Home > Max Woman Blog > अब्रू नावाचं लॉलीपॉप!

अब्रू नावाचं लॉलीपॉप!

स्त्रीला योनी वगळता कर्तृत्वाचा भाग आहे की नाही? कुठेही दरोडा, पडला की बलात्कार केले जातात. यामागची मानसिकता काय? या मानसिकतेवर मात करत, सुनिताने स्वत:वर 8 वर्षाची असताना बलात्कार झाला... तिने स्वत:ला सावरले आणि 12 हजार देहविक्री करणाऱ्या मुलींची सुटका केली... ती नवदुर्गा नाही तर ती त्यापेक्षा अधिक आहे. वाचा समीर गायकवाड यांचा लेख...

अब्रू नावाचं लॉलीपॉप!
X

ज्या समाजात केवळ मादरचोद, बहनचोद अशा शिव्या आहेत. तिथं बापचोद, भाईचोद अशा शिव्या दिल्या जात नाहीत. कारण केवळ 'बाई' हीच निव्वळ आणि निव्वळ भोगवस्तू असते, तिच्यावर पडून तिला भोगायचं हेच पक्के रुजलेले असल्याने या संभोगवादी शिव्या केवळ स्त्रीसाठी आहेत. स्त्रीवर बलात्कार झाला म्हणजे तिचं सर्वस्व लुटलं गेलं. अशा भ्रामक कल्पना जिथे जाणीवपूर्वक रुजवल्या गेल्या आहेत. तिथे आणखी काय अपेक्षा करणार?

स्त्रीचं शील जर तिच्या योनीत आहे तर मग पुरुषाचं शील कशात आहे? त्याच्या लोंबत्या जननेंद्रियात त्याचं शील का नाही? की शील ही संज्ञा फक्त 'बाई'साठी आहे? स्त्रीला योनी वगळता कर्तृत्वाचा भाग आहे की नाही? मग तिचा सन्मान तिच्या जननेंद्रियापुरता का मर्यादित केला गेला? याचं कारण स्त्रियांनी या पुरुषी वर्चस्वाच्या शोषणवादी समाजरचनेचं सहनशील अंग व्हावं आणि त्या योनीरक्षणापुरतं स्वतःला मर्यादित करून घ्यावं, जेणेकरून बाह्य जगाची ओढ त्यांना लागू नये, त्यांनी बंड करू नये हे आहे. वास्तवात हे अब्रू नावाचं लॉलीपॉप आहे !

सुनीताचं म्हणणं इथं पटतं, बलात्कार हा एक शारीरिक अत्याचार आहे. मात्र, बलात्कार झाला म्हणजे सर्वस्व लुटलं गेलं, आता आपण जगाला तोंड दाखवायला लायक उरलो नाही. हा केवळ भ्रामक आणि निखालस खोटारडा समज आहे. खरं तर ज्यांनी अत्याचार केला. त्यांनी तोंड लपवत फिरलं पाहिजे. बलात्काराच्या घटनेला आयुष्यातून बरबाद झाल्याची फिल देता कामा नये. या उलट स्त्रीने आपल्यावर झालेल्या अत्याचाराचा जाब विचारला पाहिजे. आणि समाजाचा याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे.

पूर्वीच्या काळी नित्य युद्धे होत, चकमकी होत तेंव्हा रक्तपातासोबतच स्त्रियांवर बलात्कार करण्यावर जोर असे. आजही कुठेही अन्य पद्धतीचे गुन्हे (जसे की दरोडा, खून) घडले की जोडीने बलात्कार ही केले जातात. यामागची मानसिकताच मुळात स्त्रियांवर दहशत पसरवण्याची आणि त्यांच्यावर काबू मिळवण्याची आहे. जोवर स्त्रिया याला बळी पडत राहतील. तोवर बलात्कार पिडीत महिला स्वतःला दोष देत जीव देण्याची भाषा करत राहील. या मनोवृत्तीत बदल घडवून आणण्यासाठी मला सुनीता कृष्णन महत्वाची वाटते...

एका सधन उच्चभ्रू उच्चजातीय वर्गातलं सुनीताचं कुटूंब होतं. घरी सगळी सुखे पाणी भरत होती. समृद्धी नांदत होती, कुठे नाव ठेवायला जागा नव्हती. मात्र, एके दिवशी त्यांच्या कुटुंबास मोठा हादरा बसला. पंधरा वर्षे वयाच्या कोवळ्या सुनीतावर आठ नराधमांनी बलात्कार केला. कुटुंब पुरतं थिजून गेलं. पण सुनीता धीट होती. तिने त्या परिस्थितीचा सामना केला. मनोबल वाढवत स्वतःला आणि कुटुंबाला सावरलं. तिच्यावर झालेला बलात्कार जाणीवपूर्वक आणि नियोजित होता! याचं कारण महत्वाचं आहे.

वयाच्या आठव्या वर्षी तिने शोषित घटकातील मुलींसाठी नृत्याचे वर्ग सुरु केले होते. जे तिथल्या दलालांना आणि कुंटणखान्याच्या मालकिणींना मान्य नव्हतं. ही हकीकत आहे सुनीता कृष्णनची. सुनीताचे वडील नकाशे बनवण्याच्या विभागात होते. त्या कामानिमित्त त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची देशभर भ्रमंती झाली होती. आईवडिलांसोबत राहणाऱ्या सुनीताने या काळात त्या त्या भागातील वंचित शोषित घटकावर जीव लावला. यातून तिच्या मनात मायेचा आस्थेचा करुण झरा सदैव पाझरत राहिला.

सुनीताच्या बलात्कारास त्या कुटुंबाने नव्या दृष्टीकोनातून पाहिलं. ते त्याला चिकटून राहिले नाहीत. त्यातून ते घट्ट उभे राहिले.

सुनीताने बंगळूरुमधील सेंट जोसेफ महाविद्यालयातून पर्यावरण विज्ञान विषयातून पदवी घेतली. मंगलोरमधील रोशनी निलयमधून तिने एमएसडब्ल्यू केलं. 1996 साली ती हैदराबादेत असताना मेहबूब गली रेड लाईट एरियातील वेश्यांना त्यांच्या राहत्या घरातून बेदखल करण्यात आलं. तेंव्हा तिने एक जोरकस पाऊल उचललं. या बायका पोरींना तिने आश्रय दिला. त्यांच्यासाठी तिने लढा उभारला. या क्षेत्रात सुनीताचं नाव झालं.

आंध्रप्रदेश सरकारने मानवी तस्करी रोखण्यासाठी तिच्याकडून आराखडा बनवून घेतला. सुनीता एका मल्याळी दांपत्याची मुलगी असली तरी तिचा जन्म बंगळूरूला झाला होता. त्यामुळे तिची ओढ साहजिकच जन्मभूमीकडे होती. आंध्रनंतर तिने कर्नाटकमधील वेश्यांसाठी आवाज उठवला. त्यांच्या आरोग्य आणि संरक्षण विषयक प्रश्नांवर लक्ष दिले. एड्सबाधित स्त्रियांसाठी सेंटर्स उभे केले.

सुनीताच्या कार्याने भारावून गेलेल्या केरळ सरकारने 2011 साली तिच्या मार्गदर्शनानुसार निर्भया पॉलिसी बनवून घेतली. दक्षिण भारतातल्या वेश्यांसाठी सुनीता आईसमान आहे.

राजू आणि नलिनी कृष्णन यांच्या पोटी जन्माला आलेली सुनीता आता 48 वर्षांची आहे. मात्र, धंद्याच्या लाईनमधून बाद झालेली 84 वर्षांची उमर ढळलेली दुर्गाम्मादेखील तिला सुनीता अम्मा म्हणते. ती या सर्वांची आई आहे.

एकीकडे या बायका तिच्यावर जीव टाकतात तर दुसरीकडे असेही घटक आहेत. ज्यांच्या नजरेत ती सलते. आजवर तिच्यावर तब्बल चौदा वेळा जीवघेणे हल्ले झाले आहेत. त्यात ती बऱ्याचदा जखमीही झाली आहे.

सुनीताला कुणी विचारलं की, "तुझं आयुष्य कशामुळे बदललं?" तर ती उत्तरते की, "माझ्यावर झालेल्या बलात्काराने मी अधिक दृढ निश्चयी आणि मजबूत झाले! त्याला माझा वीक पॉईंट समजले नाही. इथे पाच वर्षाच्या मुलीसोबत लोकांना शय्यासोबत करताना पाहिलं तेंव्हा माझ्यावर झालेला बलात्कार हा एक शारीरिक अत्याचारच होता हे मला कळून चुकलं." सुनीताच्या 'प्रज्वला' या एनजीओने आजवर बारा हजार मुलींची सुटका केली आहे. संरक्षण, सुटका, पुनर्वसन, आधार आणि विधी सहाय्य अशा पाच पातळ्यांवर तिचे काम चालते. सुनीताकडून शिकण्यासारखे काय आहे हे व्यक्ती विचारसापेक्ष आहे. मी मात्र तिच्यात देवता पाहतो, किंबहुना त्याहून अधिक पाहतो...

सलाम !

- समीर गायकवाड.

या लेखमालेतील पूर्वीचे भाग ब्लॉगवर वाचता येतील-

Updated : 2020-10-26T12:25:10+05:30
Next Story
Share it
Top