Home > Max Woman Blog > मी, गर्भाशय !

मी, गर्भाशय !

मी, गर्भाशय !
X

मी, स्त्रीच्या ओटीपोटातला छोटासा अवयव.

साधारण मुठीएव्हढया आकाराचा...

साधारण एखाद्या मध्यम पेरूसारख्या किंवा बटव्यासारख्या आकाराचा..

ह्या गोल बटव्यासारख्या आकारामुळेच बायका मला 'पिशवी' 'पिशवी' असं म्हणतात की काय, काय माहीत?

म्हणजे उदा.पिशवीचा त्रास आहे,पिशवीत गाठ झालीय वगैरे वगैरे.

सुरुवातीला जन्मानंतर काही वर्षे मला काही कामच नसतं, आणि त्यामुळे माझा आकार अगदी पिटुकलाच असतो.

पुढे किशोरवयात माझा आकार थोडासा वाढतो.

आणि मग साधारण 11 ते 16 वर्षांदरम्यान एखाद्या महिन्यात अचानक ,काही संप्रेरकांच्या म्हणजे हार्मोन्सच्या एकत्रित परिणामामुळे माझ्या आत असलेलं अस्तर गळून पडतं त्यालाच पहिली मासिक पाळी आली, असं म्हणतात.

त्यानंतर मग साधारण दर महिन्याला ह्याच हार्मोन्सच्या खेळामुळे एक बीज तयार होतं आणि अर्थातच त्याच फलन न झाल्याने ते विरून जातं.

आणि इकडे त्या बीजाचं शुक्राणूंशी संयोग होऊन फलन झाल्यास, तयार झालेल्या गर्भाला रुजवून घेण्यासाठी तरारून आलेलं माझ्या आतील अस्तर गळून पडतं,आणि त्याबरोबर काही रक्तस्त्राव होतो.

तीच असते मासिक पाळी.

म्हणूनच मासिक पाळीला 'cry of uterus'म्हणतात.

आता,हे सगळं दरमहा व्यवस्थित सुरू असतं तेंव्हा काही प्रॉब्लेम नसतो. पण ह्या हार्मोन्समध्ये काही गडबड झाली तर मात्र माझ्यातून खूपच रक्तस्त्राव होऊ शकतो, एखादी बिचारी मुलगी असे रक्त जाऊन जाऊन पूर्ण पांढरीफटक पडते,हिमोग्लोबीन पार कमी होऊन जातं.अर्थात डॉक्टर मंडळींकडे यावर औषध असतंच. वेळेवर तपासणी आणि उपचार मात्र करायला हवेत.

लग्नानंतर एखाद्या जोडप्याला वंध्यत्वाची ,किंवा वारंवार गर्भपाताची समस्या भेडसावते.त्याचं कारण कधीकधी माझ्यात असलेल्या गाठी,माझ्या आतील अस्तर तयार न होणं, किंवा माझा आकार अगदी लहान असणं.,किंवा पडदा असणं. सोनोग्राफी,हिस्टेरोस्कोपी याद्वारे याचं निदान होऊ शकतं,आणि उपचारही...

गर्भावस्थेत माझा आकार खूप पटीने वाढतो, आणि माझ्या आत वाढत असलेल्या गर्भाला पोषण मिळावं म्हणून माझा रक्तप्रवाह ही जवळजवळ पाचपट वाढतो.

त्याचमुळे गर्भपातादरम्यान, नैसर्गिक प्रसूती किंवा सिझेरियन दरम्यान कधीकधी अत्यंत जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होऊन स्त्रीच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो.

गर्भनिरोधक म्हणून बसवली जाणारी कॉपर टी सारखी साधने मस्त माझ्या आत पहुडतात वर्षांनुवर्षे आणि मला मदतच करतात कारण त्यामुळे विनाकारण नको असलेली गर्भधारणा होऊन, गर्भपाताची वेळ येत नाही आणि मला जखम होणं,खरवडून काढलं जाणं टाळलं जातं.

पुढे चाळीशीत माझ्यात काही गाठी निर्माण होऊ शकतात,त्यांना फायब्रॉईडच्या गाठी म्हणतात.ह्या गाठी छोट्या असल्या आणि काही त्रास देत नसल्या तर काढल्या नाही तरी चालतात.कारण त्या खूप हळूहळू वाढतात आणि त्यामध्ये कॅन्सर उद्भवण्याची शक्यता अगदी नगण्य असते.शिवाय रजोनिवृत्तीनंतर त्या आपोआप जिरूनही जाऊ शकतात.

पण आपल्या काही भगिनी ,दुसऱ्या काही कारणासाठी सोनोग्राफी केली असता त्यात गाठ आढळली तर विनाकारण घाबरून जाऊन लगेच मला काढून टाकू पाहतात.ते चूक आहे.

आता कॅन्सरबद्दल थोडं..

योनीमार्गात असलेल्या गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हे स्त्रियांच्या मृत्यूचे मोठे कारण आहे.त्यामुळे असे मृत्यू टाळण्यासाठी अनियमित रक्तस्त्राव किंवा अतिप्रमाणात योनीमार्गातून पांढरे जाणे अशी लक्षणे असतील तर पॅप स्मियर ही तपासणी लगेच करून घ्यावी.

त्यात काही घाबरण्यासारखं नसतं, तुमचे स्त्रीरोगतज्ञ हळुवारपणे गर्भाशयमुखाला खरवडून तिथल्या काही पेशी घेतात आणि दुर्बिणीतून तपासणीसाठी पाठवतात. आलाच समजा कॅन्सरचा रिपोर्ट,तरी घाबरून जाण्याचं काही कारण नसतं.

गर्भाशयमुखाचा कॅन्सर असो वा गर्भाशयाच्या अस्तराचा,सुरुवातीच्या स्टेजमध्ये गर्भाशय व आजूबाजूचा काही भाग काढण्याचे ऑपरेशन करून त्यानंतर काही रेडियो थेरपीचे शेक घेतले,केमोथेरपीची इंजेक्शने घेतली की पूर्ण बऱ्या होऊ शकता तुम्ही.

स्त्रीच्या रजोनिवृत्तीनंतर मी हळू हळू परत पिटुकली होऊन जाते आकाराने...

पण खूप साऱ्या आणि अवघड नॉर्मल प्रसूती झाल्या असतील तर कधी कधी जागेवरून घसरते आणि मग स्त्रियांना योनीमार्गातून काहीतरी बाहेर आल्याची कम्प्लेंट सुरू होते. लघवीला,संडासला त्रास होतो.अश्या वेळी मला काढून टाकून जागा टाईट करण्याचं ऑपरेशन करावं लागतं.

छोट्या छोट्या ,औषधाने बऱ्या किंवा नियंत्रित होऊ शकणाऱ्या प्रॉब्लेम्ससाठी गर्भाशय काढूनच टाका एकदाचं असा काही स्त्रियांचा अट्टाहास असतो.पण वयाच्या पस्तिशी अगोदर गर्भाशय काढण्याचे ऑपरेशन अगदी गरजेचे असेल तर करायला हवे कारण कमी वयात केलेल्या या ऑपरेशनमूळे पुढील आयुष्यात तुम्हाला अत्यंत त्रासदायक परिस्थितीला सामोरं जावं लागू शकतं.

अशी मी ,पुनरोत्पादनकार्यातील असामी.

तुमचीच गर्भ'पिशवी'

- डॉ साधना पवार

Updated : 7 Dec 2019 11:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top