Home > Max Woman Blog > महिलांच्या हक्कांसाठी आयुष्य घालवणारे मराठी भारत रत्न

महिलांच्या हक्कांसाठी आयुष्य घालवणारे मराठी भारत रत्न

महिला शिक्षण, विधवा पुनर्विवाह, जरठ-बालिका विवाहास विरोध, हुंडाबंदी अशा चळवळींबरोबरच अण्णांनी मुलींसाठी स्वतंत्र शाळा, त्यांच्या उच्च शिक्षणासाठी स्वतंत्र महिला विद्यापीठ अशी विधायक कामे केली. त्यांचा आजच्याच दिवशी म्हणजे 29 ऑक्टोंबर १९५८ साली भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भारत रत्न' हा सर्वोच्च नागरी किताब देऊन गौरव केला.

महिलांच्या हक्कांसाठी आयुष्य घालवणारे मराठी भारत रत्न
X

'महिला शिक्षण, विधवा पुनर्विवाह, जरठ-बालिका विवाहास विरोध, हुंडाबंदी अशा चळवळींबरोबरच अण्णांनी मुलींसाठी स्वतंत्र शाळा, त्यांच्या उच्च शिक्षणासाठी स्वतंत्र महिला विद्यापीठ अशी विधायक कामे केली. त्यांचा आजच्याच दिवशी म्हणजे 29 ऑक्टोंबर १९५८ साली भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भारत रत्न' हा सर्वोच्च नागरी किताब देऊन गौरव केला. मिळवणारे महर्षी धोंडो केशव कर्वे हे महाराष्ट्राचे पहिले सुपुत्र. १९५८ साली आजच्या दिवशी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी ही घोषणा केली. त्याच वर्षी महर्षींनी वयाची शंभर वर्षे पूर्ण केली होती.

समाज सुधारणा, शिक्षण या क्षेत्रांत अतुलनीय कार्य केल्याबद्दल महर्षींना हा बहुमान प्रदान करण्यात आला. महर्षी कर्वेंची ओळख अण्णासाहेब अशी होती. त्यांचे १०४ वर्षांचे प्रदीर्घ जीवन हे अखंड सेवाव्रत होते. महिला शिक्षण, विधवा पुनर्विवाह, जरठ-बालिका विवाहास विरोध, हुंडाबंदी अशा चळवळींबरोबरच अण्णांनी मुलींसाठी स्वतंत्र शाळा, त्यांच्या उच्च शिक्षणासाठी स्वतंत्र महिला विद्यापीठ अशी विधायक कामेही केली.

रत्ना गिरी जिल्ह्यातील मुरूड हे अण्णांचे गाव. शिक्षणासाठी त्यांना खूप पायपीट करावी लागली. १८८१ मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्या कॉलेजातून त्यांनी गणिताची पदवी संपादन केली. पुढे १८९१ ते १९१४ इतका काळ त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन काॅलेजात गणिताचे अध्यापन केले. अण्णांच्या पत्नी राधाबाई कालवश झाल्या त्या वेळी अण्णांचे वय पंचेचाळीसच्या आसपास होते. प्रौढ वयात विधुर झालेल्या पुरुषानेही अल्पवयीन कुमारिकेशीच लग्न करण्याची त्या काळात प्रथा होती. लहान वयात मुलींची लग्ने होत, पण दुर्दैवाने पती लवकर मरण पावला तर त्या मुलीला मात्र त्याची विधवा म्हणून उर्वरित आयुष्य घालवावे लागे.

ही समाज रीत नाकारणाऱ्या अण्णांनी पंडिता रमाबाईंच्या शारदा सदन संस्थेत शिकणाऱ्या गोदूबाई या विधवा मुलीशी पुनर्विवाह केला. ही गोष्ट काळाला मानवणारी नव्हती. अण्णा पत्नीासह मुरूडला गेल्यानंतर अण्णांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा ठराव संमत झाला. याच गोदूबाई पुढे आनंदी कर्वे किंवा बाया कर्वे म्हणून ख्यातनाम झाल्या. अण्णासाहेबांच्या कार्यात बाया कर्वे यांचा सक्रिय वाटा होता.

अण्णांचा पुनर्विवाह ही व्यक्तिगत बाब नव्हती. घातक सामाजिक प्रथांविरुद्ध केलेले ते बंड होते. पुनर्विवाहासाठी लोकमताचे जागरण करावे, या हेतूने २१ मे १८९४ रोजी अण्णांनी पुनर्विवाहितांचा एक कुटुंबमेळा घेतला. याच सुमारास अण्णांनी 'विधवा विवाह प्रतिबंध निवारक' मंडळाची स्थापना केली. विधवा-विवाहाला विरोध करणाऱ्या प्रतिगामी प्रवृत्तींना आवर घालणे हे या मंडळाचे काम होते. बालविवाह, जरठ-कुमारी विवाह, केशवपन यासारख्या अन्याय्य रूढींत अडकलेल्या अनिकेत स्त्रियांना मोकळा श्वास मिळावा म्हणून १८९६ मध्ये अण्णांनी सहा विधवा महिलांसह 'अनाथ बालिकाश्रम' काढला. 'विधवा विवाहोत्तेजक' मंडळाची स्थापना केली. रावबहादूर गणेश गोविंद गोखले यांनी अण्णांचे हे उदात्त कार्य पाहून हिंगणे येथील आपली सहा एकरांची जागा आणि ७५० रुपयांचा निधी संस्थेच्या उभारणीसाठी अण्णांकडे सुपूर्द केले.

या उजाड माळरानावर अण्णांनी एक झोपडी बांधली. ही पहिलीवहिली झोपडी ही हिंगणे स्त्रीशिक्षण संस्थेची गंगोत्री. आज अनेक वास्तूंनी गजबजून गेलेल्या या वैभवसमृद्ध परिसरात अण्णांची झोपडी त्यांच्या तपाचे महाभारत जगाला सांगत उभी आहे. स्त्रियांवर होणारे अत्याचार, त्यांना दिली जाणारी दुय्यम दर्जाची वागणूक यांचा त्यांना कायम राग येत असे. पंडिता रमाबाई आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या जीवनकार्यांमुळे अण्णासाहेब खूपच प्रभावित झाले होते. थोर तत्त्वज्ञ हर्बर्ट स्पेन्सर यांच्या विचारांचाही त्यांच्यावर पगडा होता.

अण्णासाहेबांनी पुण्याजवळील हिंगणे (आता कर्वेनगर) या गावी १८९६ मध्ये विधवा महिलांसाठी आश्रम स्थापन केला. या आश्रमात याच ठिकाणी १९०७ साली महिला विद्यालयाची स्थापना त्यांनी केली. आश्रम आणि शाळा या दोन्हींसाठी लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी त्यांनी '`निष्काम कर्म मठा'ची स्थापना १९१० साली केली. यातूनच महिला विद्यापीठ निर्माण झाले. हे कार्य पाहून विठ्ठलदास ठाकरसी या प्रसिद्ध उद्योजकाने त्यांच्या मातोश्री नाथीबाई दामोदर ठाकरसी यांच्या नावाने १५ हजार रुपयांचा निधी दिला. त्यामुळेच भारतातील पहिले महिला विद्यापीठ उभे राहिले. ते आजही कार्यरत आहे.

पुढे या तिन्ही संस्थांचे कार्य उत्तरोत्तर वाढत गेल्याने त्याचे एकत्रीकरण करून `'हिंगणे स्त्री शिक्षण संस्था' आणि त्यानंतर `महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था' असे त्याचे नामकरण करण्यात आले. १९९६साली त्यांच्या कार्यारंभाला १०० वर्षे पूर्ण झाली. असे महर्षी कर्वे. त्यांनी वयाची शंभरी पार केली, तेव्हा त्यांना 'भारत रत्न' या किताबाने गौरवण्यात आले. महाराष्ट्राने देशाला दिलेले ते पहिलेच 'भारतरत्न'! आणखी चार वर्षांनी वृद्धापकाळाने त्यांचे पुण्यात निधन झाले. महाराष्ट्रात जन्मलेला एक कर्मयोगी निद्रिस्त झाला.

-भारतकुमार राऊत

Updated : 29 Oct 2020 8:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top