Home > Max Woman Blog > अशी झाली भरत जेठवाणीची सान्वी जेठवाणी!

अशी झाली भरत जेठवाणीची सान्वी जेठवाणी!

भारतात गेल्या काही वर्षात लिंगबदलाचं प्रमाण वाढलं आहे. म्हणजे साक्षर झाल्यानंतर स्वतःला ओळखणं आणि स्वतःच्या मनाप्रमाणे जगणं याला एक हिंमत लागते आणि ती हल्ली बरेच जण दाखवत आहेत. कलम ३७७ रद्द झाल्य़ानंतर LGBTIQ समुदायातील अनेकांचं जगणं सुसह्य झालं आहे. अशाच सुप्रसिध्द नर्तकाच्या लिंगबदलाची कहाणी सांगितली आहे प्रा. पी. विठ्ठल यांनी.....

अशी झाली भरत जेठवाणीची सान्वी जेठवाणी!
X

या फोटोत दिसणाऱ्या सुंदर स्त्रीचं नाव आहे सान्वी जेठवाणी. अगदी काल परवापर्यंत ही स्त्री 'पुरुष' होती, यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे सत्य आहे. आधी तिचं नाव होतं भरत जेठवाणी. 'भरतनाट्यम' या कलाप्रकारात भरत जेठवाणी हे नाव नांदेड, मराठवाड्यापुरतंच मर्यादित नाही, तर ते महाराष्ट्रभर परिचित आहे. नृत्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेऊन भरत यांनी आपलं आयुष्य या कलेला समर्पित केलं आहे. कुटुंबात कोणताच सांस्कृतिक वारसा नसतानाही उच्चशिक्षित भरतने या क्षेत्रात जे परिश्रमपूर्वक नाव मिळवलं, ते केवळ कौतुकास्पद आहे.


परंतु काल-परवापर्यंत 'पुरुष' म्हणून वावरणाऱ्या भरतच्या स्त्रीत्वाचा प्रवास नेमका कसा झाला? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. साधारण दोनेक महिन्यापूर्वी एक पत्रकार परिषद घेऊन तिने - म्हणजे आजच्या सान्वीने लिंगबदल (Transgender) केल्याचे जाहीर केले आणि चर्चांना उधाण आलं.

आज योगायोगाने सान्वी विद्यापीठात आली होती. मला भेटली. खूप वेळ गप्पा झाल्या. मला तिच्या या लिंगबदलाचा प्रवास आणि प्रक्रिया जाणून घ्यायची इच्छा होती. माझ्या प्रश्नांना, माझ्या कुतूहलाला तिने अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला आणि स्वतःचा 'पुरुष ते स्त्री' असा प्रवास उलगडून दाखवला. हा प्रवास विलक्षण थक्क करणारा आहे.


सान्वी सांगते, 'मानसिकदृष्ट्या लहानपणापासून माझ्या मनात एक स्त्री आहे, असं मला वाटत होतं. माझं शरीर पुरुषाचं पण मन मात्र स्त्रीचं. आपण पुरुष म्हणून Unsatisfied आहोत, याची जाणीव होत होती. माझ्या शरीरात काहीतरी चुकतंय असं वाटत होतं. आणि घरातून तर लग्नासाठी दबाव होता. पण मी मुलीशी लग्न नाही करू शकणार असंही वाटत होतं. मग मी स्वतःचा रस्ता स्वतःचं शोधायला लागले. मी स्टडी सुरू केला. Gender discrimination वर वाचन सुरू केलं. खूप अभ्यास केला. विदेशात SRS म्हणजे Sex reassignment surgery नावाचं ऑपरेशन करतात असं कळलं. भारतात यालाच GRS म्हणजे gender reassignment surgery म्हणतात. हे ऑपरेशन कुठे उपलब्ध आहे? या ऑपरेशनमध्ये किती risk आहे? ते केल्यावर 'स्त्री' म्हणून मनासारखं जगता येतं का? याला सामाजिक मान्यता आहे का? जर लिंगबदल केला तर भारत सरकारकडून नवे अधिकार मिळतील का? माझी जी स्वप्न आहेत ती पूर्ण होतील का? या सगळ्यांचा अभ्यास केला आणि माझ्या लक्षात आलं everything is possible आणि मी भरतची 'सान्वी' झाले.


समाजाच्या भीतीने हा निर्णय घ्यायला वेळ लागला, पण माझा निर्णय चुकलेला नाही. मी आनंदी आहे'. असं खूप उत्साहाने सान्वी सांगते. लिंगबदलानंतर कुटुंब किंवा समाजाचा दृष्टिकोन कसा आहे? या प्रश्नावर सान्वी हळवी झाली. वडिलांचा या गोष्टीला विरोध होता. 'आई- वडील आणि मी' असा एक त्रिकोण होता. पण माझ्यासाठी माझं आयुष्य महत्त्वाचं होतं. दुर्दैवाने बाबा गेले. माझं ऑपरेशन झालं. समाज मला स्वीकारेल की नाही ही भीती होती; पण मला त्याची पर्वा नव्हती. मला माझ्या पद्धतीने जगायचं होतं. Its my life.

लिंगबदलानंतर बर्याववाईट असंख्य प्रतिक्रिया आल्या. सान्वीच्या धाडसाचं कौतुक झालं. 'तिच्यासारख्या' असलेल्या अनेकांनी तिच्याशी संपर्क केला. काहींनी तिची टिंगल उडवली. तर काहींचा चक्क sexual approach होता, आहे.


सान्वी सांगते, 'मी हे केवळ सेक्ससाठी केलेलं नाही. मी माझ्या मानसिक सुखासाठी केलं आहे. माझी लग्न करण्याची इच्छा आहे. मला संसारिक जीवन जगायचं आहे. Matrimony sites वर संशोधन सुरु आहे. मला खूप प्रेम मिळवायचय. बघू काय होतंय ते? सान्वी भरभरून बोलते.

एका गोष्टीचा मुद्दाम उल्लेख करायला हवा. सान्वी उच्चशिक्षित आहे. बीसीए, बीए भरतनाट्यम आणि फोकडान्समध्ये तिने पीएचडी केली आहे. एवढंच नाही तर commerce and Management मध्येही तिने पीएच.डीचे संशोधन केले आहे. professional activity of men's cosmetic product. हा तिचा विषय आहे. marketing strategy चा तिने उत्तम अभ्यास केलाय. तर ते असो.


उद्या विद्यापीठात दीक्षान्त समारंभ आहे आणि तिला पीएच.डी पदवी मिळणार आहे. तिचे विशेष अभिनंदन

सान्वीच्या या शारीरिक आणि मानसिक बदलाचा खूप वेगळ्या अंगाने विचार करता येणे शक्य आहे, पण इथे तो हेतू नाही. अनेकानेक सामाजिक दबाव झुगारून 'स्त्री' होण्याचा त्याने / तिने घेतलेला निर्णय तिच्यासारख्या अनेकांना प्रेरणादायी आहे. आता कोणत्याही मानसिक, शारीरिक घुसमटीशिवाय तिला आनंदाने जगता येईल... नक्कीच.

सान्वीच्या या नव्या 'पुरुषमुक्त' प्रवासाला खूप खूप शुभेच्छा!

▪ पी. विठ्ठल

p.vitthal75@gmail.com

Updated : 3 Jun 2022 7:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top