Home > Max Woman Blog > पत्रकारितेची लाज अखेर महिला पत्रकारांनीच राखली

पत्रकारितेची लाज अखेर महिला पत्रकारांनीच राखली

पत्रकारितेची लाज अखेर महिला पत्रकारांनीच राखली
X

गेली अनेक दिवसांत इतिहास रचला जाईल अशा घटना घडल्या. न भूतो न भविष्यती अशा प्रकारे सुशांत सिंग यांचे प्रकरण मीडियाने लावुन धरले. ओंगळवाण्या पध्दतीने का होईना मात्र सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा केला गेला. यातच पत्रकारातेच्या सगळ्या नियम, तत्वांना (ethics) धाब्यावर बसवले गेले. ज्या पध्दतीने या प्रकरणाचे वार्तांकन केले गेले त्यामुळे एकंदरीतच माध्यमांवर सामान्य जनतेचा रोषच वाढत गेला. पत्रकारीतेला श्रध्दांजलीही वाहण्यात आली. गेलेली लाज परत आणण्याचे काम नेहमीच महिलांवर टाकुन मोकळा होणा-या आपल्या पुरुषसत्ताक पध्द तीत महिला पत्रकारांनी हे ही शिवधनुष्य पेलले. तनुश्री पांडे तसेच प्रतिमा मिश्रा यांनी हाथरस प्रकरण ज्या पध्दतीने उलगडत नेले त्यामुळेच संपुर्ण पत्रकारितेची जाणारी लाजच त्यांनी वाचवली आहे.

रात्रीच्या अंधारात पिडीत मुलीचा अत्यंसंस्कार पोलिसांनी केला मीडिया बरोबरच घरच्यांनाही तिच्या अत्यसंस्कारापासुन रोखण्यात आले. गेली २ आठवडे ती मुलगी आपले श्वास सांभाळण्याचा प्रयत्न करीत होती. अंत्यसंस्कार करतांनाचे लाईव्ह तनुश्री पांडे हिने केले त्याबरोबरच मुजोर पोलिसांसोबतचे बोलणे ही तिने आपल्या सोशल मिडीयावर टाकले. केवळ उत्तरप्रदेशच नाही तर संपुर्ण भारत यानंतर हदरला.

सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या कुटुंबाचे काय हाल होतायत हे संपुर्ण भारतीय जनतेने पाहिले. हे घडल्या नंतरही पोलिसांची मुजोरी कायम राहिली पिडीतेच्या कुटुंबाला माध्यमांशी बोलण्यापासुन रोखल गेलं. त्याच कुटुंबातील कसंबसं जीव मुठीत धरत बाहेर आलेल्या मुलाने जी माहिती दिली त्यात आपले मोबाईल हिसकावून घेतल्याचे त्याने सांगितले. त्या नंतर प्रतिमा मिश्रा यांनी केलेला स्त्री हट्ट आपण सगळ्यांनीच पाहिला. सत्याग्रह म्हणा की आंदोलन म्हणा काहीही म्हणा मात्र पीडित कुटुंबाला भेटायचा हट्ट प्रतिमा मिश्रा यांनी सोडला नाही. पोलिसांनी रोखले तरी ऑर्डर न दाखवता तुम्ही मला रोखु शकत नाही हे तिने आपल्या वागण्यातुन सातत्याने सांगण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी थांबवायचा प्रयत्न केला तरी ती सातत्याने त्याला प्रतिउत्तर देत होती. या दोन्ही पत्रकारांच्या बोलण्यात महिला प्रश्नांची तळमळ तुम्हाला स्पष्ट दिसुन येते.

ग्राउण्डवर काम करणे ही काही सोपी गोष्ट नाही. पुरुषांच्या टोळक्यात शिरत त्यांना प्रश्न विचारणं हे दिसत तितक सोपे नक्कीच नाही. जाहिरातीत फिल्ममध्ये दाखवतात तस सहजा सहजीच आयुष्य महिला पत्रकारांचं नक्कीच नसतं. जिथे महिलांनी प्रश्नच विचारायचे नाहीत अशा समाजव्यवस्थेत वावरणारे आपण तिथे समाजाचे प्रश्न स्रियांना मांडण्याची अक्कल आहे हे कसे स्विकारणार? यातच ते प्रश्न विचाराणारी स्री असेल तर पुरुषी अहंकार दुखावतोच. तो कुरवाळत न बसता आपलं काम करण हे पत्रकार म्हणुन नी पुढे स्री म्हणुन सोप्प नसंत म्हणुनच तर महिला पत्रकार घरातली सुन म्हणुन अनेकांना नको असते. आजही महिला संपादक तुम्हाला तुरळकच दिसतात त्याचे कारण हे या व्यवस्थेतही आहेच. मात्र या व्यवस्थेला सातत्याने धक्के देण्याचे धैर्य काही तुरळकच महिला करतात त्यातील या दोन जिगरबाज महिला पत्रकार. केवळ महिला म्हणुन नाही तर पत्रकारांची लाज वाचवली म्हणुन आपण सर्वांनीच त्यांचे ऋणी असायला हवं.

  • प्रियदर्शनी हिंगे

Updated : 3 Oct 2020 1:07 PM GMT
Next Story
Share it
Top