Home > Max Woman Blog > 'आमचा वटवृक्ष कोसळला....'; आजीच्या आठवणींना उजाळा देत रविकांत तुपकर झाले भावूक

'आमचा वटवृक्ष कोसळला....'; आजीच्या आठवणींना उजाळा देत रविकांत तुपकर झाले भावूक

आमचा वटवृक्ष कोसळला....; आजीच्या आठवणींना उजाळा देत रविकांत तुपकर झाले भावूक
X

आज तुपकर कुटुंबाच्या भक्कम तटबंदीचा बलाढ्य बुरुज कोसळला. माझी आजी, जिला मी नेहमी आई म्हणतो आणि आईच समजलो, ती आम्हा सर्वांना पोरकं करून गेली. ती अचानक आजारी पडली, हॉस्पिटलमध्ये २७ दिवस तिने निकराचा लढा दिला. पण शेवटी झुंज अयशस्वी झाली. तिच्या ८६ वर्षांच्या उभ्या जीवनात कदाचित तिने मानलेली ही पहिलीच आणि अखेरची हार ठरली. आई म्हणजे आमचा वटवृक्ष होता तो वटवृक्ष आज कोसळला, म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भावूक झाले.

आपलं दुखः व्यक्त करत त्यांनी फेसबुकवर लिहिलेल्या पोस्ट मध्ये म्हंटल आहे की, बुलडाण्यापासून सात-आठ किमी अंतरावर आमचं सावळा हे गाव आहे. यमुनाबाई तुपकर म्हणजे या गावचा जणू वटवृक्ष, तिचं कुटुंब आमच्यापुरतंच मर्यादित नव्हतं तर संपूर्ण गाव हे तिला तिचीच जबाबदारी वाटायची. खानदानी रुबाब, करारी नजर, धारदार आवाज, तडफदार स्वभाव, कडक शिस्तीचा बाणा यामुळे तिच्या नावाचा घरातच नाही तर, गावातही दरारा होता. आमचे आजोबा पोलिस पाटील होते त्यामुळे आई (आजी) ही खऱ्या अर्थी गावची पाटलीण होती. कुणाच्याही घरात चांगलं कार्य असो किंवा कुणी अडचणीत असो, आई प्रत्येकाच्या मदतीला धावायची. अडल्या- नडल्याची सोय लावायची. तिच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव संपूर्ण गावातच नाही तर सर्वदूर होता. तिच्या पुढे बोलण्याची पद्धत ना घरात होती, ना गावात. तिच्या वर कोणतंही कोर्ट नसे. ती करेल तोच अखेरचा निवाडा असायचा.

माझ्या वडिलांची सख्खी-चुलत अशी मिळून आठ भावंडं, त्यांच्या बायका, आम्ही त्यांची मुलं, आमच्या बायका, आमची मुलं असा भला मोठा आमचा तुपकर परिवार वेगवेगळ्या घरांमध्ये राहत असलो तरी, आम्हाला बांधणारी, जोडून ठेवणारी एकमात्र कडी होती आमची आई. घरातला कोणताही निर्णय, मग ते कुणाचं लग्न असो किंवा कुठला प्रवास किंवा कोणताही कठीण निर्णय हा तिच्या अनुमतीनुसारच होत असे. नात्यागोत्यातील लोकही तिच्याकडे नेहमी मदत किंवा सल्ला मागण्यासाठी येत असत. नातेवाईकांचाही निवाडा तिच्याकडेच होत असे. तिची कडक शिस्त जाचक नव्हती तर घराच्या मर्यादा ठरवणारी होती. अख्या तुपकर परिवार तिच्यामुळेच निर्व्यसनी आहे. आम्हीही कधीच तिच्या विरोधात जाऊन काही केले नाही. कारण तिच्याबद्दलची आदरयुक्त भीती होती.असे असले तरी ती परिवर्तनवादी, पुरोगामी विचारांची होती हेही खरे! मला आंतरजातीय लग्न करायचे होते तेव्हा घरातील ज्येष्ठ सदस्यांची थोडी नकारघंटा होती. मात्र आईने सर्वांना समोर बसवले आणि पाठिंबा दर्शवला. त्यापुढे कुणीही आणखी काही बोलण्याचा प्रश्नच नव्हता कारण तिचा शब्द शेवटचा असे.

तिने पुस्तकी शिक्षण फार घेतले नव्हते मात्र जीवनाचा दांडगा अनुभव तिच्याकडे होता. तरी शिक्षणावर तिचे विशेष प्रेम होते. आम्ही सर्व चांगले शिकलो पाहिजे, हा तिचा आग्रह होता. आम्ही सर्व नातवंडं तिच्या या शिरस्त्यामुळेच व्यवस्थित मार्गी लागलो. मी डॉक्टर व्हावे अशी तिची इच्छा होती. त्यासाठी तिने प्रयत्नही केले पण, मला काही डॉक्टर होता आले नाही. पण छोटा बंधू अक्षय ला तिने डॉक्टर केले. गावात कोणीही उच्चशिक्षण घेतले की तिला मनापासून आनंद व्हायचा. स्वकष्टातून तिने घरची शेती कमावली, उभी केली. शेतीची आवड तिच्यामुळेच रुजली. तिच्या संस्कारांमुळेच अनेक गुण आमच्यात नकळत झिरपत गेले, असे वाटते. आज राजकारणात नेतृत्वकौशल्य आत्मसात करतांना याचे बाळकडू तिच्याकडूनच मिळालेले आहे. मी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला त्यालाही तिने खुल्या मनाने पाठिंबा दिला आणि नुसता पाठिंबाच दिला असे नाही तर, माझी राजकीय वाटचाल उत्तुंग व्हावी यासाठी ती प्रार्थनाही करत होती.

आज एवढ्या दिवसांची तिची आजारपणातली लढाई अखेर संपली. डॉ. दिपक लद्धड यांनीही तिच्या प्रचंड इच्छाशक्तीला सलाम केला व ही मोठी लढाई ती अखेरपर्यंत जिद्दीने लढली असे सांगितले. अखेरच्या दिवसांत तिने माझ्या आईला बोलावून सांगितले की, रविकांत आमदार होईल तेव्हा शेगावच्या गजानन महाराजांना २५ हजार रुपयांची देणगी देण्याचे मी कबूल केले आहे, तेवढे द्या. माझ्या इतरही भावंडांची लग्न व इतर गोष्टींबद्दल तिने सर्वकाही सांगून ठेवले. तिची दूरदृष्टी आणि सर्वांचा विचार करण्याच्या सवयीचा पुन्हा एकदा आम्हाला प्रत्यय आला.

ती आमच्या कुटुंबाचा सर्वांत मजबूत बुरुज होती. कुटुंबावर आलेल्या कोणत्याही संकटाला ती धीरोदात्तपणे सर्वांच्या आधी सामोरी जायची. " चिंता करू नका मी तुमच्या पाठीशी खंबीर आहे", हे तिचे शब्द आजही कानात घुमतात. तिच्या असंख्य आठवणी मनात आहेत. आज ती आपल्यात नाही यावर विश्वास ठेवणे अशक्यप्राय आहे. मात्र आम्ही खचलेले तिला आवडणार नाही. त्यामुळे तिच्या शिकवणुकीप्रमाणे आम्ही खंबीरपणे या प्रसंगाला सामोरे जात आहोत. आईचे आशीर्वाद आपल्यासोबत सदैव असणार आहेत, याची मला खात्री आहे. तिला सद्गती मिळो, चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

रविकांत तुपकर

Updated : 12 July 2021 6:58 AM GMT
Next Story
Share it
Top