Home > Max Woman Blog > आज 'लालपरी'चा 73वा वाढदिवस..

आज 'लालपरी'चा 73वा वाढदिवस..

आज लालपरीचा 73वा वाढदिवस..
X

खरे तर किती आणी काय काय लिहावे हिच्याविषयी.
ही कधीच उतली नाही, मातली नाही आणी हिने घेतला वसा कधीही टाकला नाही.
अनेक उन्हाळे, पावसाळे हिने आपल्या अंगावर झेलले पण आपलं ब्रीद कधीच त्यागले नाही.
कोणी ही यावे हिच्याकडे पाहून नाक मुरडावे, कोणीही यावे हीची यथासांग टवाळकी करावी पण आपल्या आयुष्याचा नेमका उद्देश्य काय आहे हे समजलेली आधुनिक युगातली ही खरोखर व्रतस्थ साध्वीचं आहे.

आयुष्याची त्र्याहत्तर वर्ष एकाच तत्वाला बांधून रहाणे म्हणजे साधी गोष्ट नाही. विशेषतः आजच्या जमान्यात, जिथे कालची गोष्ट आज जुनी होते किंवा अव्यवहार्य होते. पण खरे सांगायचे तर हिने कधी व्यवहार पाहीलाच नाही अगदी चार/आठ आन्याच्या जमान्यापासून ही म्हणतेय थोडे कमी पडतात का? असूदेत, थांब आधी तुझ्या थांब्यावर सोडते ,होईल काहीतरी व्यवस्था.

खरे तर एक जमाना होता जेव्हा तीची मोनोपोली होती अगदी बीएसएनएल सारखीच. पण तेव्हा ही तीने कधी माज केला नाही. तेव्हा तुरळक जीप, अॅम्बसिटर्स, फियॅट दिसायच्या पण त्यावर मक्तेदारी ठराविक वर्गाचीच असायची. पण पावसाळ्यात ओढे, नदी, नाले तुडुंब भरले की त्या ठूस्स होऊन जायच्या शिवाय रस्ते बऱ्यापैकी हवेत ही त्यांची मुख्य अट असायची. जरा रस्ता खडबडायला लागला की या नखरेल नारी लगेच धापा टाकायला लागायच्या. पण आमच्या या लालपरीला कशाचा म्हणजे कशाचाच फरक पडायचा नाही. ओढा, नदी, नाला या मध्ये ती अगदी दिमाखात उतरायची, अगदी पाणी इंजिन पर्यंत शिरून तीच्या नाकातोंडात जाऊन श्वास गुदमरायला लागला की लगेच तिच्यात निर्धास्त पणे विराजमान झालेली फौज खाली उतरून "जोर लगाके हैय्या" चा नारा देत तिला अलगद काठावर आणायची आणी तिला ताजीतवानी करायची.

रस्ते गुळगुळीत हवेत ही अट तर तीला तेंव्हा ही नव्हती आणी आज ही नाही उलट जिथे रस्ता नाही तीथपर्यंत तीने पोहोचलेच पाहीजे हा दंडकच तीला घालून दिला होता त्यामुळे कोणतेही बुद्रुक/वाडी/वस्ती/फाटा तीला कधीच त्याज्य नव्हता. फियॅट/अॅम्बसिटर्स तीच्याकडे बघून नाक मुरडत म्हणायच्या कशी ग कुठे ही आदळत जातेस तू? ती आपली हसतं म्हणायची बयानो तुम्ही फक्त शेठ/राव/मालक/बाईसाहेब यांचेच लाड पुरवायला आहात पण त्या पेक्षा म्हमद्या पासून ते गंगूबाई पर्यंत सर्वांच्या सुखदुःखाला मलाच धावायचं असते बयानो त्यामुळे रस्त्यांचा नखरा करून मला नाही भागणार.

शिस्तीचा आणी तीचा तर छत्तीसचा आकडा. ती फक्त कंडक्टरच्या टंक टंक या डबल बेल लाच बांधील. कोणी ही कुठं ही हात दाखवावा आतमध्ये किती ही खच्चून गर्दी असेल तरी त्याला आत कोंबलेच म्हणून समजा अगदी ही शिगोशिग भरली तरी खिडक्यांपासून टपापर्यंत कोणी ही इथे मुक्त वावर करतो. त्या छोट्या गाड्यांसारखा "हम दो हमारे दो "असा मामला इथे नाहीच. कोणीही आतमध्ये शिरा जागा आपोआप तयार होते या श्रद्धेने त्र्यहत्तर वर्ष ती काम करतेय.

इतक्या लोकाना आपल्यात सामाऊन घेणारी ही, पण माणसांसारखी खाल्लेल्या मीठाला न जागणारी दूसरी अवलाद तीने पाहीली नाही. सकाळी अगदी पाईप लाऊन हीची अंघोळ झाली तरी हीच्यात बसलं रे बसलं की एखादा गण्या लालभडक पाणाची पिंक टाकणार म्हणचे टाकणारच, एखादी चिमुरडी सकाळी जेवलेले सगळं बाहेर काढणार त्यात सामोस्या पासून गारेगार पर्यंतचा सगळा कचरा एकोप्याने सिटाखाली गपगुमान पडून रहाणार आणी या सगळ्यां चे एकत्रीत वास झेलत ड्रायव्हर आणी कंडक्टर शेवटच्या थांब्यापर्यंत जाऊन कधी कधी थोडी विश्रांती घेऊन तर, कधी कधी बोर्ड उलटा करून लगोलग माघारी फिरणार, परत फिरताना गजबजलेल्या कॅन्टीन मधला एखादा कटिंगचा चहा नाही तर एक राईसप्लेट मारली की निघाले परत.

बरे एवढा दहा/ दहा तासाचा प्रवास करताना गाडीचा पार्ट ना पार्ट ढिला झालेला, गियर आखडलेला, बंद खिडकी उघडत नाही की उघडी खिडकी जाम बंद होत नाही, पाऊस/उन सगळं झेलत आणी आपल्या गावी पोहचल्या नंतर PWD चा मेंटेनन्स शुन्य असलेल्या इमारतीत गळक्या घरात बिछान्यावर अंग टाकायचा हा त्यांचा दिनक्रम. सगळं रेटायच हेच त्यांच ब्रीद. भरीला भर म्हणजे रस्त्यातलच चेकिंग, लोक पण विचीत्र झालेत एखादा रूपया जरी सुट्टा नसला तरी मिळेपर्यंत पाठ सोडत नाहीत हुज्जत घालतात नाही तर कंम्लेंट करतात आणी हे ड्रायव्हर,कंडक्टर सगळ्या गोष्टींचा सामाना करीत आपली ड्यूटी पार पाडीत रहातातच.

फक्त उन/ पावसाळाच लालपरीला नाही झेलावा लागतं तर हीच्या नशिबी कायम दगड धोंडेच. कधी कोणी बंद ची हाक दिली की रस्यावरून तीच्या बिरादरीतल्या स्कूटरपासून ट्रक पर्यंत सगळ्या जणी गायब होतात. ही मात्र भिमदेवीच्या थाटात गच्च गर्दी घेऊन रस्त्यावर हमखास असतेच.आणी मग नेम धरून तीच्याच काचांवर खळ्ळ फट्याक होत रहाते. ती बिचारी तो मारा सहन करीत थूंकणाऱ्या / कचरा करणाऱ्या / शिव्या देणाऱ्या गर्दीला व्रतस्थपणे आपल्या इच्छित ठिकाणी सोडतच रहाते.

मध्यंतरी तीने थोडेसे रूप पालटायचा प्रयत्न केला, म्हणजे एशियाड, शिवशाही वगैरे. त्या ही दिमाखात तीच्याच स्टॅन्ड वर उभे रहायच्या. अगदी ऑनलाईन बूकिंग वगैरे सगळे थेर. पण मग बुद्रुक/वाड्या/वस्त्या वर जायला नकोच म्हणायच्या त्यांना फक्त पुणे/मुंबई/सोलापूर/कोल्हापुर चाच सोस. पण आमच्या परी ला काळजी सगळ्याच ग्रामीण भागाची त्यामुळे त्यांच्या नाक मूरडण्याकडे दूर्लक्ष करीत आणी गच्च भरलेल्या गर्दीचे हास्य विनोद/शिव्या शाप नेटाने झेलीत, नफा/ फायदा याचा यत्किंचितही विचारही न करता ही त्र्यहत्तर वर्षांची आज ही युवतीला ही लाजविल अशी धावतेय, गोर-गरिबांसाठी आपल्या ब्रिदाचे इमान राखीत अखंड पणे काम करतेय आणी म्हणूनच मला ती सदैव प्रिय आहे आणि राहील.

अशी ही गुणी आमची लालपरी तीला वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा. तुझं असणं आमच्यासाठी खुप अश्वासक आहे म्हणून तु चिरतरूण रहा आमच्यासाठी.

-डॉ. हेमलता पाटील

Updated : 1 Jun 2020 7:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top