Home > Max Woman Blog > त्यागाची मुर्ती माता रमाबाई आंबेडकर...

त्यागाची मुर्ती माता रमाबाई आंबेडकर...

त्यागाची मुर्ती माता रमाबाई आंबेडकर...
X

आपल्याकडे असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. स्त्री ही घराचं वात्सल्य जपते, घराला घरपण देते आणि पुरूषाला आधार देते. भारताचे संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनाही असाच आधार मिळाला तो त्यांच्या पत्नी माता रमाबाई आंबेडकरांचा. रमाबाईंना 'माता रमाई' का म्हणायचे? तर 'तो होता म्हणून आम्ही आहोत' असे समाजबांधव जेव्हा बाबासाहेबांबद्दल बोलतात, तेव्हा मी सांगू इच्छिते की, हे खरेच आहे. मात्र, 'ती' होती म्हणून 'ते' होते; असे रमाई आणि बाबासाहेबांचे सुमधुर नाते.माता रमाईबाई तशा अनाथ, बाबासाहेबांशी लग्न झाले.

रमाबाईंच्या आई नेहमी म्हणायच्या, "बाई सगळ्यांना सांभाळून घे. समजुतीने वाग. माहेरचे नाव काढ." तेव्हा रमाबाईंचे वय तरी किती असेल? लहानच होत्या त्या. मात्र, आईच्या मृत्युपश्चात रमाबाईंनी आईचे विचार आयुष्यभर जतन केले. सासरी आल्या त्या सून म्हणून नव्हे, तर मुलगी म्हणून! नव्हे नव्हे, सासरी असलेल्या सर्वांचीच माय म्हणूनच! त्यांच्या गुणांनी त्या कुटुंबाच्या प्रिय बनल्या, रमाबाईंच्या सासरीही माणसांचा गोतावळा होता. गरिबीही होती.

पती बाबासाहेब तर नेहमी शिकण्यासाठी बाहेरगावी असायचे. त्यामुळे घरातील ज्येष्ठांची सगळी सेवा रमाबाईच करायच्या. इतकं करूनही रमाबाईंनी कधीही माहेरची किंवा सासरची निंदा केली नाही. पती दूर बाबासाहेब परदेशात असायचे मात्र त्यांनी मुलाचीही उणीव कुटुंबाला भासू दिली नाही. बाबासाहेब परदेशी असताना त्या कुटुंबाच्या आधारस्तंभ बनल्या. बाबासाहेबांना चारित्र्यवान माणसं आवडत. रमाबाई ही चारित्र्याची आणि गुणांची खाणच होत्या.

लंडनला शिकत असताना बाबासाहेबांनी एका पत्रात लिहीलं होतं की, त्यांची परिस्थिती खूप बिकट आहे. कधी कधी तर पाणी पिऊन राहावे लागते. हे वाचून रमाबाईंच्या जीवाला घोर लागतो. साहेबांना इथून पैसे पाठवायलाच हवेत, असे त्या ठरवतात. पण, पैसे कसे मिळवणार? कारण, कुणाकडूनही काही मागितले तर ते बाबासाहेबांना आवडणार नाही. आणि ते आपल्या मनालाही पटणार नाही. दिवसाउजेडी काम करावे तर शेजारणी म्हणत, "तू काय साहेबाची बायको. तुला काय कमी?" त्यामुळे दिवसाढवळ्या शेण्या-गोवर्‍या केल्या, त्या विकल्या तर साहेबांची इज्जत जाईल. हा सर्व विचार करून रमाबाई सकाळी ४ वाजता उठत. शेण्या-गोवर्‍या करून पहाटेच त्या विकत, त्यातून तुटपुंजे पैसे यायचे. त्यातून पैसे राखून ठेवायची. ते पैसे त्या लंडनला पाठवू लागली. अर्थात, त्या पाठवलेल्या थोड्या पैशांचा बाबासाहेबांना तसा काय उपयोग होणार होता? पण, रमाईने पाठवलेल्या पैशांना जी भावनिक श्रीमंती होती, ती आजच्या कोट्यवधी रुपयांना नाही.

रमाबाईंनी बाबासाहेबांवर निखळ प्रेम केलं, त्यांचा आत्मसन्मान, त्यांचा विश्वास कायम तर ठेवला पण स्वतः अशिक्षीत असुनही बाबासाहेबांना शिकण्यासाठी भक्कम साथ दिली. त्यांच्या या संघर्षात त्यांना समाजाकडून आणि परिस्थितीकडून फक्त उपेक्षाच मिळाली, पण बाबासाहेबांच्या संपूर्ण प्रवासात त्या त्यांच्या मागे भक्कमपणे उभ्या राहिल्या. त्यांनी स्वतःला बाबासाहेब आणि समाजासाठी वाहून देत, समाजाची सेवा केली. आज अशा त्यागमुर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती...त्यांना मॅक्स वूमनकडून विनंम्र अभिवादन!

Updated : 7 Feb 2021 8:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top