Home > Max Woman Blog > राजकारणातलं `संवेदन`पर्व

राजकारणातलं `संवेदन`पर्व

आज खासदार सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस, त्या निमित्ताने शरद पवार यांची कन्या म्हणून त्यांची देशभरात ओळख आहेच. मात्र, या ओळखी व्यतिरिक्त सुप्रिया सुळे यांनी देशाच्या राजकारणात कसा ठसा उमटवला? दिल्ली ते महाराष्ट्र सुप्रिया सुळे यांचा जनसंपर्क पाहता त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होणार का? यासह सुप्रिया सुळे यांच्या राजकीय,सामाजिक कारकिर्दिचं ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी केलेलं विश्लेषण

राजकारणातलं `संवेदन`पर्व
X

एकसष्ठी पार केलेल्या महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचे ढोल वाजवले जातात, तेव्हा नेहमीच एक सल जाणवत राहते, ती म्हणजे एवढ्या वर्षात महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळाली नाही. अलीकडच्या काही वर्षांत जेव्हा जेव्हा तसा विषय चर्चेत आला, तेव्हा प्राधान्यानं पुढं आलं ते सुप्रिया सुळे यांचं नाव. त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होतील किंवा नाही याचं उत्तर काळच देईल.

राजकारण हे असं क्षेत्र आहे की तिथं कधी कसे फासे पडतील, कुणाचं चांगभलं होईल हे ब्रह्मदेवालाही कळत नाही. मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पाहात अनेकांची आयुष्य सरली, परंतु बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे आदींना आश्चर्यकारकरित्या मुख्यमंत्रिपद मिळालं. प्रश्न योग्यतेचा नसतो तर तत्कालीन राजकीय परिस्थिती, तुमची जागा आणि तिथून अनपेक्षितरित्या मिळालेली संधी असा सगळा भाग असतो.

त्यामुळं एक्कावन्नावा वाढदिवस साजरा करणा-या सुप्रिया सुळे यांना दिल्लीच्या राजकारणात रस असला तरी महाराष्ट्राच्या राजकारणातली मुळं घट्ट असल्याशिवाय दिल्लीत प्रभाव पाडता येणार नाही हे त्यांना पुरेपूर ठाऊक असावं. दोन्ही पातळ्यांवर प्रभावीपणे काम त्यांचा प्रवास सुरू आहे.

पद महत्त्वाचं असलं तरी ते आणि तेवढंच महत्त्वाचं असतं असं नाही आणि सुप्रिया सुळे यांना त्याची जाणीव असावी. त्याचमुळं ज्या प्रकारचं राजकारण त्या करतात ते आजच्या काळात खूप वेगळं ठरतं. राजकारणासाठी मतदारसंघात मुळं घट्ट लागतात.

त्यादृष्टिकोनातून विचार केला तर मतदारसंघाशी त्यांचा जेवढा नियमित संपर्क असतो, तेवढा देशात कुठल्या खासदाराचा क्वचितच असेल. एखाद्या आमदाराचा आपल्या मतदारसंघात असतो, त्याहीपेक्षा अधिक त्यांचा मतदारसंघात संपर्क असतो.

२०१४ आणि २०१९च्या निवडणुकीत मोदी लाटेतही निवडून आल्या त्या आपल्या या संपर्काच्या बळावरच. शरद पवार यांची पुण्याई आणि अजित पवार यांचं नेटवर्क होतंच. परंतु तेवढ्याच भरवशावर त्या बसल्या असत्या तर त्यांची विकेटसुद्धा पडली असती.

त्यापलीकडं जाऊन त्यांनी स्वतःचा संपर्क मजबूत केलाय, हे लक्षात घ्यावं लागतं. थेट संपर्काबरोबरच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या मतदारसंघातल्या विविध घटकांशी नित्य संपर्कात असतात. त्या बाबतीत त्यांची बरोबरी कुणी करू शकणार नाही. त्यांचा हा संपर्कही दांडगा असल्यामुळं अनेकांच्या नजरेत भरतो.

केवळ सोशल मीडियावरच त्यांचं राजकारण चालत असल्याचा अनेकांचा गैरसमज आहे. परंतु मतदारसंघातील गाव न् गाव पालथं घालून लोकांशी त्यांनी ठेवलेला थेट संपर्क त्यांना माहीत नसतो.

सुप्रिया सुळे गेली चौदा वर्षे संसदेत आहेत, त्यामुळं विचारलेल्या प्रश्नांची संख्या आणि संसदरत्नसारखे पुरस्कार हा त्यांच्या कामगिरीच्या मूल्यमापनाचा मापदंड ठरु शकत नाही. शरद पवारांच्या कन्या म्हणून आजही त्यांची ओळख आहे. ही ओळख अभिमानानं मिरवण्यासारखी असली तरी त्यापलीकडं त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. राष्ट्रीय पातळीवरील गंभीर विषयांवर त्या जी मांडणी करतात, तशी मांडणी महाराष्ट्रातले कुणी खासदार करताना दिसत नाहीत.

उदाहरण द्यायचं झालं तर लोकसभेतील ३७० कलमावरील चर्चेचं आणि CAB वरील चर्चेचं देता येईल. या दोन्ही विषयांवेळी लोकसभेत जी उत्तम भाषणं झाली त्यात सुप्रिया सुळे यांच्या भाषणांचा आवर्जून समावेश करावा लागेल.

३७० कलमाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं मतदान केल्याचा खोटा आरोप अमित शाह यांनी महाराष्ट्राच्या निवडणूक प्रचारात केला होता. प्रत्यक्षात राष्ट्रवादीनं त्यावेळी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. सुप्रिया सुळे यांच्या भाषणाचा आशय मात्र ३७० कलमाच्या थेट विरोधातला होता.

काश्मीरमधील सद्यस्थिती, वर्तमान स्थिती, भूतकाळातले दाखले देत त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्या बोलत असताना सत्ताधारी सदस्य व्यत्यय आणू लागले तेव्हा त्यांनी संबंधितांना खडसावलेही. कुणीतरी मध्ये काही बोललं त्यावर म्हणाल्या,

'मी सिरिअसच बोलते. माझे रेकॉर्ड चेक करून बघा. आज नाही, गेल्या तेरा वर्षांचे...'

त्यांनी झापल्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांनीही आपल्या सदस्यांना हाताने इशारा करून शांत राहायला सांगितले होते.

भाजपच्या हुल्लडबाजी करणा-या सदस्यांच्या गर्दीपुढं एवढ्या आत्मविश्वानं उभं राहणं ही साधी गोष्ट नाही.

CAB वरील भाषणाची सुरुवातच त्यांनी मार्टिन निलोमर यांच्या,

"First they came for the Communists, and I did not speak out—because I was not a Communist,"

या कवितेनं केली. देशात दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेल्या समाजाला असुरक्षित वाटतंय. कृपया स्वतःच्या देशात कुणाला स्टेटलेस बनवू नका, अशी कळकळीची विनंती करून त्यांनी भाषण संपवलं होतं. ही दोन्ही भाषणं २०१९ मधल्या बेस्ट भाषणांपैकी होती.

सुप्रिया सुळे यांच्या राजकीय कारकीर्दीचं मूल्यमापन कधीही करायचं झालं तरी देशाच्या इतिहासातील या दोन ऐतिहासिक घटनांच्यावेळी त्यांनी केलेली भाषणं विचारात घ्यावी लागतील. (ही दोन्ही भाषणं यू ट्यूबवर उपलब्ध असून आवर्जून ऐकण्यासारखी आहेत.)

अलीकडच्या काळात संसदेत चांगली भाषणं दुर्मिळ झाली आहेत. बॅरिस्टर नाथ पै, मधू दंडवते, मधु लिमये, जॉर्ज फर्नांडिस अशी संसद गाजवणारी एकाहून एक सरस मराठी नावं आपल्याला माहीत आहेत. ही माणसं खूप मोठी होती. त्यानंतर अलीकडच्या काळात महाराष्ट्रातील खासदारांच्या इंग्रजी, हिंदी भाषणांमध्ये प्रवाहीपणा नसतो.

स्थानिक प्रश्न अनेकजण उपस्थित करतात. परंतु राष्ट्रीय प्रश्नांचं खोल आकलन नसतं. डॉ. अमोल कोल्हे यांच्यासारखा एखादा अपवाद दिसून येतो, परंतु त्यांची नुकतीच सुरुवात असल्यामुळं त्यांच्यासंदर्भात एवढ्यात ठोस विधान करता येणार नाही. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी केलेली ही हिंदी आणि इंग्रजीतली भाषणं अनेकदा संसदेत प्रभावी ठरली आहेत. भूमिकेतली स्पष्टता हे त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य.

त्याचमुळं मेधा पाटकर यांच्यासारख्या सामाजिक नेत्याही जाहीरपणे, `परिवर्तनाच्या लढाईतल्या दिल्लीतल्या आमच्या साथी....` असा त्यांचा उल्लेख करतात.

महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांची महाराष्ट्रातली सक्रीयता वाढली आहे आणि सामाजिकदृष्ट्या ती खूप महत्त्वाची आहे. सामान्य माणसांना मंत्र्यांच्या बंगल्यावर, मंत्रालयात जाणं सहजसाध्य नसतं. अशावेळी कुणाही माणसासाठी त्या आठवड्यातले किमान दोन दिवस तरी यशवंतराव चव्हाण सेंटर इथं उपलब्ध असतात. कितीही लोक आले असले तरी शेवटच्या माणसाला भेटल्याशिवाय जागेवरून उठत नाहीत. त्या लोकांना फक्त भेटत नाहीत, तर त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सर्वतोपरी मदत करतात. बदल्या किंवा तत्सम अनधिकृत कामासाठी त्या कुणाला उभ्या करत नाहीत. परंतु सरकारदरबारी अडकलेली सामान्य माणसांची अनेक कामं असतात. तालुका पातळीपासून मंत्रालयापर्यंत विविध पातळ्यांवर त्रासलेल्या अशा माणसांना थेट सनदी अधिकारी, मंत्रीपातळीवर संपर्क करून देतात.

आपल्या यंत्रणेमार्फत संबंधित कामांचा फॉलोअप घेतात. गेल्या वर्षभरात अशा हजारो माणसांची कामं त्यांनी मार्गी लावली असतील. अंध, अपंग लोकांची त्यांना भेटायला येणा-यांमध्ये अधिक संख्या असते. या घटकांना त्यांच्याविषयी वाटणारा विश्वास विलक्षण आहे. त्यांना त्या व्यक्तिगत पातळीवर संपूर्ण सहकार्य करीत असतात. हे झालं दृश्य स्वरुपातलं काम. त्यापलीकडं सामाजिक पातळीवर त्या करीत असलेल्या कामाची त्या कधी जाहिरात करीत नाहीत.

करोनामुळे अनाथ झालेल्या जेजुरीमधल्या घोणे दाम्पत्याच्या दोन्ही मुलींचं पालकत्व आणि जबाबदारी त्यांनी स्वीकारल्याची बातमी परवा प्रसिद्ध झाली. परंतु ती परस्पर माध्यमांकडून आलेली बातमी होती. अशा प्रकारची अनेक कामं त्या करीत असतात, परंतु एका हातानं दिलेलं दान दुस-या हाताला कळू नये, हा शरद पवारांनी दिलेला संस्कार त्या कसोशीनं जपतात. राजकारणात येण्याआधी भटक्या विमुक्तांच्या मुलांचं शिक्षणविश्व आणि भावविश्व समजून घेण्यासाठी केलेल्या कामाची नाळ त्यांनी टिकवून ठेवली आहे.

भटक्या विमुक्तांच्या तसेच आदिवासी पाड्यातल्या अनेक शाळांशी असलेले ऋणानुबंध त्यांनी आपल्यापुरते जपले आहेत. ते कधी बातमीचा विषय होऊ दिले नाहीत. सकाळी सात वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत अखंडपणे कार्यरत राहताना त्यांनी जपलेली ही संवेदनशीलता अन्य राजकारण्यांहून असलेलं त्यांचं वेगळेपण अधोरेखित करते.

दाखवेगिरीच्या जमान्यात दुर्मीळ होत चाललेली ही संवेदनशीलता आजच्या काळात खूप महत्त्वाची असते. शिवाय चौदा वर्षांच्या खासदारकीनंतरही आपल्याला खूप गोष्टी समजून घ्यायच्या आहेत, याची नम्र जाणीव असल्यामुळेच डॉ. बाबा आढावांपासून डॉ. जयसिंगराव पवारांपर्यंत अनेकांच्या दारापर्यंत जाऊन काही समजून घेण्याची त्यांची तयारी असते. राजकारणातील सामाजिक जाणिवेची ही वाट विस्तारत जावो, या अपेक्षांसह वाढदिवसानिमित्त त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा !

विजय चोरमारे (ही पोस्ट फेसबुक भिंतीवरून घेतली आहे.)

फेसबुक साभार

Updated : 30 Jun 2021 8:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top