Home > Max Woman Blog > "ए कुणीही काकीचं मंगळसुत्र काढणार नाही", रूपाली चाकणकर यांनी स्वगृहीच पाळला शासन आदेश

"ए कुणीही काकीचं मंगळसुत्र काढणार नाही", रूपाली चाकणकर यांनी स्वगृहीच पाळला शासन आदेश

विधवा प्रथा बंद करण्याची सुरूवात रूपाली चाकणकर यांनी स्वतःपासून करत पाडला नवा पायंडा

ए कुणीही काकीचं मंगळसुत्र काढणार नाही, रूपाली चाकणकर यांनी स्वगृहीच पाळला शासन आदेश
X

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील ग्रामीण भागामध्ये आपल्याला वैचारीकदृष्ट्या बरीच सुधारणा होत असल्याचं पाहायला मिळत आहे. हेरवाडे आणि वाशिम जिल्ह्यातील गावांनी विधवा प्रथा बंदीचे ठराव मांडले आणि त्यांचं राज्यभर कौतुक झालं. त्यामध्ये रूपाली चाकणकर यांनी देखील फक्त सांगण्यापुरतं नाही तर कृतीतून हेच दाखवून दिलंय. काही दिवसांपुर्वी त्यांच्या काकांचं निधन झालं होतं त्यावेळेस अंत्यविधी दरम्यान त्यांनी त्यांच्या काकुंसोबत होणाऱ्या विधवा प्रथा बंद करत एक नवा पायंडा पाडला आण समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला. त्यांनी ही सगळी घटना त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून सांगितली आहे. त्य़ांच्या या पावला मुळे नक्कीच समाजापुढे एक आदर्श निर्माण झाला आहे.

"काल पंढरपुर दौरा करुन पुण्याकडे निघताना बंधुचा फोन आला, रात्रीचे ११ः३० वाजले असतील, अस्वस्थ होत मला निरोप दिला, काका अचानक हृदयविकाराच्या झटक्याने गेले आहेत, आता हाॅस्पिटलला आम्ही सगळे आलो आहोत, तु पोहचण्याचा प्रयत्न कर. हि दुःखद बातमी ऐकुन मला धक्काच बसला.


लहानपणापासुनचा एकत्र कुटुंबातील जीवनप्रवास डोळ्यासमोरुन सरकु लागला,फार मोठ्या एकत्र कुटुंबात वाढले,एकुण सात काका,एक आत्या,सात भाऊ,बारा बहिणी या सर्वांचे एकत्र कुटुंब,हे माझे काका सहा नंबरचे. जेव्हापासून हे जग समजतं तेव्हापासुन त्यांना सैनिकी वेषात पाहिलेले,


सैनिक म्हणुन देशसेवा करीत असताना,गावाला,कुटुंबाला फार मोठा अभिमान…


ते सुट्टीत घरी आल्यानंतर परत जाताना आजीपासुन ते सगळ्या काकु रडत सामान,प्रवासाची,सोबतच्या जेवणाची तयारी करत,माहेराहुन पाठवणी असत तसा तो निरोपचा कार्यक्रम होत,


त्यावेळी ते समजत नव्हतं पण मोठं होताना त्यातील प्रेमाची ओढ जाणवत गेली.


माझ्या आईसोबतचा हा फोटो ,मोठी वहिनी कमी आणि बहिण म्हणुन या सगळ्यांनी लहान दिरांना सांभाळले ,आज दोघेही नाहीत ,आहेत त्या फक्त आठवणी..


आज अंत्यविधीच्या वेळी या लहाणपणाच्या या सगळ्या आठवणी फेर धरत होत्या,


अंत्यविधी सुरु होताना कोणीतरी आवाज दिला,तोंडात मणी द्यायचा आहे,मंगळसुत्र काढा …उठून पुढे गेले आणि सगळ्यांना सांगितलं काकूचे मंगळसुत्र कोणीही काढायचा प्रयत्न करु नका,त्याऐवजी तुळशीचे पान तोंडात द्या.आता विधी करताना आपण बदल करायचा,


तात्काळ ग्रामस्थ व कुटुंबियांनी मान्य केलं.कुंकु न पुसतां.जोडवी न काढतां ,बांगड्या न काढता अंत्यविधी झाला.


आपल्या जवळच्या व्यक्तीच्या जाण्याचे अपार दुःख व मानसिक धक्का असताना,पतीच्या अंत्यविधीत पत्नीला मिळणारी वागणुक जास्त वेदनादायक असते,


विधवा महिलांना समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहोत…या सामाजिक क्रांतीच्या विचारात एक पाऊल पुढे टाकताना आपणही सर्वजण सहभागी होऊ या….नव्या उषःकालासाठी!"

Updated : 24 May 2022 5:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top