Home > Max Woman Blog > प्रत्येकीला हवीशी 'त्या' दोघांची ‘लग्नानंतरची गोष्ट’

प्रत्येकीला हवीशी 'त्या' दोघांची ‘लग्नानंतरची गोष्ट’

प्रत्येकीला हवीशी त्या दोघांची ‘लग्नानंतरची गोष्ट’
X

सोपं नव्हतं काही दिवसातच एका अशा जोडीदाराची निवड करणं

ज्याच्या आरोग्याबद्दल आधीच माहिती आहे, कोणताही मोठा

आजार नव्हता फक्त एक छोटासा अपघात होता, परंतू जेव्हा जोडीदार

बनवण्याचा विचार केला तेव्हा माहीत नव्हते की, पुढे त्या अपघातातून

शरीर बरं होऊ शकेल की, नाही किती दिवस त्या अपघातासह राहावं

लागेल किती दिवस चालण्यासाठी काठीचा आधार घ्यावा लागेल?

सोपं नव्हतं लग्नासाठी, इतकी वर्षे ज्या शहरात सेटल आहोत

ते शहर, आपले मित्र, आपली नोकरी सोडून एकही प्रश्न न करता

दूसऱ्या शहरात नवीन सुरवात करणं, आपल्या होणाऱ्या जोडीदारासह

एका अशा शहरात जाऊन राहनं, जे कधीच आवडलं नव्हत.

तिकडे राहून नवीन काम सुरू करणं, केवळ यामुळेच जोडीदार आपलं

शहर सोडून जाऊ पाहत नाही आणि जरी असं झालं असत तर काय,

हे असच असतं, त्याग तर करावाच लागतो.

सोप नव्हतं लग्नाआधी एकत्र राहणं आणि संसाराला सुरवात करणं.

विचार न करता तर सोबत राहणं ठरवलं नव्हतं, तरी असंच काहीस झालं

होतं. प्रश्न विचारणारे अनेक होते, परंतू सोप नव्हत त्यांना सामोरे जाणं

सोपं नव्हत रोज सकाळी आपल्या साथीदाराच्या आधी उठून त्याच्यासाठी

पाणी गरम करणं, हे बघणं की नाष्ट्यासाठी काय तयारी करावी

कपड्यांपासून प्रत्येक गोष्टीची तयारी करणं, जेव्हा पाणी गरम होईल,

तेव्हा जोडीदाराला उठवणं आणि तो तयार होईपर्यंत त्याचा नाष्टा टेबलवर

तयार ठेवणं, अर्धवट नाष्टा नाही हा…. पूर्ण पोटभर नाष्टा.

आता कारण, अपघातामुळे गाडी चालवण्यावर निर्बंध होते. तर सोपं नव्हतं,

रोज त्याला ऑफिसात सोडून येणं, परत लंचसाठी घरी घेऊन येणं आणि

परत ऑफिसात सोडून येणं, दरम्यान कधी ऑफिस टाईम मध्ये फोन आला

की, भूक लागली आहे, हे खाण्याचं मन होतयं किंवा ज्यूस प्यावासा वाटतोयं

तर तेही घेऊन त्याच्या ऑफिसात जाणं, त्यात पण साहेबांचे आणखी चोचले

“आज ना आपण हे खाऊ”, ज्या शहरात राहतोय तिकडे काही चांगलं

मिळणं कठीणचं. त्यात आणखी एक अडचण म्हणजे, जे स्पेशल खाण्याचं

मन होतयं ते बनवून खायला घालनं सोपं नव्हत.

सोपं नव्हतं एखाद्या दिवशी कामानिम्मीत्त बाहेर पडणं, पडलात तर

काळजी घेणं की, सगळे कपडे ईस्त्री केलेत ना? आणि कपाटात

व्यवस्थित ठेवले आहेत ना?, भाजी फ्रिजमध्ये ठेवली आहे ना?. प्रयत्न

करणं, ज्या दिवशी घरातून लांब दुसर्‍या शहरात गेले आहे. त्याच

दिवशी परतण्याचा किंवा निदान दुसऱ्या दिवशी येण्याचा. हद्द तर अशी,

प्रवासातून परतल्यानंतरही रात्रीचा स्वयंपाक तयार करण्याची.

सोपं नव्हतं भर थंडीत जेव्हा पाय खूप जास्त दुखत असतील, तासंतास

बसून पायाची मालीश करून देणं, उन्हाळ्यात घरातल्या नळाला

पाणी येणं बंद होतं तेव्हा, खाली जाऊन स्वत: एकटीने पूर्ण ड्रम भरणे

तेही विना तक्रार. सोप नव्हतं भांडीवाल्या मावशी नाही आल्या की,

सगळी भांडी स्वत: घासणं आणि घर देखील साफ करणं.

आता कुठे एका शहरात स्थिर-सावर झालो नाही, तोच बदली झाली

सोपं नव्हतं पुन्हा एकदा एका नवीन शहरात आनंदाने राहणं, पुन्हा

घर बसवनं आणि घर मिळत नाही तोपर्यंत घरच्यांसह राहणं.

सोपं नव्हत लग्नाआधी मित्र कोणाचेही येवो, एकानेच त्यांची जबाबदारी घेणं

त्यांच्या राहण्या-खाण्याची सोय करणं, सोप नव्हतं लग्नानंतर कोणाच्याही

कुटूंबातील लोक आले तरी त्यांची कोणा एकाने जबाबदारी घेँणं आणि त्यात

कुटूंबीयांची बोलणी ऐकन, तक्रार न करता. सोपं नव्हतं एका नवीन

परिवाराला अल्प काळात समजून त्यांचा मान-सन्मान राखून काळजी घेणं.

सोपं नव्हतं आपल्या जोडीदाराची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी, आपलं काम

करून नवीन कल्पना देणं, त्यावर काम करणं आणि त्यांच्या प्रत्येक स्वप्नात

साथ देणं, जरी हजार बाता ऐकाव्या लागल्या तरी.

सोप नव्हतं आपल्या कुटूंबाचं ओझं आपल्या जोडीदारावर लादू न देणं

आणि त्याला आपल्या स्व:ताच्या पद्धतीनं जगू देणं.

जोडीदार अपघातातून सावरला असला तरी, आजही सोपं नाही, रोज ऑफिसात

जाण्याआधी त्याच्यासाठी नाष्टा तयार करणं, मग कितीही भांडण होऊ दे

त्याला ऑफिसात उशीरा न पाठवणं, त्यासाठी डब्बा तयार करणं.

कधी घाईत डब्बा विसरला तर, तो ऑफिस पर्यंत पोहचवणं आणि सायंकाळी

थकून घरी आल्यावर त्याला गरमा-गरम स्व:ताच्या हाताने खाऊ देणं आणि हे सर्व

रिकामटेकडी आहे म्हणून नाही, तर आपल्या नोकरीसह इतर जबाबदाऱ्या सांभाळणं

नाही ना सोपं एवढं सगळ एकत्र करणं? परंतू हे माझ्यासाठी कधी अवघड

झालचं नाही. कारण मला हे सगळं कधी करावच लागलं नाही, अनेकदा हा

त्याग केवळ स्त्रीयाच करतात. सर्व जबाबदारी एक स्त्री घेते. पण आमच्या

नात्यात ही जबाबदारी माझा जोडीदार ‘निकेश’ ने घेतली.

नोकरी, घर आणि मला अशा तिन्ही गोष्टी त्याने सांभाळल्या आणि हे सर्व

काम करताना त्याने कधी इगो व्यक्त केला नाही, दिखावा न करता ३ वर्षे

सगळ सांभाळून घेतलं, त्यात कधी इगो आलाचं तर, तो माझ्यात आला.

वाचून वाटत असेल की, किती सुंदर नातं आहे हे!

हा गैरसमज आता दूर करूया, टोमणे वाद विवाद आमच्यातही तितकेच आहेत

फक्त फरक इतकाच आहे की, ती भांडणं कधी माझ्या आणि निकेश च्या

कामा आड आली नाहीत. निकेशने हा दूजाभाव कधी केला नाही की,

स्त्री ने घर सांभाळावं आणि पुरुषांनी नोकरी.

कारण निकेश घरून काम करतो आणि मला ऑफिसला जावं लागतं तर

घराची संपूर्ण जबाबदारी मी न सांगताच त्याने ने स्वत: घेतली. लग्नाआधी

किंवा लग्नानंतर कधीही मला बसून सांगण्याची वेळ आली नाही की,

हे काम तुझं, हे काम माझं. दोघांनीही न सांगताच जबाबदारी स्वीकारली.

मला कधी विचार करावा लागला नाही की, आज घरी कोणती भाजी आणावी

मला आजही माहीत नाही की, बाजारात कांदा बटाट्यांचे भाव किती,

या तीन वर्षात मला आठवतचं नाही की, मी स्वयंपाकघरात कधी गेले होते

आणि कोणता स्वयंपाक केला, शिवाय पोळी. तेही यासाठी कारण निकेशला

पोळी जमत नाही. त्यातही त्याला दिसलं की, ऑफिसचा माझ्यावर खूप

तान आहे आणि मला घरी परतण्यास उशीर होत आहे. तर अनेकदा

पोळी देखील त्याने स्वत: केल्या आहेत.

हे त्याच्यासाठी खरचं सोपं नव्हतं, आठवतयं मला

जेव्हा तो ऑफिसात माझ्यासाठी जेवण घेऊन येत होता.

माझ्या ऑफिसचे लोक त्याला गमतीशीर नजरेनं पाहत होते

पण त्याला कधी फरक नाही पडला. माझ्या एका ऑफिसरने तर

बोलून टाकले “मॅडम फॅमिली चांगली आहे ना निकेशची की,

पैश्यांसाठी लग्न केलं तुमच्याशी”. त्यांना काय माहीत आम्ही पैश्यांपेक्षा

जास्त आमच्या स्वप्नांसाठी जगतो, ते स्वप्न निकेशचे असो वा माझे.

मुंबईतील चांगली नोकरी सोडून निकेश, माझ्यासाठी यवतमाळ

आणि नंतर नागपूरला आला होता. मी नोकरी सोडून मुंबईला गेले असते

तर, संपूर्ण जगाला गर्व वाटला असता माझ्या त्यागाचा, माझ्या पत्नीधर्माचा

तेच एक मुलगा नोकरी सोडून आला तर, नजर बदलली समाजाची.

मी आजही स्वयंपाकघरात कमी काम करते. जमत नाही म्हणून नव्हे.

जर मी जास्त वेळ स्वयंपाकघरात दिला तर ते निकेशला आवडत नाही.

त्याचं हे म्हणणं आहे की, “जीवनात तू काहीतरी वेगळं करून नाव कमवाव,

त्या दिशेने काम करावं ना की स्वयंपाकघरात”.

कदाचीत हा आनंद नक्कीच पैश्यांनी विकत घेता येवू शकला नसता.

लग्नाआधी जेव्हा मी आईच्या घरून ऑफिसला जात होते. तेव्हा

मला, माझा नाष्टा टेबलवर मिळत होता आणि आजही मिळतोय

लग्नाआधी ऑफिसातले लोक मला चिडवायचे, “आता आई बांधून देते

म्हणून डब्यात इतक वरण भात, पोळी भाजी, चटणी मिळतेय, पण

लग्नानंतर हे सर्व कठीण होईल”. पण आजही माझा डब्बा तसाच मिळतो,

जसा आईच्या घरी मिळत होता. फक्त इथे आईच्या हातचं ‘एग्जॉटिक सलाद’

मिळत नाही. आता तेही ओबडधोबड कापून मिठ आणि चाट मसाल्यासह मिळतं.

जगाला चूकीचं वाटतं आजही त्यांच्या डोक्यात हे पक्क आहे की,

काम ही लिंगानुसार वाटून दिली आहेत. मुलगा हे करेल तर मुलगी हे

लोक आजही आश्चर्यचकीत होतात, “खरचं निकेश स्वयंपाक करतो!”

भूक दोघांना समान लागते, जर घर दोघांचं आहे, जर स्वप्न दोघांची आहेत

तर एक्ट्रा बॅगेज एकावर का?

तो माझ्यासाठी हे सर्व करतो त्यामुळेच सकाळी १० ते ७ च्या नोकरी नंतर

देखील मी वेळ काढू शकते संपूर्ण जग बघण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी,

माझ्या लिखाणाचा शौक पूर्ण करण्यासाठी आणि कधी कॉफी शॉप मध्ये

स्व:तासोबत वेळ घालवण्यासाठी. मी कदाचीत खूप जास्त नशीबवान आहे.

की, मला असा जोडीदार मिळाला आहे जो माझ्यासाठी खूप जास्त करतो.

तुम्ही भले कमी वेळ काम करा, पण करा तर खरं

एक वेळ मदत करून तर पहा, नवरा-बायको नाही

एकमेकांचे साथीदार बनून तर पहा.

चल जीवनाची गाडी काही अशी चालवू

तू थकलास तर मी ओढीनं

मी थकले तर तू ओढ

जर दोघे थकलो तर

एकमेकांच्या खांद्यावर विसावा घेऊ

पुन्हा एकदा नव्या उमेदीने

जीवनाची गाडी पुन्हा चालवू

- स्नेहल वानखेडे

Updated : 14 March 2020 2:12 PM GMT
Next Story
Share it
Top