Home > Max Woman Blog > ..आणि मंत्री झालेला भाचा मावशीला भेटला

..आणि मंत्री झालेला भाचा मावशीला भेटला

..आणि मंत्री झालेला भाचा मावशीला भेटला
X

अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना इंदापुर येथे काँग्रेसचा मेळावा होता. त्यासाठी मुख्यमंत्री चव्हाण व इतर सगळे दिग्गज तिथे जमणार होते त्या नेत्यांमध्ये त्या वेळी मंत्रिमंडळामध्ये वैद्यकीय व उच्चतंत्र शिक्षण खाते संभाळणारे मंत्री डी पी सावंत हे देखील येणार होते व तशी बातमी सकाळ मधे आठ दिवस अगोदर आली होती.

डी पी सावंत हे माझे सख्खे मावस भाऊ.. लहानपणी जेंव्हा आम्ही सुट्टी मध्ये मुंबईला जायचो तेंव्हा मावशीकडे देखील राहायला जायचो. त्यावेळी दत्तात्रेय (डी पी हा शॉर्ट फॉर्म) त्याचे भाऊ बहीण सगळे भेटायचे नंतर मोठे झाल्यावर मावशीकडे जाणे कमी झाले डी पी ही कॉलेज ला गेले.. गाठी भेटी कमी होत गेल्या.

डी पी व अशोकराव चव्हाण हे लहापणापासूनचे सवंगडी. एकत्र खेळले, एकच शाळा, कॉलेजही एकच नंतर उच्च शिक्षण पूर्ण झाल्यावर दोघांनीही एकत्र नांदेड मध्ये व्यवसाय सुरू केला, अजूनही असेल! मुंबईला देखील दोघांचे राहणे एकाच कॉम्प्लेक्स मधे शेजारी शेजारी, आजही नांदेड मध्ये दोघांचे बंगले शेजारी शेजारी आहेत. कालांतराने अशोकराव वडील शंकरराव चव्हाण यांचा वारसा सांभाळत राजकारणात शिरले.. डीपी ने देखील नांदेड मध्ये आपले बऱ्यापैकी गुडविल तयार केले होते व त्यामुळे राजकारणाचा पिंड नसताना देखील अशोकरावांनी डीपी ला नांदेड मधून आमदारकीचं तिकीट दिलं व दोन वेळा ते आमदार म्हणून निवडून आले. दुसऱ्या पंचवार्षिकमध्ये निवडूनआल्यावर त्यांची वर्णी मंत्रिमंडळात लागली व त्यांच्याकडे वैद्यकीय उच्च शिक्षण व तंत्रज्ञान खात्याची जबाबदारी टाकली गेली.

दरम्यानच्या काळात आमचा संपर्क कमी झाला होता. फारस जाणं येणंही होत नसे त्यांच्या विषयीच्या बातम्या, फोटो वर्तमानपत्र, दूरदर्शनवर ऐकायला मिळायच्या व आपला भाऊ मंत्री झाल्याचा अभिमान वाटायचा. त्यांच्या इंदापूर दौऱ्याची बातमी आईने सकाळ मध्ये वाचली व मला म्हणाली अरे आपला डी पी इंदापूर ला येणार आहे. पुण्यावरून इंदापूरला त्याचा रूट हा मोरगाव मार्गेच म्हणजे आमच्या घरापासून आठ कि मी होता. आई म्हणाली इतक्या जवळून जाणार असेल तर बोलाव त्याला..

गेली कित्येक वर्षे संपर्क नाही, जाण येणं नाही, साधा फोन नाही मग अशा परिस्थितीत त्याला फोन करून ये म्हणणं म्हणजे त्याला वाटायचं की बघा इतकी वर्षे कॉन्टॅक्ट नाही फोन नाही.. आता मंत्री झालोय तर जवळीक वाढवतायेत असा त्याचा समज नको म्हणून त्याला फोन केला नाही. करावा की नाही याचं संभ्रमात होतो व धाडसही होत नव्हते.

शुक्रवारी ते इंदापुरला येणार होते व आदल्या दिवशी दुपारी अचानक फोन आला. "डॉक्टर मी डी पी बोलतोय, उद्या माझा इंदापूर दौरा आहे. मी मावशीला भेटण्यासाठी मुर्टीला येणार आहे. कुठून कस यायचं सांग?" बोलण्यात कुठलाही गर्व नाही व मंत्री असल्याचा अविर्भाव नाही.

दुसऱ्या दिवशी मेळावा आटोपल्यानंतर त्यांनी मला फोन करून सांगितलं की मी इथून निघालोय. मुर्टी गाव मला सापडणार नाही तरी तू मला नेण्यासाठी मोरगाव मध्ये ये! त्याप्रमाणे मी अर्धा तास मोरगाव मधे येऊन थांबलो.. काही वेळातच त्यांच्या गाड्यांचा ताफा मोरगावमध्ये आला त्यांनी सर्व सिक्युरिटी व अधिकाऱ्यांना सांगितले की मी मावशीला भेटायला चाललो आहे. तुम्ही सगळे इथेच थांबा! नंतर ते माझ्या बरोबर मुर्टी ला यायला निघाले!

माझी आई व डी पी ची आई दिसायला सेम.. अगदी जुळ्या बहिणी वाटाव्यात अशा (फोटो बघितल्यावर लक्षात येईल) घरात शिरल्याबरोबर डी पी मावशी कुठाय अस विचारीत आईच्या शेजारी जाऊन बसला व नंतर त्यांच्या जुन्या आठवणी, गप्पा इतक्या रंगत गेल्या की वेळेचं भानही राहील नाही, आता तो आमदार वा मंत्री नव्हता तर फक्त तिचा भाचा होता! नंतर बराच वेळ सर्वांच्या गप्पा झाल्या, खाण पिणं झालं, ख्याली खुशाली झाली पण मग वेळेची जाणीव सर्वाना झाली कारण डी पिंचा प्रत्येक मिनिट महत्वाचा होता. वेळही खूप झाला होता, कुणालाच ही गप्पांची मैफल थांबावी असं वाटत नव्हतं. खाली opd ही तुडुंब भरली होती. पेशंट ताटकळले होते. शेवटी पुन्हा आईला मिठी मारून तिच्या पाया पडून कोकणात गणपतीला सर्वांनी एकत्र भेटायचं अस पक्क ठरवून डी पी नी आम्हा सर्वांचा निरोप घेतला.

आज आपण बघतो की माणूस मोठ्या पदावर गेला की नातेवाईक, मित्र सर्वाना विसरतो किंवा ओळख देत नाही. गावात एखादा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जिंकला तरी आभाळाला हात टेकल्यासारखं करतो. पण डीपी ने तसा विचार केला नाही. मी मोठा माणूस, मंत्री झालोय, मी स्वतः कशाला फोन करू, त्यांनी केला पाहिजे.. असा विचार केला असता तर ही मावशी भाच्याची भेट कधीच झाली नसती.

या भेटीनंतर डी पी व आम्ही दरवर्षी गणपतीत व सप्ताहच्या वेळी कोकणात आमच्या नाटळ (कणकवली) या गावी भेटतो. आमचे दोघांचेही गाव नाटळच आहे. डी पी चं रहाणीमान मंत्री होण्यापूर्वी जसं होतं तसंच मंत्री झाल्यावर व आताही तसंच आहे. कोकणातील त्यांचे घरही इतर सामान्य लोकांसारखेच आहे.

या नंतर काही वर्षातच आमची मावशी म्हणजे डी पी ची आई गेली व काही महिन्यांपूर्वी आमची आई.. कणकवली कुठे, मुंबई कुठे, नांदेड कुठे व बारामती कुठे !!! पण ऋणानुबंधाच्या गाठी या कुठेतरी पडतात हेच खरं !!!

- डॉ संजय सावंत, मुर्टी, बारामती
9822012730

Updated : 29 Nov 2020 11:57 AM GMT
Next Story
Share it
Top