Home > Max Woman Blog > स्तनपान थांबवताना : अनुभव एका आईचा

स्तनपान थांबवताना : अनुभव एका आईचा

स्तनपान ही आई आणि बाळ यांची नाळ घट्ट करणार प्रक्रीया असते. पण आईचं कर्तव्य पुर्ण करताना स्त्रीला भयंकर त्रासाला सामोरं जावं लागतं. मग ह स्तनपान कस थांबवाव? स्तनपान थांबवताना काय करायचं? होणाऱ्या त्रासापासून स्वतःला कसं सावरायचं असे प्रश्न सतावत असतील किंवा मनात घोळत असतील तर आवर्जून स्नेहा ढोले यांचा लेख वाचा

स्तनपान थांबवताना : अनुभव एका आईचा
X

#weaning

स्तनपान थांबवताना: माझा अनुभव (long post alert)

खरं तर फार तटस्थ भूमिका घेऊन मला हे लिहायचं होतं आणि म्हणूनच थोडा वेळ जाऊ देऊ असं वाटत राहिलं पण आता राहवत नाहीये...

गेल्या दोन दिवसांपासून मोबाईल अजिबात चार्ज करावासा वाटला नाही आणि त्याची गरजही पडली नाही म्हणजे दिवस कसा जात असेल याची कल्पना तुम्ही करूच शकता.

मी कबीरचं दूध तोडण्या विषयी बोलतेय आणि आजचा चौथा दिवस आहे.

यावर मी सविस्तर बोलणार आहे.

खरं तर हे जे काही लिहितेय ते लिहितानाही प्रचंड रडू येतंय. कुणाशी बोलावं न वाटणं, काहीच सांगावं ऐकावं न वाटणं हे घडूच शकतं या काळात आणि ते फार नैसर्गिक आहे. ह्यातून तुम्ही जात असाल किंवा दूध तोडण्या विषयी विचार करत असाल तर हे सगळं वाटताना आणि मनाची घालमेल होत असताना तुम्ही एकट्या नाही आहात एवढंच मला या पोस्टमधून सांगायचंय.

कबिरचं अंगावर पिणं थांबवण्याधी मी स्वतःला आणि त्याला भरपूर वेळ दिला खरं तर. आता तो 19 महिन्यांचा पूर्ण झालाय. आणि बाळाला अंगावर पाजण्याची गरज फार तर 17 महिन्यांपर्यंत असते. त्यापुढं काही जणी पाजतही असतील पण त्याची खरोखर गरज नाहीये.

शेवटी शरीर आणि मानसिक या दोन्ही स्तरावर प्रचंड थकवणारी गोष्ट असते ही. त्याच्या बद्दल बोलायचं झालं तर कबीरचा जन्म झाल्यापासून ते अगदी परवा परवा पर्यंत अंगावर पित झोपणच त्याला माहित होतं.

पाळण्यात झोपवलं तरी दचकून उठणार लगेच आणि मग मी छातीशी धरून त्याला पुन्हा पाजत झोपवणार... असं सगळं चित्र. रात्रीची कथा तर अजूनच न्यारी! मी लघवीसाठी उठले तरी तेवढ्या वेळात पठ्ठ्या डोळे मिटल्या अवस्थेत सरळ उठून बसून रडायला लागायचा. त्याच्या बाबांनी जवळ घेतलं तरी छाती चाचपून बघायचा आणि ही आई नाही असं समजलं की अजून भोकाड पसरायचं. बाळाला पाजत असताना त्याला आणि आईला नक्की काय वाटत असतं हा अनुभवच शब्दातीत आहे. पण अशा घटना जेव्हा घडतात तेव्हा ते सगळं फार अंगावर येतं. एवढ्या एका पाजण्याच्या गोष्टीमुळे मी कित्येक रात्री रडून काढल्यात कारण दात यायला लागल्यावर एवढा वेळ पाजणं फार त्रासदायक व्हायला लागलं. त्यात चावून केलेल्या जखमा वेगळ्याच!

सतत त्याच्या तोंडात लागत असल्यानं कितीतरी तास पाठ सरळ न केल्यानं लागणारी कळ आणि नवऱ्याला,

"मला जगूच वाटत नाहीये"

हे बोललेलं वाक्य मला अजूनही तेवढच ताजं आठवतं.

खूप जणांनी मला थांबवायचा सल्ला दिला पण मला 17 महिने पाजयचं होतं आणि तो माझा मीच पुरवलेला हट्ट होता.

त्या काळात झालेल्या त्रासाचं खापर कुणावरही फोडता येणार नाहीये पण मनापासून मी तयार असे पर्यंत दूध तोडायचं नाही, त्यात आपल्याला किती महिने पाजावं हे माहीत असताना तर नाहीच नाही हे मी मनात ठरवून टाकलेलं.

मला अजूनही आठवतं, कॉलेज जॉईन केल्यानंतर परत आले की धावत अंगावर येऊन कबीर पायावर पाणीही घालू द्यायचा नाही की घट्ट बिलगून दूध पिण्याचा हट्ट करायचा. कित्येक वेळा मी घरात शिरल्यावर 15 व्या मिनिटाला ते कोकरू गाढ झोपी गेलेलं असायचं गबगब दूध पीत. त्यावेळी त्याच्या कपाळाचा मुका घेऊन हलकेच बाजूला होऊन मी अक्षरशः प्रकाशवेगानं फ्रेश होवून पुन्हा तो उठण्याचा आत त्याला कुशीत घेऊन झोपायचे.

प्रत्येक आईच्या आठवणी वेगळ्या असू शकतील अंगावर पाजण्याबाबत पण तिच्या मनाची अवस्था आणि लावलेला जीव जराही कमी नसतो.

हे सगळं फार सुखावणारं आणि त्याचवेळी आई म्हणून परीक्षा पाहणारं. स्वतःच्या नजरेत अपराधी ठरवणारंही असतं. काहीही झालं तरी मी पूर्ण वेळ घेतलाय आणि आता आमच्या दोघांसाठीही हे थांबवण्याचा हा बेस्ट टाइम आहे असं मी ठरवलं आणि माहेरी निघून आले...

सुरवातीला आठ दिवस मी त्याचं येता जाता सतत पिणं बंद केलं. कसं? तर हिंग पावडर पाण्यात भिजवून ती निपल्सला लावायची आणि हे शी झालंय आता असं त्याला सतत सांगत राहायचं.

त्याला हा प्रकार विचित्र वाटला खरा पण थोडं हिंग जिभेला लागताच तो तोंड वाकडं करत निघून जायचा.पुन्हा खेळण्यात व्यस्त व्हायचा. मग फक्त दुपारी झोपताना आणि रात्री झोपताना असं दोनदा फीड केलं. ह्यात आठ दिवस जाऊ दिले.

नंतर दुपारीही थांबवलं आणि फक्त रात्री देत गेले.काही दिवस हाच प्रयोग केला.

त्यानंतर मनाचा हिय्या केला आणि आणि चार दिवसांपूर्वी रात्रीही न देण्याचा म्हणजे पूर्णपणे breastfeeding थांबवण्याचा निर्णय घेतला.

माझ्यासाठी तो फार मोठा निर्णय होता.

आदल्या रात्री कडुनिंबाच्या रसाची मात्रा जरा कमी झाली आणि त्यासकट निग्रहानं दूध ओरपत लेकरू झोपी गेलं होतं. त्यावेळी मीही अडवलं नाही कारण माझीही थरथर चाललेली आणि दूध पिळून सुद्धा छाती भरून आल्यानं कसर यायला लागली अंगात.

दुसऱ्या दिवशी मात्र दूध थांबण्यासाठी डॉक्टर च्या सल्ल्यानं गोळ्या घेतल्या आणि या दिवशी रात्रीसुद्धा दूध दिलं नाही.

गोळ्यांचे साईड इफेक्ट म्हणून मळमळ, चक्कर, अंगात ताप आणि जेवणाची इच्छा पूर्ण उडून गेलेली.

त्यात आता रात्रीही मिळत नाहीये हे बघून बाळाची अवस्था सांगण्या पलीकडे वाईट... श्वास रोखेपर्यंत रडण्यापासून ते गडबडा खाली लोळेपर्यंत त्याला लालबुंद झालेला बघून, कडू लावलेलं असतानाही त्याचा वारंवार पिण्याचा प्रयत्न पुन्हा तोंड कडू पडलं की चिडून पूर्वीपेक्षा अधिकच जोरात त्यानं फोडलेला टाहो हे अगदी शहारे आणणारं तर होतंच पण त्याची आई म्हणून खूप खचवणारं होतं. स्वतःबद्दल काहीच्या काही guilt आणणारं होतं.

पण यावेळी न पाजण्याचा निर्णय पक्का होता. त्यात गोळ्या घेतल्यामुळे आता पाजणे योग्य नाही हे डोक्यात पक्के असल्याने त्याचीही निश्चय पाळताना फार मदत झाली.

शेवटी माझा बांध फुटला आणि मी हमसून हमसून रडायला लागले. आई बाबा सोबत होते. यावेळी त्यांनी केवळ स्पेस दिली... त्याच अवस्थेत तो छातीवर हात ठेवून डोकं कुशीत खुपसून झोपी गेला.

लगेच दोन तीन तासात एवढा थकलेला जीव पुन्हा उठला आणि दुधासाठी रडारड सुरू. पहाटे तब्बल 4:30 वाजता बाबांनी त्याच्यासाठी घेतलेल्या सायकलवर बसवलं आणि दीड तास मोकळ्या हवेत फिरवत राहिले त्याला.

सकाळी उशिरा दमून कबीर झोपी गेला.

तीन चार महिन्यांपूर्वी बंद केलेला पाळणा पुन्हा यावेळी सुरू करावा लागला. कुणीतरी पूर्णवेळ झोके देत राहायचं. त्याला झुलवत ठेवायचं आणि मी कमी दिसेन असे प्रयत्न करायचे.

घरच्यांनी पाळीच ठरवून टाकली. आईला रात्री लवकर झोप येत नाही म्हणून ती त्याला पाळण्यात घालून अक्षरशः पहाटे 4 साडे चार पर्यंत त्याला पूर्ण जाग येऊन रडायला लागे पर्यंत झोके देत राहायची.

पहाटे उठून फिरायला जाणारे बाबा आता कबीरला सायकल वर घेऊन दिडेक तास फिरायला लागले आणि संध्याकाळी किंवा बाबांना शक्य नसेल तेव्हा सकाळी सुद्धा सूरज त्याला घेऊन फिरायला जायचा.

दुसऱ्या दिवशी सकाळी ८ नंतर ११ वाजेपर्यंत आम्ही तिघेही अक्षरशः मेल्यासारखे झोपी गेलेलो आणि एकटा सूरज मात्र त्याची आणि आमचीही झोप व्हावी म्हणून त्याला तीन तास झुलवत बसलेला.... हे चित्र सतत तीन दिवस सारखं होतं.

काल मात्र एक प्रयोग केला. हकुहळू कबिरनं न पिणं स्वीकारलंय आणि तो यापूर्वी अजिबात न आवडणारं वरचं दूधही पितोय हे लक्षात आलं. मग त्याला झोप लागेपर्यंत केवळ पाळणा आणि नंतर मात्र पुन्हा काढून घेऊन आमच्याच जवळ झोपवलं. आजही पहाटे चुळबुळ सुरू झाली आणि झोपेत मजो(तो "मम दे"चा त्यानंच केलेला शॉर्ट फॉर्म आहे)मजो करत अस्वस्थ व्हायला लागला पण यावेळी तो पूर्ण उठायच्या आत मी "मम शी झालंय, हवं तर पिऊन बघ" म्हणत आधीच कडू लावलेल्या छाती जवळ घेतलं त्यानं नाक मुरडत न पिणंच पसंत केलं पण आधी ठेवायचा तसाच छातीवर हात ठेवून कुशीत झोपी गेला.

त्याचं जग बदललंय पण ते कुणी हिरावून घेतलं नाहीये अद्याप त्याच्या पासून ही एक शाश्वती त्याला आली असावी. शिवाय गेल्या चार दिवसात आज कुठं तो सकाळी ८ पर्यंत निवांत झोपला...

आई बाबा आणि सूरज सुद्धा आज झोपेत गुडूप होते. गोष्टी वेळ घेतात पण खंबीर झाल्याशिवाय ह्या गोष्टींना पर्याय नसतो तेव्हा स्वतःला सावरत ही फेज फेस करायला हवीय. कारण आज न हट्ट करता सकाळी ८ पर्यंत झोपलेला कबीर म्हणजे आमच्या प्रयत्नांनी जिंकलेला अर्धा अधिक गडच होता.

इथून पुढं मला वॉशरूमला जाताना धाकधूक नसेल, मी जास्त कार्यक्षम होऊन माझं freelance writing चं काम करू शकेन. सतत फिडिंगचे कपडे न घालता आवडतील त्या कपड्यात बाहेर पडू शकेन... कधी त्याला आवडत्या माणसांपाशी ठेऊन मस्तपैकी सिनेमा बघूनही येईन...आणि आता कॉलेज मधून परतल्यावर एक मिठी मारून फ्रेश व्हायला हक्काचे दहा मिनिटं घेईन...

दोघांतलं खूप मोठ्ठ काहीतरी हरवलं या भावनेएवढीच ही नव्यानं मिळालेली मोकळीक, स्वातंत्र्य सुद्धा तितकंच मोलाचं आहे. कारण एक आई असताना सुद्धा माझं स्वतःचंही विश्व मी कायम जपलं आणि आता स्वतःसाठी अधिक वेळ द्यायला हवाय असं मनापासून वाटत असतानाच मी माझ्या माणसांच्या मदतीमुळं ह्यातून बाहेर पडले... हे फार सुखावणारं आहे!

हा अनुभव एवढा विस्तृत का लिहिला?

तर येणाऱ्या अडचणी खूप घुसमट करवणाऱ्या असू शकतील बाळाचे स्तनपान थांबवताना, पण खचून जाऊ नका हेच मला मनापासून सांगावंसं वाटलं.

नेहमी हसरं खेळतं असणारं बाळ याकाळात फार unpredictable वागू शकतं तेव्हा त्याच्यावर न चिडता त्याला समजून घ्यायला हवंय. शेवटी आपल्या सोबत तेही त्याचा अत्यंत आवडता आणि comfort zone सोडून इथून पुढं आपल्यासोबत असणारेय. हे त्याच्या साठी नक्कीच फार कठीण आहे.

गोळ्यांचे साईड इफेक्ट असतात आणि पूर्ण दूध येणं थांबायला तीन ते चार दिवस लागतात. असं असलं तरी खूप दूध असणाऱ्या आईला गोळ्या घेऊन दूध थांबवणं सोयीचं जातं.

शेवटचं आणि महत्वाचं :

तुम्ही सगळे मला आवर्जून वाचता आणि म्हणूनच तुमच्या मनात भिती निर्माण करून मला अजिबात आनंद होणार नाहीये.

एक लक्षात घ्या, की वर सांगितलेला हा कबीर आणि माझा अनुभव आहे.

कित्येक स्त्रिया अशाही आहेत ज्यांच्या बाळांनी अजिबात काहीही त्रास न देता स्तनपान बंद करून टाकलं. त्यामुळं तुमचा अनुभव कदाचित कमी खाचखळग्यांच्या सुद्धा असू शकेल याबाबत सकारात्मक असायला नक्कीच हरकत नाही.

I hope it will help you.

- स्नेहा ढोले

#EasyAai #easyaai

Updated : 26 May 2022 1:01 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top