Home > Max Woman Blog > ब्राव्हो वनिता...!

ब्राव्हो वनिता...!

वनिताच्या हातातील पतंगाला दोरा का नाही? पतंगाचा दोरा आणि पुरूषी मानसिकता नक्की काय संबंध आहे. वाचा अजित अभंग यांचा लेख...

ब्राव्हो वनिता...!
X

दिसणं आणि असण्याचे मापदंड हे 'अभिजात' या सर्वघोळ प्रकारात बांधले गेले. पुन्हा ही अभिजातता पुन्हा पुरुषी नजरेतूनच लादली गेली. आपले मेंदू, मन आणि नजरा या जाणीवपूर्वक घडवल्या गेल्या. बाईचं 'वस्तुकरण' या श्रेष्ठत्वाच्या पुरुषी बाजारभावानं विकलं गेलं... या बाजारीकरणाच्या विरोधात बहुजन स्त्रीयांनी बंड पुकारलं.

ज्योतीराव आणि सावित्रींबाईंनी या अभिजात मापदंडाला नाकारलं. तेव्हा त्यांच्या मांडणीपेक्षा, त्यांच्या शुद्धलेखनावरून पुन्हा त्याच अभिजाततेच्या कंडातून एका वर्गानं तेच सर्वघोळ मूल्यमापण लादण्याचा प्रयत्न केला. त्या लादण्याविरुद्ध सुरू झालेला विद्रोहाचा जागर आज टीपेला पोहोचलाय. प्रस्थापितांच्या कानाला दडे बसू लागले. इतके की, आज त्याला प्रत्युत्तर म्हणून संस्कृती आणि धर्मारक्षणाचा केवीलवाणा कर्कष कल्लोळ याच प्रस्थापितांकडून अस्मिता म्हणून राजसत्तेच्या माध्यमातून लादला जातोय. यात पुन्हा भरडली जाणार आहे ती स्त्रीच. पण जिजाऊ, अहिल्यादेवी सावित्री आणि रमाईच्या लेकी याविरोधात पाय रोवून उभ्या आहेत. मग ती विद्वत्ता असो की कला...

हे सगळं अगंतुकपणे सुचण्या आणि मांडण्याचं निमित्त ठरलंय ते वनिता खरात या गुणी अभिनेत्रीचं नग्न फोटोशूट. स्त्रीला नग्न पाहावं तर ती देखील बांधेसुदच असावी? ती त्याच सो कॉल्ड अभिजात मानंदंडाची असावी? स्त्रीचे सौंदर्य तिच्या बांधेसुदपणातच? खळाळून, प्रसन्न हसणाऱ्या वनितानं तिच्या शरीरापुढं फक्त पतंग धरलाय, आणि त्या पतंगाला दोराच नाही. कुणीच त्या पतंगाचा मालक नाही. स्त्री ही उन्मुक्त आहे. कुणाच्या मालकीची नाही. ती आहे ती फक्त तिचीच.

शेतीचा शोध स्त्रीनं लावला आणि मानवाचं पाऊल उत्थानाच्या दिशेनं पहिल्यांदा पडलं. पुरुषानं शेती बळकावली. मातृसत्ता पितृसत्तेनं शरीर बळजबरीनं बळकावली... या पितृसता लादण्यात लाभ होता कुणाचा? कोणत्या वर्गाचा? त्या वर्गानेच आपले मापदंड हळूहळू लादले, त्या मापदंडाला बहुजनातला 'पुरुष' सहज अंकित झाला.

आज फक्त बहुजनातल्याच नव्हे तर जिजाऊ, अहिल्या, सावित्री आणि रमाईची मातृसत्ता मान्य करणाऱ्या प्रत्येक पुरुषाला स्त्रीचं सौंदर्य आपल्या डोळ्यांतला अभिजाततेचा कचरा काढून पाहण्याची नवी नजर वनिताच्या या फोटोशूटच्या निमित्तानं मिळाली. ही नजर कदाचित सौंदर्यशास्त्र नैसर्गिकपणे घडवण्याची शक्यता यापुढे अधिक आहे.

Updated : 5 Jan 2021 6:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top