Home > Max Woman Blog > गर्भवतींच्या सिसारीचे अनुभव…

गर्भवतींच्या सिसारीचे अनुभव…

गर्भवतींच्या सिसारीचे अनुभव…
X

माझं लग्न 15 जून 2004 ला झालं आणि आम्ही पुण्याला गेलो. नंतर 23 जूनला पाळी आली. त्यावर पाळीच आली नाही. म्हणजे हा मी हुमीची अन् पहिल्या धुमीची असं म्हणतं मोठी पोरगी पोटात राहिली. पाळी चुकल्याचं लक्षात आलं अन् लक्षणं जाणवायला लागली. सोसायटीत राहात होतो. जेव्हा आपण अशा सोसायट्यामध्ये रहातो (अनेक कुटूंब) तेव्हा फार भयंकर त्रास गरवारशा बायकांना (गर्भवती महिला) होतो. कांदा तळला की तो वास नको नकोसा होतो. असंच माझ्या बाबतीत घडलं. सोबत कोणीही अनुभवी शहाणं माणूस नव्हतं सांगायला. पण माझ्या माईला समजलं मला दिवस गेलेत.

(कारण तिचं म्हणणं होतं. घरात भितीला कुंभारणीनं घर केलंय) कुंभारीण हा एक किटक असतो. गांधील माशीसारखा)

तर मला जेव्हा ही सिसारी लागलेली तेव्हा कांदा तळलेला वास आला की, साडी कुठं अन् पदर कुठं याचं भान रहात नसं. साडी फिटुस्तर बाहीर उलटत पळायची. सारखं थुंकायची एका बॉक्समध्ये माती टाकून त्यात थुंकायची. उठुन उभी राहाताना सकाळी चक्कर येऊन जर पडले. तर तशीच नाका तोंडात माशा गेलेल्या अवस्थेत दिवसभर बेशुद्ध पडून राहायची. जेव्हा नारायण(माझा नवरा) कामावरून घरी यायचा. तेव्हा तो मानाखाली हात घालुन उठवायचा. म्हणजे नाकाला धरलं तर जीव जाईल अशी अवस्था माझी झालेली. 55 किलो वजन माझं सिसारीत 35 किलो झालं होतं. नारायण नारळ पाणी, लस्सी आणायचा पण कशाचं काहीच खाऊ वाटत नसे.

थोड्या दिवसानं भुईमुगाच्या शेंगाची माती मला खाऊ वाटायची. भाजलेलं अन् लिंबू लावलेलं मकाचं कणीस... त्याचे चार दाणे खायची. जांब त्याला मीठ अन् तिखट लावलेलं जरासा खायची... तसेच पिवळं मटण हळद लावून उकडलेलं अन् दुसऱ्याच्या हातचं खाऊ वाटायचं. पण या सिसारीच्या अडीच महिन्यात मात्र, फक्त एका व्यक्तीच्या ज्याला एचआयव्ही झालेला त्याची धुडक्यात बांधून आणलेल्या राशनच्या गव्हाच्या लाल अडीच चपात्या अन् शेंगदाण्याची चटणी एकदाच खाल्लेली. (एचआयव्ही वर उपचार करायला आलेले पेशंट डाँ. पुजारी सदाशिवपेठ) नंतर मात्र, या सिसारी मुळे मी आईकडे आले.

सिसारीचे चार महिने कांदा डोक्यात घुसलेला होता. कांद्याचं काहीच खात नसं. पण ताक जास्त प्यायची. नंतर एकदा शेजारणीकडे बोंबील भाजल्याचा एवढा सुंदर वास आला की, मला बोंबील खायचं म्हंजी खायचेच... असं नारायणला सांगितले. पण बोंबील घरात नसल्याने तो आमच्या शेजाऱ्यांकडे भावकीकडे फिरला आणि मग कुठे आमच्या चुलत सासुने तीन बोंबील दिले आणि त्याच तीन बोंबीलासोबत अडीच भाकरी खाल्या.

तसंही शिसारी लागलेल्या बाईला जे खावं वाटतं. ते मागितलं तर कोणीही देतं आणि जर आवडणारं खायला नाही मिळालं तर लेकराचे कान फुटतात म्हणं!

पण गरवाऱ्या बाईला खायला काय आवडेल सांगता येत नाही. एका गरवाऱ्या बाईला तरं म्हणं वाळलेल्या ग्वाची (गु) पापडी बघुन खावीशी वाटली होती. आणि ती पापडी शिक्याला ठिवून तिने मुकाट्या (गुपचूप) खाल्ही होती म्हणं! असं काही जुण्या बायका सांगतात. (असं काहीसी खावं वाटलं तर मात्र डाँक्टरांचा सल्ला घेतला पाहीजे)

गावाकडच्या सिसारी लागलेल्या बायका रानातली काळी माती, दळणातले खडे, कोळसे इटकरी फोडुन खातात. चुलीची भाजलेली माती, बोरकुट, चिंचा, बोरं शहरातल्या बायकांचं जास्त माहीती नाही. पण आर्थिक कुवतीप्रमाणे हल्ली त्यांना खाऊ घातलं जातं. ग्रामीण भागातील नवरे हल्ली दवाखाने करतात. पण तिच्या सिसारीकडं पाहीजे तसं लक्ष देत नाहीत.

गरवाऱ्या (गर्भवती) बाईला काय खावं वाटतं? याकडे जसं लक्ष दिलं जातं. तसं काय आवडत नाही. याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. नावडता पदार्थ तिच्या समोर येऊ नये. याची काळजी घेतली पाहिजे. नाही तर काळीज पिळवुस्तर उलट्यांचा त्रास होतो. असं म्हणतात की, जेवढी सिसारी लागेल तेवढं लेकरू चांगलं हेल्दी जन्मतं. याच सिसारीच्या काळात जर नवऱ्यांनी दारू पिणं, तंबाखू खाणं, सिगारेट पिणं कटाक्षाने टाळलं पाहिजे.

सिसारीमध्ये आणखी महत्वाच़ं म्हणजे गरवाऱ्या गर्भवती बाईला काही गोष्टी करायला सांगितल्या जातात... हरणाचा आखुर वलांडणे म्हणजे हरण येतं. बाळंतपण होईल असं म्हणतात की, हरिण ही चलता चलता येलंती (बाळंतिण) होते. आणि तिचं पिलू (पाडस) लागलीच पळतं म्हणजे बाळंतपणात जास्त त्रास होऊ नये म्हणून, पण पहिल्या वेळेस साधारणतः 17 ते 18 घंटे वेळ बाळंतिण होण्यासाठी लागतो. सिसारीच्या काळात बायका प्रचंड झोपतात. (डाव्या कुशीवर झोपावं) पण लेकरांला म़ुगुट (डोकं मोठं) होऊ नये. म्हणून गरोदर बाईला झोपू दिलं जात नाही.

सिसारीच्या काळातच जर ग्रहण लागलेलं असेल. तर त्या गरोदर बाईला उपाशी ठेवलं जायचं. कुठलं काम करू दिलं जात नाही.(सगळ्या जातीधर्मात) लेकराचा ओठ कापलेला, कान कापलेला होईल म्हणून काही इळतीन (विळीन्) चिरू न देणे लेकराच्या चेहऱ्यावर जाब (काळसर चट्टा) होईल. म्हणून भाकरी थापू न देणे. धुणं धुऊ न देणे. (खरं तर या अंधश्रद्धा असून लेकरं अपंग होण्यामागे आईवडिलांमधील अनुवांशिक दोष असतात.)

याच सिसारीच्या काळात सातव्या महिन्यात डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला जातो. अनेक पदार्थ, फळं, साडी, चोळी वटभरण केलं जातं. तिला आवडणारे पदार्थ रेलचेलीने केले जातात. अमराईत झोके अलिकडंपलिकडं करताना गंगात नारळ चोळी सोडणं. या बऱ्याच गोष्टी केल्या जातात.

या काळात पोटाच्या बाहेर गोळा पडुस्तर दोन जीवाच्या बाईची अतिशय काळजी घेणं आवशयक असते. कारण तीच असते. मायमावली अन् दुनिया दावली तर या स्तनपान सप्ताह निमित्ताने गरवारशा (गर्भवती) बाईची काळजी घेऊ या.

  • सत्यभामा सौंदरमल

    निर्धार सामाजिक सेवाभावी संस्था बीड

Updated : 13 Aug 2020 2:41 AM GMT
Next Story
Share it
Top