Home > Max Woman Blog > ‘कळ्यांचे निश्वास' या संग्रहाने स्त्रियांच्या कथासाहित्यात परिवर्तनाला सुरूवात

‘कळ्यांचे निश्वास' या संग्रहाने स्त्रियांच्या कथासाहित्यात परिवर्तनाला सुरूवात

कविवर्य ना .धो. महानोर सभागृह 2 येथे झालेल्या परिचर्चेत वक्त्यांनी टाकला विविध पैलूवर प्रकाश

‘कळ्यांचे निश्वास या संग्रहाने स्त्रियांच्या कथासाहित्यात परिवर्तनाला सुरूवात
X

परिचर्चेत वक्त्यांनी टाकला विविध पैलूवर प्रकाश

सानेगुरूजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालय,अमळनेर (जि. जळगाव) :

1920 च्या दशकात स्त्रीयांच्या मनातील व्यथा व भावभावनांचे यर्थाथ चित्रण विभावरी शिरूरकर अर्थात मालती बेडेकर यांनी कळ्यांचे निश्वास या कथासंग्रहातून व्यक्त केला आहे. त्या काळात स्त्रीयांवर अनेक बंधने असताना मालती बेडेकर यांनी हे धाडस केले खरे पण आपले खरे नाव त्यांनी 13 वर्ष उघड होऊ दिले नाही. जेव् हा स्थिती योग्य वाटली तेव्हा त्यांनी एका कार्यक्रमात ती विभावरी शिरूरकर त्या असल्याचे जाहिर केले. या पुस्तकातील विविध लेखांवर वक्त्यांनी उहापोह करून कथा संग्रहातील स्त्री जीवनावरील विविध पैलुंवर प्रकाश टाकला.

कविवर्य ना.धो. महानोर सभागृहात झालेल्या या परिचर्चेच्या अध्यक्ष्ास्थानी गोरेगावच्या डॉ. अनघा मांडवकर होत्या. तर यात उमा आवटे (डोंबिवली), सुषमा मुलमुले(नागपूर), वसंत बिरादार (अहमदपुर) डॉ. शशिकांत पाटील (पाचोरा) यांनी सहभाग घेतला होता.

विभावरी शिरुरकर अर्थात मालती बेडेकर यांनी त्या काळात अनुभवलेल्या तत्कालीन स्त्री जीवनाला साहित्याच्या रूपात उतरवले. कौटुंबिक आणि सामाजिक वास्तव परीस्थितीची चिकित्सा न करता, स्त्रीमनाच्या व्यथांची जाणीव करून देणारे मराठी साहित्य विभावरी शिरूरकर उर्फ मालतीबाई बेडेकर यांनी लिहिले. विसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकात त्यांनी स्त्रीमनाचा ठाव घेणाऱ्या साहित्यातून समाजासमोर एक झंझावाती वादळ निर्माण केले. रूढी,परंपरा,पूर्ण समाजातील स्त्रीयांच्या दुःखद स्थितीचे सहानुभूतीने चित्रण करणाऱ्या साहित्यातील पुरूषी औदार्यभावाला बाजूला ठेवून केवळ स्त्रीनिष्ठ जाणिवांतून स्त्रीप्रश्नांना वाचा फोडणारे साहित्य पहिल्यांदाच मराठीत शब्दबध्द करण्याचे धाडस त्यांनी केले.

स्त्रीस्वातंत्र्याच्या प्रश्नांची चर्चा करणारे हे साहित्य यापूर्वीच्या पुरूषी दडपशाहीला नकार देऊन स्वतंत्रपणे स्त्रीकेंद्री कलेचा शोध घेणारे ठरले. स्त्रीयांच्या व्यथित मानसिक आंदोलनांना वाङ्मयरूपात सादर करणाऱ्या या लेखिकेचे क्रांतीरूप पुरूषसत्ताक वाङ्मयात दुर्लक्षिले गेले असले, तरी स्त्रीयांचे मन साहित्यात उतरवण्यासाठी स्त्री साहित्यिकच असायला हवा.

मराठी वाङ्मयाच्या इतिहासात इ.स. 1933 ते 1945 या काळात विभावरी शिरूरकर यांच्या लेखनाने एक वादळ निर्माण केले. 1933 मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‌‘कळ्यांचे निश्वास' या संग्रहाने स्त्रियांच्या कथासाहित्यात परिवर्तनाला सुरूवात झाली.

निंदा, टिकेला गेल्या सामोऱ्या

त्या काळात स्त्रीयांनी पुरूषांशी बोलू नये, सोबत काम करतांनाही बोलू नये. तसे दिसले तर गैरसमजाचे डोंगर उभे राहत आणि त्याचा त्रास त्या महिलेला सहन करावा लागत असे. त्या काळात या सर्व लेखनाची निर्माती करणारी ‌‘विभावरी शिरूरकर ही व्यक्ति कोण आहे ? या विषयी कुतुहल निर्माण झाले. पुरूषांवर टिका करते म्हणजे काय ? हे साहित्य अश्लिल आहे. ते जाळा अशी टिका व निंदा झाली. हे एवढ्यावरच थांबले नाही तर विभावरी यांची प्रेतयात्राही त्या काळात काढण्यात आली.

अखेर त्यांनीच जाहिर केले ती मीच

विभावरी शिरूरकर बी .ए. या नावाने प्रसिद्ध होणारे लेखन श्रीमती मालतीबाई बेडेकर लिहित होत्या याचे रहस्य 1933 ते 1946 पर्यत सुमारे 13 वर्षे उलगडले नव्हते. स्त्रीयांवरील एका व्याख्यानाप्रसंगी त्यांनीच ते प्रकट केले व ती विभावरी शिरूरकर म्हणजे मीच मालती बेडेकर. विभावरी शिरूरकर ही दुसरी तीसरी कोण नसुन आपली पत्नी आहे हे खुद्द त्यांचे पती बेडेकरांनाही माहित नव्हते.

विभावरी शिरूरकरांनी स्त्रीकेंद्री कथा, कादंब-या , नाटकांचे लिखाण केले त्यात शबारी, लग्न की कौमार्य, पतिची निवड, शेवग्याच्या शेंगा, वहिनीच्या बांगडया, अंतःकरणाचे रत्नदीप, ताई हेच बरे, सुखाचे संसार, प्रेम विष की अमृत, तू, आई की दावेदारीण, रिकाम्या भांडयाचे निनाद, त्याग, बाबांचा संसार माझा कसा होईल, शिकारी, दोघांचे विश्व, खरे मास्तर, प्रेम की पशुवृत्ती, प्रेमाची पारख, मोरणी, एकच क्षण, पारध, हिरा जो भंगला नाही. यासारख्या साहित्याद्वारे विभावरी शिरूरकरांनी स्त्रीयांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या भावनात्मक समस्या समाजासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला होता.

विभावरी शिरूरकर यांचे लेखन त्या काळच्या इतर स्त्री लेखिकांपेक्षा संपूर्णपणे नव्या शैलीचे होते. स्त्री-प्रश्नांची मानसिक बाजू त्यांनी फार प्रभावीपणे आपल्या कथांतून माडली, प्रौढ कुमारिकांच्या मनातला मानसिक कोंडमारा, कुरूप मुलींचे लग्नाचे प्रश्न आणि त्यांची मानसिक कुचंबणा, हुंड्याचे प्रश्न , प्रेमातील पाशवीपणा, अशारीर प्रेम, बाहेरख्यालीपणा इत्यादी स्त्रीजीवाचे अनेकविध बाजूचे दर्शन घडविण्यात त्यांच्या कथा यशस्वी झाल्या असल्याचे सांगत वक्त्यांनी त्यांच्या विविध पैलूवर प्रकाश टाकला. या परिचर्चेचे सूत्रसंचालन वैदेही नाखरे यांनी केले.

Updated : 4 Feb 2024 6:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top