेणार नाही. देशातील जी काही संवेदनशील आणि संविधानप्रेमी जनता आहे, त्या जनतेने त्या सर्वांनी शेतकऱ्यांबरोबर उभं राहिलं जाहिजे. आता सरकारने आपल्या माज सोडावा आणि अन्नदात्यासमोर न्यायाच्या भुमिकेतून समोर यावं." असं उल्का महाजन यांनी म्हटलं आहे.


या आंदोलनाला आणखी तीव्र करण्यासाठी उद्या (ता. ३) महाराष्ट्रात उग्र आंदोलन करण्याचा निर्णय अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने घेतला आहे.

या झाल्या महाराष्ट्रातील स्त्रीया. हे देशव्यापी आंदोलन असल्याने आपण इतर राज्यातील महिलांना दुर्लक्षित करु शकत नाही. यात सुरजीत कौर या 85 वर्षीय आजींचं नाव घ्यावंच लागेल.

सुरजीत कौर

सुरजीत कौर दादी या आंदोलनासाठी पंजाबहून दिल्लीच्या दिशेने निघाल्या आहेत. BBC ला दिलेल्या मुलाखतीत या आजी सांगतात "आम्ही जाणार.. जर त्यांनी अडवलं तर थोडावेळ थांबू आणि संधी मिळताच पुढे जाऊ. पण आम्ही एक पाऊलही मागे येणार नाही." एवढ्यावरच न थांबता या आजी पुढे म्हणतात "जर या आंदोलनात आमचा मृत्यू झाला तर आमच्या मुली आणि सुना या आंदोलनाला पुढे नेतील. पण मागे हटणार नाही"


त्यामुळे हातात काठी घेऊन पुढे चालणाऱ्या आजींना बघून "इसको लकड़ी समझनेकी भूल ना कर ऐ सियासत, ये बापू की लाठी है जिसने अंग्रेज भगाये थे"असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

महिंदर कौर

महिंदर कौर या 87 वर्षीय आजी पंजाबच्या भटिंडाच्या जंडियां गावातील रहिवासी आहेत. या आजीदेखील दिल्लीत दाखल झाल्या आहेत. पण या आजींची चर्चा होतेय वाचाळ कंगनाला दिलेल्या उत्तरामुळे. कंगनाने शेतकरी आंदोलनातील महिलांना पैसे घेऊन शेतकरी आंदोलनात सहभागी झाल्याचं म्हटलं होतं.


कंगनाला उत्तर देताना या आजी म्हणाल्या की, "माझ्याकडं 13 एकर जमीन आहे. कंगनाला 100 रूपयांसाठी कुठेही जाण्याची गरज नाही आणि हो कोरोनामुळे कंगणाला काही काम नसेल तर ती माझ्या शेतात इतर मजुरांप्रमाणे काम करू शकते."

"मी शेतात काम करते. जेव्हा शेतक-यांच्या न्यायासाठी लढा द्यायची वेळ आली, त्यावेळी मी त्यांच्या पाठीशी उभी राहीले. माझ्या शेतकरी भावांसोबत या ठिकाणी आली असून शेती करणं फार मोठी गोष्ट आहे. हे काही छोटं काम नाही. शेतातील प्रत्येक काम करण्याचा मी आनंद घेतला आहे. अशावेळी आपल्याला ज्या गोष्टीतील काही कळत नाही, त्याबद्दल बोलायचं धाडस केल्यास त्याची किंमत चुकवावी लागते." आजींच्या या प्रतिक्रियेनंतर तरी कंगना नको तिथं तोंड उघडेल असं वाटत नाही..

या आहेत शेतकरी आंदोलनातील सरकार विरोधात पदर खोचून उभ्या असलेल्या महिला.

काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या?

1) शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट आधारभावाचे रास्त संरक्षण द्यावं

2) केंद्र सरकारने केलेले तीन शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत

3) शेतकरीविरोधी वीजबिल विधेयक पुढे रेटण्याचे कारस्थान बंद करावे

या प्रमुख तीन मागण्यांसाठी दिल्लीत हे आंदोलन करण्यात येत आहे.

त्यामुळे हे आंदोलन आता सरकार बळाचा वापर करुन दडपणार की अधिक आक्रमक रूप घेऊन सरकारला तडाखा देणार हे थोड्या दिवसांतच स्पष्ट होणार असलं तरी आंदोलनापुढे मोदी सरकार झुकेल का? हा प्रश्न आहे..

Updated : 8 Dec 2020 1:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top