Latest News
Home > Max Woman Blog > अधुरी प्रेम कहाणी - दास्तान कालीबाईची...

अधुरी प्रेम कहाणी - दास्तान कालीबाईची...

वेश्या व्यवसाय sex work करणाऱ्या महिला कधी कोणावर प्रेम करतात का? "काली"१९८८ ला Under World शी संबंध असलेल्या काली ने प्रेम केलं. तिने आवडणारा व्यक्ती गमावला ... तिच्यामुळं अंडर वर्ल्डमध्ये खून पडले... कोण होती ही काली? वाचा समीर गायकवाड यांचा लेख...

अधुरी प्रेम कहाणी -  दास्तान कालीबाईची...
X

१९८२ चं वर्ष असावं...

कालीबाईकडे एक रिक्षावाला यायचा. काली ही नाकीडोळी नीटस असणारी चुणचुणीत पोरगी. चकाकता काळा रंग, शेलाट्या अंगाची शिडशिडीत उंच बांध्याची. काळेभोर लांब सडक केस आणि त्यात खोवलेल्या हेअरपिन्समध्ये मोगऱ्याच्या कळ्या आणि अबोलीची फुले एकाआड एक गुंफलेली असत. गळ्याजवळ काहीसं सैल आणि बाह्यापाशी आवळ असलेलं पोलकं आणि अंगावर प्लेन सिंगल कलर्ड जॉर्जेटच्या साड्या तर कधी त्यावर सॅटिन पट्टेही असत. पारदर्शी लाल निळ्या खड्यांची सर तिच्या गळ्यात असे. आवाजात एकदम माधुर्य. या बायका शक्यतो कमी बांगड्या घालतात पण काली त्याला अपवाद होती, ज्या रंगाची साडी तिने नेसलेली असे त्याच रंगाच्या काचेच्या डझनावारी बांगड्या तिच्या दोन्ही हातात असत. बोलताना खांदे उडवून आणि हातवारे करून बोलण्याची भारी खोड होती तिला, त्यामुळे ती बोलू लागली की आधी बांगड्यांची किणकिण कानी येई. मग तिचा मंजुळ आवाज! नाजूक निमुळत्या पायातली पैंजणं अगदी खास असत, टाळी वाजवावी तसं तिनं पावलावर पाऊल थडकवलं की, समोरच्याच्या काळजास असंख्य इंगळ्या डसत. मासुळीच्या आकाराची नक्षीदार जोडवी तिच्या पायात खुलून दिसत. बाकीच्या बायका कुंकू लावण्यास कचरत कारण त्याची उठाठेव अधिक असे आणि कस्टमरवर त्याचे सतराशे साठ फरक पडत. पण काली मात्र, आपल्या उभट भाळावर फिकट चॉकलेटी रंगाचं कुंकू लावे. तिच्या कपाळावर केसांची महिरप कायम खुली असे. त्यातून काही उनाड बटा कपाळी रुळत आणि त्यातल्या काही केसांच्या टोकांत त्या कुंकवाचा रंग चढलेला असे, नेमका तोच रंग कालीच्या ओठांचा होता.

आपल्या नाजूक रसरशीत ओठांच्या कडांना दाताखाली दाबून धरताना कुणी कालीला पाहिलं की, लोक म्हणत आता तिचा आशिक घरी जाऊन आपल्या बायकोला देखील असंच दाताखाली ओठ धरायला लावेल! एकदम नाशिली चीज होती ती.

मनमौजी छंदीफंदी. खास कस्टमर आलं की, दारू सिगारेट सगळं कसं तब्येतीनं करायची ती. तिचा एकच प्रॉब्लेम होता, ती सणकी होती. तिच्याकडे येणाऱ्या हरेक गिऱ्हाईकास ती होकार देत नसायची. जे गिऱ्हाईक तिला ठीकठाक वाटे त्यालाच तिच्या खोलीचे दरवाजे खुले असत. अंडरवर्ल्डमधली काही मंडळी तिला न्यायला रिक्षा, टॅक्सी पाठवत. कुणी पाठवलं याची खात्री करूनच मनाला पटलं तर ती जायची.

एकदा राजन नायरच्या हाताखालच्या काही सी ग्रेड भडभुंज्यांनी तिला नेलेलं. तिथं गेल्यावर तिने साडी फेडायला नकार दिला तेंव्हा तिला कुत्र्यासारखं मारून आणून सोडलं. तिने ही बातमी तिच्या खास गिऱ्हाईकाला दिली. त्याने त्याच्या बॉसला ही माहिती दिली. ज्याने राजन नायरच्या त्या गुंडांना धडा शिकवला. नंतर कालीला त्या बॉसचं चांगलंच वेड लागलं. बॉससोबत कालीची नस जुळण्यामागं आणखी एक कारण होतं. ते दोघंही केरळी होते. कालीचं खरं नाव मार्था होतं तर त्याचं नाव होतं अब्दूल लतीफ कुंजू. त्याला स्मिता पाटील आवडायची.

त्यानं कालीला कधीच काली म्हटलं नाही, तो स्मिता म्हणायचा. तिला मात्,र ते आवडत नव्हतं. नंतर नंतर त्या कुंजूसोबत एक रिक्षावाला तिला दिसू लागला. काली त्याच्यावर जाम लट्टू होती. पण त्याला तिच्याशी काही देणं घेणं नव्हतं.

१९८८ मध्ये अतिमद्यप्राशन केल्यानं नशेच्या अंमलात काली सज्ज्यातून खाली कोसळली. तिच्या मेंदूला मार बसला. रक्तस्त्राव झाला. काही दिवसांतच तिचा मृत्यू झाला. नेहमी मोजून मापून पिणाऱ्या कालीचं शेवटच्या काळात संतुलन ढासळलं होतं. ती बेहिशोब दारू ढोसू लागली होती. खरं तर ती मोडून पडली होती. तिच्यावर जीव असणाऱ्या कुंजूची ऑगस्ट १९८७ मध्ये राजन निकाळजेच्या गुंडांनी हत्या केली आणि ज्याच्यावर काली भाळली होती त्या रिक्षावाल्याची हत्याही नंतर काही दिवसांतच छोटा राजनच्याच माणसांनी केली.

कुंजू नामचीन गुंडच होता पण रिक्षावाला सराईत गुन्हेगार नव्हता. बहिणीच्या लग्नासाठी त्याला काही रक्कम हवी होती. ती रक्कम देण्याचे चुकीचे मार्ग कुंजूने दाखवले. त्याच्या हातात रिव्हॉल्वर दिलं आणि एकाला खलास करण्याची टीप दिली. ती टीप कुणा ऐऱ्यागैऱ्याची नव्हती तर थेट राजन नायरची होती.

त्या रिक्षावाल्यास पंधरा दिवस ट्रेनिंग दिलं गेलं. मर्डरच्या आदल्या रात्री त्याच्या हाती एक लाख रुपये टेकवण्यात आले. बहिणीच्या लग्नापायी दारोदार भटकत असणाऱ्या त्या भणंग माणसानं मागचापुढचा विचार न करता गेम वाजवली.

राजन नायर खलास झाला. त्याचा बदला घेण्यासाठी छोटा राजनने कुंजूसह त्या रिक्षावाल्यासही खलास केलं. त्या रिक्षावाल्याचं नाव होतं चंद्रशेखर सफालिका !

सामान्य सभ्य जगात एखाद्या स्त्रीचं मन दुभंगलं तर तिला सावरायला तिचं कुटुंब, भाऊबंद, आप्तेष्ट, मित्र, समाज सोबत असतो. पण ज्या स्वतःच बेवारस असतात. अशा स्त्रिया कोलमडून गेल्यावर त्यांना हात देणारं कुणी नसतं. म्हणूनच या बायका आपली असलियत लपवत असतात, कुणावर अतिरेकी जीव लावत नसतात. जीव लावला तर तो बहुतकरून जीवावरच बेततो. कदाचित यामुळेच यांच्या मिठीत ते सुख कधीच जाणवत नाही जे अस्सल प्रेमात जाणवतं.

पण काली सारख्या बायका याला अपवाद असतात. म्हणूनच चमडीबाजारच्या लेखी त्या महान ठरत नाहीत. त्यांचे किस्से मात्र, अलवारपणे काळजात जतन केले जातात.

ज्या जागी जीर्ण सज्ज्यातून पडलेल्या कालीनं आपला प्रवास संपवला होता तिथं कित्येक दिवस एक सुगंधी परिमळ जाणवत होता. तिच्या काळ्या कातळदेहावर घुमणाऱ्या मंद वासाच्या त्या खास अत्तराचा तो दरवळ होता...

- समीर गायकवाड

©️रेड लाईट डायरीज

Updated : 2021-03-13T17:29:08+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top