Home > Max Woman Blog > संकटातही तळपली तिच्या जिद्दीची धार...

संकटातही तळपली तिच्या जिद्दीची धार...

कर्जामुळे शेतीचा लिलाव होईल ही भीती तिला झोपू देत नव्हती. कुटुंबाची सर्व जबाबदारी आपल्यावर असल्याने शेतीला वाचवणे तर गरजेचे होते अशा परिस्थितीत मेघा मुळाणे यांनी शेतीतच घट्ट पाय रोवून वास्तवाचा सामना केला आणि हिंमतीने चित्र पालटून दाखविले

संकटातही तळपली तिच्या जिद्दीची धार...
X

मेघा यांचे इयत्ता 10वीचे शिक्षण सुरू असताना 1992 मध्ये खतवड येथील भाऊसाहेब मुळाणेंशी त्यांचा विवाह झाला. माहेरी शेतीच्या कामाचा कुठलाही अनुभव नव्हता. सासरी एकत्र कुटूंब होते. पुढे एक मुलगी व एक मुलगा अशी अपत्ये झाली.दरम्यानच्या काळात सासर्यांचे निधन झाल्यानंतर मेघावरही शेतीच्या कामाची जबाबदारी आली. मात्र शेतीमध्ये फारसा अनुभव नसल्याने काम कसे करणार ही मोठी अडचण होती. त्यावेळी शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या कामांचे निरीक्षण करून त्या एकेक काम शिकत राहिल्या.तशी शेतीविषयी आवड देखील तयार होत गेली. 2003 मध्ये कुटुंब विभक्त झाले.

वाटणीनंतर चरितार्थ चालवण्यासाठी त्यांनी शेती करायचे ठरवले. पती भाऊसाहेब यांना आजारपणाने घेरले होते. त्यामुळे शेतीची सर्व जबाबदारी मेघा यांनी घेतली. सुरूवातीला द्राक्षबागेसाठी कर्ज घेतले. त्यातून द्राक्ष व सोबत भोपळ्यांची लागवड केली. त्या काळात शेतीतून जे उत्पन्न यायचे ते मुलांचे शिक्षण आणि पतीच्या उपचारात निघून जायचे. मग सोबत दुधाचा जोडधंदाही सुरू केला. परिस्थिती अवघड होती पण निराश होऊन चालणार नव्हते कारण मुलं आणि पती हे कुटुंब सोबत होते. पतीचा मोठा आधार वाटायचा. मात्र काही काळातच तो आधारही निसटला. भाऊसाहेब मुळाणे यांचे 2011 मध्ये यकृताच्या आजाराने निधन झाले. हा प्रसंग कठीण होता. आयुष्यात पुढे काय करायचं याबाबत असंख्य चितांनी मनात घर केलं होतं.

पतीच्या निधनानंतर सोसायटीचे कर्ज आणि मुलांचे संगोपन ही सर्वच जबाबदारी त्यांच्यावर आली होती. मुलगा अपंग होता तरी, शक्य तितकी मदत करत होता. एकट्याने सर्व काही सांभाळणे खूप अवघड होते. शेतीतून उत्पन्न काढणे हा एकच पर्याय समोर होता. त्यावेळी ' तू आता एकट्याने शेती आणि घर चालवू शकणार नाही म्हणून माहेरी जाऊन रहा किंवा कुठेतरी नोकरी कर. काम शोध असेही सल्ले काही नातेवाईकांकडून मिळत होते. मात्र अन्य कुणावर अवलंबून राहणे किंवा नोकरी करणे हे दोनही पर्याय त्यांना मान्य नव्हते. त्यापेक्षा शेती करून कुटुंब पुन्हा उभं करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. शेती आणि मुलांचे संगोपन दोन्ही जबाबदार्या त्या हिमतीने पार पाडू लागल्या. पण कर्जाच्या ओझ्याखाली असताना शेतीचा लिलाव केला जाईल ही भीती मात्र कायम अस्वस्थ करत होती. त्यामुळे सर्वात आधी शेतीला कर्जातून मुक्त करणे जास्त गरजेचे होते. शेतीत आधी द्राक्षबाग होती. पण, द्राक्षात वारंवार येणार्या अडचणींमुळे पुढे टोमॅटो पिकावर त्यांनी भर दिला.

मुलगा अपंग असल्याने त्याला शेतीकामांमध्ये मर्यादा होती. त्यामुळे एकट्याने रात्री शेताला पाणी देणे, शेतीत बोर लावणे ,इतर सर्व कामे मजूर लावून मेघा यांनी करून घेतली. पण हा मुलगाच या सर्व प्रवासात त्यांना बळकटी देणारा एक घटक होता. टोमॅटो शेतीमधील नवीन पद्धतींची माहिती त्या घेत गेल्या. आपल्या शेतीला तंत्रज्ञानाची जोड देऊन विकसित केले पाहिजे हा विचार मेघाताईंनी आयुष्यभर आपल्यासोबत बाळगला. पुढे जसजसे उत्पन्न येत गेले तसा शेतीकामासाठी त्यांचा आत्मविश्‍वास वाढू लागला. एक वर्षी याच एक एकर टोमॅटोमधून त्यांनी 7 लाखांचे उत्पन्न मिळाले. त्याच उत्पन्नातून पुढे ट्रॅक्टर घेतला. घर बांधले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कर्जाची परतफेड केली. आजमितीस मुलांचे लग्न होऊन सून, नातवंड असा परिवार आहे. मुलगा अपंग असूनही आर्थिकदृष्ट्या त्याला स्वतःच्या पायावर उभे केले आहे. शेतीमध्ये मुलाचा मोठा हातभार लागत आहे. आजही मेघा यांचा शेतीत अधुनिक पद्धतींचा अवलंब करण्याचा ध्यास कायम आहे. संकटकाळी नोकरीचा पर्याय नाकारून शेतीलाच तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्पन्न काढण्याचा निर्णय खरंतर मेघा यांना एक 'शेती उद्योजक' म्हणून सिध्द करतो.

Updated : 2022-09-28T16:00:21+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top